वृत्त आणि सत्याचे नाते कोणते?

dr keshav sathye
dr keshav sathye

तासन्‌तास वृत्तवाहिन्या बघूनही वास्तव काय आहे, हे समजणार नसेल तर आम्ही कोणत्या पत्रकारितेचा टेंभा मिरवणार आहोत? ‘पेड न्यूज’, ‘फेक न्यूज’ यापेक्षाही ही समस्या अधिक दूरगामी परिणाम करणारी असून, प्रेक्षकांना सत्यापासून वंचित ठेवणारी आहे.

यु वाल नोहा हरारी या इस्राईलच्या लेखकाचे नुकतेच प्रसिद्ध झालेले ‘२१ lessons for the २१st century हे पुस्तक सध्या जगभर गाजत आहे. त्यातील why fake news triumphs ? हा निबंध ‘फेक न्यूज’ या फेनॉमेनाची सखोल आणि अभ्यासपूर्ण चर्चा करतो. अगदी बायबलच्या मांडणीपासून अनेक उदाहरणे देत माणसांना, संस्थांना सत्यात रस नसून नियंत्रणात आणि व्यवस्थेत असतो आणि मग त्याभोवती या बातम्यांचा आस फिरत राहतो, अशा आशयाची मांडणी यात केलेली आहे. आपल्या देशातही ही कारणमीमांसा चपखल लागू होते.

या पार्श्‍वभूमीवर आपल्याकडे बातमीचे आणि सत्याचे नेमके नाते काय आहे हे तपासले तर पारंपरिक माध्यमे म्हणजे वृत्तपत्रे अजूनतरी सत्तेपेक्षा सत्यान्वेषीपण महत्त्वाचे मानताना दिसतात. वृत्तवाहिन्या मात्र त्याला वळसा घालत प्रेक्षकांना सत्यापासून दूर नेण्याचा चंग बांधल्यासारख्या सादरीकरण करताना दिसतात. त्यात बहुतांश प्रादेशिक भाषेतील आहेत. अर्थात याला सन्माननीय अपवाद आहेतच. ‘न्यूज’ ही आपली महत्त्वाची समस्या नसून बातमी हाताळणारी आणि प्रक्रिया करून ती माध्यमातून प्रक्षेपित करणारी जबाबदार मंडळी आपल्या मगदुराप्रमाणे त्याला रंग देत गोंधळलेला आणि विस्कळित आशय लोकांसमोर ठेवत आहेत ही आहे. भारतीय वृत्तवाहिन्यांची निर्मिती मुळात टीव्ही कार्यक्रमाचा ‘जॉनर’ म्हणून झाली आहे आणि याला थेट अर्थकारणाचा, सत्ताकेंद्राचा आणि बाजारीकरणाचा संदर्भ आहे. त्यामुळे वृत्तपत्रांना असते तसे संपादकीय धोरण या वाहिन्यांना नाही हे वेगळे सांगायला नको.
चोवीस तास या वाहिन्या बातमी नावाच्या संकल्पनेशी खेळत आला दिवस ढकलत असतात. पडदा सतत हालता ठेवण्याच्या नादात घटनेलाच बातमीचा चढवलेला साज किती अपुरा आहे, त्यात तपशिलाच्या त्रुटी आहेत हे लक्षात न घेता हे रतीब सुरू असतात. आपण दाखवत असलेल्या ‘पॅकेज’मध्ये ‘बातमीमूल्य’ आहे काय, याची शहानिशा न करता सुरू असेलला हा रणसंग्राम प्रेक्षकांच्या वृत्तसाक्षरतेलाच खोटे पाडू पाहतो आहे. आपल्याकडे कॅमेरा आहे, तारस्वरात बोलण्याची कुवत असलेला उत्साही बातमीदार आहे, वृत्तस्थळाचा स्टुडिओशी संपर्क साधून देणारी यंत्रणा आहे, या भांडवलावर थेट घटना दाखवून आपण पत्रकारितेत इतिहास रचत आहोत, अशा आविर्भावात त्यांना पाहणे ही आता करमणूक झाली आहे. अकिरो कुरुसोवा या जपानी दिग्दर्शकाचा ‘राशोमान’ नावाचा सर्वांगसुंदर चित्रपट आहे. त्यात सत्य हे व्यक्तिसापेक्ष असते हे रहस्यमय कथेतून अप्रतिमपणे मांडले आहे. सत्याची विविध रूपे दाखवत वास्तव त्याहूनही निराळे असते याची उत्कृष्ट मांडणी हा चित्रपट करतो. वृत्तवाहिन्यांच्या या हृस्वदृष्टी सत्यापलापाकडे पाहताना हा चित्रपट वारंवार आठवत राहतो.

आपल्याला जे दिसले, रुचले ते सत्य; बातमीतला आपण निवडलेला आणि दाखवलेला भाग म्हणजे सत्य या कोत्या मनोवृत्तीतून वृत्तवाहिन्यांनी आता बाहेर यायला हवे. सत्य आणि वास्तव यातील दरी अधिकाधिक मोठी करण्यात असंख्य वाहिन्या मश्‍गूल झाल्या आहेत. अपघाताच्या बातमीत त्यांनी शेवटचा ‘सेल्फी’ कसा काढला, यापेक्षा रस्त्याची स्थिती आणि अपघाताची कारणे आणि भविष्यात घ्यायची दक्षता यावर अधिक भर द्यायला हवा. पेट्रोलचे भाव रोज वाढताना दाखवताना ग्राहकांच्या संतापाबरोबरच आंतरराष्ट्रीय तेलबाजार, त्यातील चढ-उतारानुसार ठरणारे पेट्रोलचे दर या धोरणाविषयी संबंधितांशी संपर्क साधून वास्तव बाजू जनतेसमोर आणायला हवी आणि त्यांना त्यात बदल करायला भाग पाडायला हवे. सतत नकारात्मकतेवर भर दिला की आपला ‘टीआरपी’ वाढतो या साध्या, सोप्या गणितात न अडकता बातमीच्या विविध कंगोऱ्यांचा अभ्यासपूर्ण धांडोळा घेण्याचा प्रयत्न केल्यास आणि तो मांडल्यास अपेक्षित बदल घडू शकतो, असा आदर्श निर्माण करण्याची आज नितांत आवश्‍यकता आहे. बातमी किती लवकर आणि किती तपशीलवार दिली, यावर पत्रकारितेची कामगिरी ठरत नसून बातमीतील घटक विधायक बदल करण्यास किती पोषक ठरले यावर तिचे मूल्य अवलंबून असते. जेमतेम १५-२० वर्षांचा इतिहास असलेल्या या वृत्तवाहिन्या आज अनेक आर्थिक, व्यावसायिक संकटांना तोंड देत सुरू आहेत, हे वास्तव कोणीही नाकारणार नाही. पण हाच अनुचित पायंडा सुरू ठेवला तर दूरचित्रवाणी पत्रकारितेत जागतिक स्तरावर आपली माध्यमप्रतिमा खालावल्याशिवाय राहणार नाही. बातमीचे आपण जे वस्तूकरण केले आहे त्याचीच ही फळे आहेत आणि एकदा वस्तूकरण केले की पत्रकारितेचा गंध नसलेले बोलघेवडे तज्ज्ञ संपादकांच्या खुर्चीवर येऊन बसतात. परिणाम काय होतो? ‘टीआरपी’ही जातो आणि वाहिन्यांची प्रतिष्ठाही.

बातमीच्या विश्‍लेषणाची जबाबदारी ही वरिष्ठ पत्रकारांनी, संपादकांनी घ्यायला हवी, पण असे होताना दिसत नाही. तालुक्‍यातून, जिल्ह्यातून माईक समोर ठेवून बातमीदार बिनदिक्कतपणे बातमीवर ‘चिंतन’ व्यक्त करताना आपण पाहतो आणि बातमी हा पोरखेळ होतो. घटना आणि तिचे विश्‍लेषण या दोन वेगवेगळ्या बाबी असून मूळ बातमीचा ढाचा अबाधित ठेवण्याचा प्रयत्न फारसा होताना दिसत नाही. बातमीची व्याख्या आणि व्याप्ती यांची मोडतोड करत वाहिन्यांचे सुरू असणारे हे मार्गक्रमण अधिक धोक्‍याचे आहे. बातमी डावी, उजवी नसते, तर बातमी ही बातमी असते, हे शिकूनही मांडणी करताना मात्र ती वाहिनी आपल्या विचारसरणीनुसार ती वळवते. त्यामुळे होते काय की वाहिन्यांवरील विश्‍लेषण हे सतत एकांगी राहते. डाव्या विचाराची मंडळी डावी वाहिनी लावतात आणि उजव्या विचारांची उजवी. त्यामुळे आपल्या मुद्द्याला दुसरीही बाजू असू शकते, याबाबत भारतीय प्रेक्षक अंधारातच राहतो आणि खरे काय आहे हे कायमस्वरूपी गुलदस्तातच राहते. तासन्‌तास वाहिन्या बघूनही वास्तव काय आहे हे समजणार नसेल तर आम्ही कोणत्या पत्रकारितेचा टेंभा मिरवणार आहोत? ‘पेड न्यूज’, ‘फेक न्यूज’ (खरे म्हणजे न्यूज फेक नसते, फेक असू शकते ती माहिती.) यापेक्षाही ही समस्या अधिक दूरगामी परिणाम करणारी असून केवळ वाहिन्यांच्या वृत्तावर अवलंबून असणाऱ्या प्रेक्षकांना सत्यापासून वंचित ठेवणारी आहे. स्वबळावर नफा मिळवणाऱ्या, दर्जा महत्त्वाच्या मानणाऱ्या वृत्तवाहिन्यांची नगण्य संख्या आणि एकूण वृत्तवाहिन्यांची नियोजनशून्य विस्कळित रचना लक्षात घेता व्यवसायमूल्य मानणाऱ्या कंपन्या या क्षेत्रात यायला धजावत नाहीत आणि सट्टेबाजार प्रवृत्तीच्या माणसांनी हे क्षेत्र व्यापलेले आहे आणि त्यामुळेच वृत्तपत्रांना जो संस्थात्मक दर्जा मिळाला आहे, तो वाहिन्यांना मिळणे कठीण झाले आहे.

सगळ्यांहून ‘तेज’ चालण्याच्या नादात आपले पाऊल घसरत आहे. व्यावसायिक निकष आणि गळेकापू स्पर्धेमध्ये आपण इलेक्‍ट्रॉनिक पत्रकारितेला दोन पावले मागे घेऊन जात आहोत. एक सदोष स्टाईल बुक लिहून आपण या माध्यमात नव्याने आलेल्या आणि काही चांगले करू पाहणाऱ्या मंडळींना भरकटण्यास भाग पाडत आहोत ही आजच्या वाहिनी पत्रकारितेची खरी शोकांतिका आहे; ‘फेक न्यूज’ ही नव्हे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com