पहाटपावलं : सूर्यास्ताचं स्तोत्र

आनंद अंतरकर
सोमवार, 30 जानेवारी 2017

आठवडाभरात मी त्या सूर्यास्ताची लॅमिनेटेड फ्रेम ग्रेसना दिली. ती मिळाल्यावर त्यांचं छोटेखानी पत्र आलं. त्यात, फोटोत खडकावर खेटून बसलेल्या एका पाठमोऱ्या जोडप्याच्या 'सिल्यूट'बद्दल बारकाईनं लिहिल्यानंतर त्यांनी टेनिसनच्या चार ओळी उद्धृत केल्या होत्या...

कविवर्य ग्रेस एकदा आमच्या 'हंस' बंगल्यात आले होते. त्या वर्षीच्या 'हंस'मध्ये त्यांची 'वेरावळच्या समुद्राचे दृष्टांत' ही दीर्घकविता प्रसिद्ध झाली होती. हॉलमधल्या टीव्हीसेटवर मी काढलेल्या सूर्यास्ताच्या फोटोग्राफची लॅमिनेटेड फ्रेम ठेवलेली होती. गप्पा मारता मारता ग्रेस सारखे टक लावून त्या फोटोकडे पाहत होते.
'कुठला आहे हा फोटो?'' ग्रेसनी मनःपूर्वकतेनं विचारलं.

''गोव्यातल्या 'बागा' बीचवरचा आहे.'' मी संकोच बावरेपणानं खुलासा केला.
''विलक्षण सुंदर दृश्‍य टिपलंय तुम्ही. समुद्रावरच्या सूर्यास्ताचं सगळं नाट्य त्यात तंतोतंत उतरलंय. रंगांना एरव्हीही भाव असतात; पण सूर्यास्तासमयी ते आणखीनच हळवे आणि तरल होतात. त्यांच्या छाया एकमेकांत मिसळून गेल्या की एक वेगळंच भावविश्‍व निर्माण होतं. अशा वेळी रंगांना एकमेकांचं जे सान्निध्य लाभतं, ते माणसांना कधीच लाभत नाही. माणसं कायम विलगलेली. आपापल्या अहंकारात सदैव कुंठलेली. कोंडून गेलेली. समुद्रावरच्या सांध्यसमयीचा एक उत्कृष्ट क्षण तुम्ही टिपला आहे...''

ग्रेसच्या तोंडून एवढं विश्‍लेषणात्मक कौतुक ऐकताना मी अंतरात खूप भारावून गेलो. त्यांचं साधं बोलणंही फार श्रवणीय असे. कधी कधी अनाकलनीयतेच्या धाग्यादोऱ्यांत गुंतून गेलेलं, तरी! मंचावरून केलेल्या त्यांच्या प्रत्येक भाषणात काही मुद्दे उलगडताना सतत चिंतनाचा काही ना काही अज्ञेय स्रोत प्रवाहत असे. आताही ते भरभरून बोलत होते आणि मग अनपेक्षितपणे त्यांनी माझ्याकडे एक मागणी केली, ''या फोटोची एक प्रत मला तुमच्याकडून हवीय. अगदी एवढ्याच आकाराची. अशाच फ्रेमची. माझ्या रायटिंग टेबलावर ठेवण्यासाठी. त्याचा काय येईल तो खर्च मी देईन.''
''अहो काय हे ग्रेस, असल्या मागणीचे मी तुमच्याकडून काही पैसे घेईन असं तुम्हाला वाटतं? तुम्ही फोटो मागितलात यातच माझा गौरव आहे. केवढा मोठा पुरस्कार आहे हा!''

आठवडाभरात मी त्या सूर्यास्ताची लॅमिनेटेड फ्रेम ग्रेसना दिली. ती मिळाल्यावर त्यांचं छोटेखानी पत्र आलं. त्यात, फोटोत खडकावर खेटून बसलेल्या एका पाठमोऱ्या जोडप्याच्या 'सिल्यूट'बद्दल बारकाईनं लिहिल्यानंतर त्यांनी टेनिसनच्या चार ओळी उद्धृत केल्या होत्या :
'sunset and evening star,
and one clear call for me!
and may there be no morning of the bar
when i put out to sea.'

प्रत्युत्तरादाखल चार कृतज्ञतेचे शब्द लिहिताना मी त्यांना एवढंच म्हटलं होतं,
''आयुष्यातले काही अगदी आतले, विश्रब्ध नि आत्मलोपी क्षण अनुभवण्यासाठी मी समुद्रावर जात असतो. सूर्य हळूहळू नजरेसमोरून अदृश्‍य होत जातो, आकाशाच्या रत्नजडित दरबारात नक्षत्रं फुटू लागतात. पाहता पाहता आपोआपच माझ्या 'मी'पणाचा अस्त होऊन जातो आणि माझ्यामधील विनम्रतेच्या छाया अधिकाधिक गडद होत जातात.''

Web Title: pahat pavale by antarkar