प्रयत्नांचे दीप (परिमळ)

मल्हार अरणकल्ले
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

रंगीबेरंगी भाजीबाजार तजेलदार आणि लुसलुशीत हसू फुलवीत दाट होत चालला होता. विक्रेत्यांची लगबग सुरू होती. गिऱ्हाइकांच्या येरझाऱ्यांचं अस्तित्व ठळक होत चाललं होतं. शिगोशीग भरलेल्या टोपलीशी बसलेल्या एका विक्रेत्यानं विनंती केली; दादा, जरा पाटीला हात लावता का?

वाकून पाटीला हात दिला. डोक्‍यावर पाटी घेऊन विक्रेता झपझप दिसेनासा झाला. पाटीला केवळ हात लावला. विक्रेत्याला मदत मिळाली. पाटीचा बव्हंशी भार विक्रेत्यानंच पेलला होता. त्याला किंचित मदत हवी होती. ती मिळाली. विक्रेत्याचं काम शंभर टक्के झालं; पण माझा आनंद मात्र शेकड्यांच्या पटींत किती तरी मोठा होता!

काळोखभरल्या खोलीत दिव्याची इवली ज्योत नेली, तरी काळोख दूर होतो. तिथलं दीर्घ काळाचं वास्तव्य सोडून तो नाहीसा होतो. तो दिव्याला म्हणत नाही, की मी इथं तुझ्या आधीपासून होतो. हे माझं साम्राज्य आहे. तू इथं पाहुणा आहेस; पण मी यजमान आहे. ज्योत उजळताच काळोखाचा निरास होतो; कारण मुळातच त्याला कुठलं अस्तित्वच नसतं; आणि बळही नसतं. काळोख पसरला होता; कारण तिथं दिवा नव्हता. दिवा आला, म्हणून काळोख संपला.

प्रश्‍नांकडे, अडचणींकडं आपण काळोखाकडं पाहावं, तसं बघतो. उत्तराच्या दिशेनं जाण्यासाठी छोट्या छोट्या प्रयत्नांच्या दीपज्योती आपण पेटवीत नाही; आणि अडचणींचा अंधार अंगावर ओढून घेऊन त्याखाली दडपून जातो. अडचणींचे थरांवर थर पडत जातात आणि त्यांचा दाट-कभिन्न अंधकार होतो. जितकं दुर्लक्ष करू, तितका तो वाढत जातो. आपण प्रयत्न करू, तसतसा एकेक थर प्रकाशत जातो. अंधार विरळत जातो.

जिना चढणारा माणूस एक पाऊल उचलून वरच्या पायरीवर ठेवतो; पण त्याच वेळी त्याचं दुसरं पाऊल खालच्या पायरीवर असतं. वरच्या पायरीवरचं पाऊल स्थिरावलं, की तो खालचं दुसरं पाऊल उचलून घेतो. जिना असाच पार केला जातो. एक पाऊल वर आणि दुसरं खाली, अशी स्थिती प्रत्येक नव्या पावलाआधी असते. ती स्थिरता भासली, तरी वास्तविक ती असते मात्र गती. ध्येयाच्या दिशेला नेणारी.

कुलूप तयार करतानाच त्याची किल्लीही केली जाते; तसंच कुठलाही प्रश्न-समस्या निर्माण होताना त्याच्या बरोबरीनंच त्याचं उत्तरही अस्तित्वात येत असतं. हा नियमच आहे. दिशा भरकटल्या, तरी रस्ता गायब झालेला नसतो. तो आहे तिथंच असतो. तिकडं जाण्याचे मार्ग चकवा देत असतात, इतकंच. ओझं उचलायला बोटभर मदत पुरेशी असते. अंधकार घालवायला इवली ज्योतही पुरेशी असते. प्रश्‍नांचं उत्तर शोधायलाही जिन्यावरच्या एकेका पावलासारखेच छोटे छोटे प्रयत्न आवश्‍यक असतात. आपण प्रश्‍नांची चर्चाच खूप करतो; आणि त्यामुळे प्रश्‍नांनी भरून आलेल्या अंधाराचं ओझं जडावत जातं. उत्तराच्या दिशेनं जाण्यासाठी प्रयत्नांचे छोटे छोटे दीप प्रज्वलित करायलाच हवेत. प्रगतीचा, समाधानाचा आणि आभाळभर आनंदाचा मार्ग त्यातूनच पुढं जात असतो.

Web Title: parimal by malhar arankalle

टॅग्स