पदन्यासाचा 'ताल'

saroj-khan
saroj-khan

नृत्य दिग्दर्शनाच्या प्रांतात आपल्या कौशल्याने स्वतःची नाममुद्रा ठसठशीतपणे उमटवणाऱ्या प्रख्यात नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांचे निधन झाले. त्यांच्याबरबोर काहीकाळ काम केलेल्या कलाकाराने वाहिलेली श्रद्धांजली. 

पोदार कॉलेजात शिकत असताना "सैलाब' चित्रपटातील "हम को आज कल...' या गाण्यावर मी पहिल्यांदा नृत्य सादरीकरण केले. चौदा-पंधरा वर्षांची होते. माधुरी दीक्षितची कमालीची फॅन होते. त्या गाण्याबद्दल खूप कुतूहल वाटले... या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन कोणी केले असेल, असा प्रश्‍न पडला आणि सरोज खान नावाच्या कोरिओग्राफर आहेत हे तेव्हा समजले. या गाण्यातून सरोज खान यांच्याची माझी ओळख झाली. सरोज खान-माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी हे कॉम्बिनेशन त्यावेळी खूप गाजत होते. त्यांची बहुतेक गाणी सुपरहिट होत होती. आम्हा कॉलेज तरुण कॉलेजीयन्सना त्यांचीच गाणी खूप आवडायची. मी तेव्हा सरोजजींच्या गाण्यांवरच अनेकदा कार्यक्रम केले. त्याच दरम्यान काही "रिऍलिटी शो' सुरू झाले होते. मी तेदेखील पाहात होते. सरोज खान यांच्या कामाविषयी तेव्हापासूनच मी प्रभावित झाले. त्यांच्याकडूनच मला खूप प्रेरणा मिळाली. 

सरोज खान यांना कॅमेऱ्याचा जबरदस्त सेन्स होता. त्यांचे टेकिंग अफलातून होते. गाण्यावर नृत्य बसविताना विविध पदन्यास आणि शैलीने ते गाणे शूट करायच्या. "हम को आज कल', "डोला रे डोला' ही त्यांची गाणी मला खूप आवडतात. "चोली के पीछे क्‍या है', "धक धक..' या गाण्यांचे शब्द पाहता त्यांची कोरिओग्राफी करताना ते गाणे अश्‍लीलतेकडे झुकणार नाही, याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली, हे आपल्याला जाणवते. ती गाणी पाहताना आपल्याला ते कुठेही खटकत नाही. गाण्याचे शब्द काहीही असले तरी त्याचे चित्रण आणि त्यातील हालचालींवर नृत्य दिग्दर्शकानेग्ध प्रचंड काम केलेले आहे. प्रेक्षकांना ते कमालीचे आवडले आहे. 

विशेष म्हणजे सरोजजींना नायिकाही चांगल्या मिळाल्या. त्यांच्याकडून चांगले काम करवून घेतले. त्यासाठीही एक कौशल्य लागते. ते सरोजजींकडे होते. कोणतेही गाणे आपल्या उत्तम कोरिओग्राफीने सजविण्यात त्यांचा हातखंडा होता. मला असे वाटते की, जसा ग्रेसफुल डान्सर असतो तशा सरोजजी ग्रेसफुल कोरिओग्राफर होत्या. कोणतेही गाणे त्या अशा रीतचीने नृत्यात बसवायच्या की, ते आवडलेच पाहिजे. त्यांची ती खासियत होती. एखादी नायिका नवीन असली तरी तिला सांभाळून आणि समजावून सांगायच्या. प्रत्येक गाण्याचा बारकाईने विचार करायच्या आणि मगच ते गाणे कोरिओग्राफ करायच्या. 

सरोजजींनी बहुतेक गाणी सुपरहिट दिली. त्यांचा नृत्य दिग्दर्शनाचा अभ्यास मोठा होता. "देवदास'मधील "डोला रे डोला' या गाण्यात माधुरी आणि ऐश्‍वर्या या नायिका. दोन्ही टॉपच्या. अशावेळी कोरिओग्राफर्सचा कस लागतो. कारण दोघींनाही समसमान फुटेज देणे आवश्‍यक असते. त्यात माधुरी त्यांची शिष्या; पण त्या गाण्यात सरोजजींनी दोघींनाही समान न्याय दिला आहे, हे मला ते गाणे पाहताना जाणवले. त्या गाण्याचा वेग त्यांनी व्यवस्थित पकडलाय. सरोजजी नुसता डान्स बसवित नव्हत्या, तर तो बसविताना अन्य बाबींकडेही त्या बारकाईने लक्ष द्यायच्या. 

बी. सोहनलाल यांच्याकडून त्या शिकल्या असल्या तरी त्यांची एक स्टाईल होती. विशेषकरून भारतीय नृत्य प्रकारामध्ये त्या मास्टर होत्या. त्यावर त्यांचे प्रभुत्व होते. आत्ताच्या स्पर्धेच्या काळातही त्या टिकून राहिल्या. आजच्या नायिकाही त्यांच्याकडे शिकायला जायच्या. त्यांनी स्वतःची संस्था काढली होती. त्याचे मला खूप कौतुक वाटते. कारण त्यांच्या वयातले खूप कमी जण आहेत की, ज्यांनी अशा प्रकारची प्रशिक्षण संस्था काढली आहे. 

त्यांची व माझी दोन वेळा भेट झाली. एकदा "ताल' चित्रपटाच्या वेळी मी ऐश्‍वर्या रायला जिमनॅस्टीकचे धडे देत होते, तेव्हा तिथे त्यांची व माझी भेट झाली. त्यानंतर त्यांनीच मला तेथे माझ्या मुलीला जिमनॅस्टीक शिकवशील का, असे विचारले. तेव्हा मुलीला घेऊन त्या आल्या होत्या. 

सरोज खान आताही स्वतः उभे राहून नृत्य शिकवायच्या. अभिव्यक्ती आणि अभिनय या त्यांच्या जमेच्या बाजू होत्या. नाचातले छोटे-छोटे बारकावे त्या टिपायच्या. त्यांच्या कोरिओग्राफीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे नृत्य बटबटटीत नसायचे. त्यांची गाणी पाहूनच मी मोठी झाली आहे. आमच्यासाठी सरोज खान ही एक चालतीबोलती संस्था होती. 
(लेखिका नृत्यदिग्दर्शक आहेत.) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com