मी खरा की तो? (पहाटपावलं)

डॉ. सपना शर्मा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

आपल्यापैकी बहुतांश व्यक्तींचं स्वतःबद्दलचं मत हे दुसऱ्यांनी दिलेल्या नावांवर आणि दुसऱ्यांनी आखलेल्या नियमांवर आधारित असतं आणि ते मत बहुतांश वेळा नकारात्मक असतं.

दुःखाच्या अनेक कारणांच्या मागे एक मूलभूत कारण आहे - मी जे स्वतःबद्दल समजतो आणि जे सत्य आहे त्यातला फरक. थोडंसं गोंधळात टाकणारं वाक्‍य आहे हे; पण अगदी मूलभूत सत्य आहे. प्रत्येकाच्या मनात स्वतःची एक प्रतिमा असते. तीच प्रतिमा म्हणजे सत्य आहे, असं आपण मानून चालतो. पण ही प्रतिमा बहुतांश वेळा भ्रामक असते. त्याचं कारणही तसंच आहे. लहानपणापासून आपल्या आसपासचे सगळेच आपल्याकडे त्यांच्या बुद्धीच्या आणि परिपक्वतेच्या दृष्टिकोनातून बघत असतात. त्यांचा दृष्टिकोन त्यांच्या आयुष्याच्या अनुभवांनी आणि त्यांच्या बुद्धीच्या मर्यादेने बनलेला असतो. त्या रंगीत चष्म्यातून ते आपल्याकडे बघतात आणि त्याप्रमाणे मूल्यमापन करून आपल्याबद्दल मत बनवतात. तेच मत मग ते वेगवेगळ्या प्रसंगांनिमित्ताने आपल्याला सांगतात. आपण तेच आपल्याबद्दलचं सत्य असल्याचं स्वीकारून त्याचप्रमाणे स्वतःकडे बघतो.

आपण स्वतःबद्दल विचार करावा, वेगवेगळ्या पैलूंमध्ये आणि परिस्थितीमध्ये स्वतःचं आकलन करावं, चुका झाल्यास त्यातून कसं शिकावं, आपली आवड-निवड कशी स्पष्ट मांडावी, आपल्याला आयुष्यात काय हवंय इत्यादी स्वतःबद्दलच्या सर्वांत महत्त्वाच्या बाबींवर लहानपणापासून मोठं होईपर्यंत कुठेही बोललं जात नाही. याउलट, दुसऱ्यांचा विचार करावा, स्वतःबद्दल जास्त विचार करणं हे वाईट यांसारख्या बाबींवर भर दिला जातो आणि स्वतःला थोडं जरी महत्त्व देत असलेल्या व्यक्तीला अपराधीपणाची जाणीव करून दिली जाते.

या सगळ्या पार्श्वभूमीवर जगत असताना आपल्यापैकी बहुतांश व्यक्तींचं स्वतःबद्दलचं मत हे दुसऱ्यांनी दिलेल्या नावांवर आणि दुसऱ्यांनी आखलेल्या नियमांवर आधारित असतं आणि ते मत बहुतांश वेळा नकारात्मक असतं. "मी हे चांगलं करत नाही, ते मला शक्‍य नाही, अमूक कुणीच करू शकत नाही, म्हणून मीही करू नये, आपल्यासारख्यांनी तमूक प्रयत्न करू नये, हे करायची माझी लायकी नाही...' असे अनेक नकारात्मक विचार आपल्या प्रगतीला तर अडथळा ठरतातच, पण आपल्या रोजच्या आयुष्यातही आपलं वागणं, बोलणं निराशावादी बनवतात.
आपण स्वतःला पूर्णपणे ओळखत नसल्यानं आपण स्वतःवर प्रेम तर करूच शकत नाही आणि स्वतःचा आदरही करत नाही; आणि जी व्यक्ती स्वतःला मान देत नाही, ती दुसऱ्याला मान देण्याची शक्‍यता फारच कमी असते. स्वतःवर प्रेम न करणाऱ्या, स्वतःचं मन-शरीर आणि बुद्धीवर विश्वास नसणाऱ्या दोन व्यक्ती जेव्हा सोबत जगायचं ठरवतात, तेव्हा त्यांच्यात दुसऱ्यापेक्षा स्वतःला वरचढ सिद्ध करण्याची सतत चढाओढ सुरू असते. अशा परिस्थितीत प्रेम लवकरच हरवतं.
याविरुद्ध स्वतःला पूर्णपणे जाणून आणि स्वीकारून जगणारी व्यक्ती स्वतःवर प्रेम करू शकते आणि आपल्या उणिवा ओळखून त्यावर मात करण्याची हिंमतही तिच्यात असते.
मी खरंच कोण? आणि ज्याला मी "मी' समजतो तो समाजाने घडवलेला "तो' तर नाही? प्रत्येकानं अंतर्मुख व्हायला हवं आणि आपल्या मुलांनाही दिवसातला थोडा वेळ तरी अंतर्मुख होऊन स्वतःला जाणून घ्यायला आणि स्वतःवर प्रेम करायला शिकवायला हवं.

Web Title: pahatpavale article by sapna sharma

टॅग्स