परिमळ- 'माणसा'ची पेरणी

परिमळ- 'माणसा'ची पेरणी

साने गुरुजी म्हणतात, "आपण पशूंची अवलाद चांगली व्हावी म्हणून खटपटी करीत असतो; परंतु माणसाची अवलाद चांगली निपजावी म्हणून प्रयत्न करीत नाही...' केवढा हा विरोधाभास! हे खरेच आहे. आपण बी-बियाण्यांची चाचपणी करतो, पेरतो, बागेची निगा राखतो. झाडे-पिके वाढावीत म्हणून भोवताली कुंपण घालतो. योग्य त्या वेळी खतपाणी-भांगलणी असे सर्वच करतो. माणसाच्या आईच्या उदरात एक स्वतंत्र अस्तित्व म्हणून वाढणाऱ्या भृणावस्थेतील जिवापासून ते त्याच्या नव्या जगातील पदार्पणापर्यंत आणि तेथपासून संस्कार किंवा शालेय वयापर्यंत त्याला घडविण्यासाठी आपण किती खस्ता खातो? त्यासाठी काय करतो? नुसते छानछौकी. पण बाजारी डबे-कपडे-दप्तर-शिकवण्या आणि पैसा पुरवणे म्हणजे त्याला "घडविणे' नसते. त्यासाठी आपण काय करतो? स्वत:मध्ये मशगूल पालकांना हा प्रश्‍न आहे. त्यामध्ये ती येईल, तोही येईल. "ती' त्याच्या तालात "तो' त्याच्या गुर्मीत. दोघांनीही आपला
अहंगंड जोपासलेला. असा हा काळ. नसते प्रश्‍न निर्माण केलेला. माणसातल्या "माणसालाच' संपवायला निघालेला. अस्तित्वाच्या लढाईत उत्क्रांतीला म्हणजेच निसर्गन्यायाला आव्हान देऊन नवसर्जनास-नवा माणूस घडविण्यास नकार देणारा माणूस आज नपुंसक ठरतोय, ते याच अर्थाने. महाभारतातला एक प्रसंग, सुभद्रेला दिवस गेलेले, श्रीकृष्ण तिला आपल्याबरोबर रथातून माहेरी घेऊन चाललेले. प्रवासात त्यांचा संवाद सुरू होतो. नंतर श्रीकृष्ण तिला युद्धातील चक्रव्यूहाविषयी सांगू लागले. मागून हुंकारही येत असतो. नकळत त्यांचे लक्ष मागे जाते, तर सुभद्रा निद्राधीन झालेली!
ते बोलणे थांबवतात; पण तोपर्यंत तिच्या पोटातील गर्भाने चक्रव्यूहकलेचा अर्धाच भाग ऐकलेला असतो. पुढे अभिमन्यू म्हणून तेच बाळ महाभारत युद्धामध्ये कौरवांनी तयार केलेल्या चक्रव्यूहाचा भेद करते; पण त्यातून बाहेर पडू शकत नाही. कारण त्याच्याकडे अर्धवट ज्ञान असते. मोठ्या शौर्याने अभिमन्यू लढतो आणि संपतो. आईच्या उदरात असताना बाहेरच्या जगाचे ज्ञान बाळाला होते किंवा नाही, याबाबतीत सप्रमाण सांगता येत नसले तरी ते शास्त्रसंमत ठरू शकते.
काहीही असो, पण भृणावस्थेतील बाळाच्या योग्य वाढीसाठी त्याच्या आईला पोषक आहार-विहार-सतत आनंदी-उत्साही आणि हसत-खेळत ठेवणे - सकारात्मक विचार करायला लावणे-तसे वाचायला साहित्य देणे हे नवपालकांचे कर्तव्य ठरते. पुढे जन्मानंतर-शालेय वयापर्यंत त्या बाळाला "माणूस' म्हणून घडविण्यासाठी आवश्‍यक त्या संस्कार-मूल्यांची शिकवण उभयतांनी "तसे' वागून दिली पाहिजे, तरच मुले घडतात. "आडात असेल तरच पोहऱ्यात येईल.' उगीच हे "तू' ते "मी' असा भेदभाव करीत बसण्यापेक्षा समन्वय महत्त्वाचा असतो. आजची तरुणाई नेट युगात वावरत असतानाही ज्ञानाच्या बाबतीत जणू वाळवंटातून प्रवास करतेय असे वाटावे अशी परिस्थिती आहे. व्हॉट्‌सऍप आणि
बाह्यप्रलोभने यामध्ये ती इतकी गुरफटलीय की तिला अंतर्मुख व्हायला वेळच नाही. म्हणूनच "अंतरीचा ज्ञानदिवा मालवू
नको रे' अशी तरुणाईला व नवपालकांना आर्त हाक द्यावीशी वाटते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com