वस्त्रनिर्मिती क्षेत्रातील मोठी झेप

भारताची वस्त्रनिर्मितीची प्राचीन व समृद्ध परंपरा आज मोठी झेप घेण्यासाठी सज्ज आहे. ही झेप भारताला एक जागतिक गुंतवणूक, उत्पादन आणि निर्यात यांसाठीचे केंद्र बनवेल.
textile sector
textile sectorsakal
Summary

भारताची वस्त्रनिर्मितीची प्राचीन व समृद्ध परंपरा आज मोठी झेप घेण्यासाठी सज्ज आहे. ही झेप भारताला एक जागतिक गुंतवणूक, उत्पादन आणि निर्यात यांसाठीचे केंद्र बनवेल.

- पियुष गोयल

वस्त्रोद्योग क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी सरकारतर्फे सात राज्यांत ‘पीएम मित्र मेगा टेक्स्टाईल पार्क’ची घोषणा केंद्र सरकारने केली असून या महत्त्वाकांक्षी मोहिमेचा तपशील व भूमिका मांडणारा लेख.

भारताची वस्त्रनिर्मितीची प्राचीन व समृद्ध परंपरा आज मोठी झेप घेण्यासाठी सज्ज आहे. ही झेप भारताला एक जागतिक गुंतवणूक, उत्पादन आणि निर्यात यांसाठीचे केंद्र बनवेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या सात राज्यांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे सात ‘पीएम मित्र मेगा टेक्स्टाईल पार्क’ची घोषणा केली आहे. हे ‘मेगा टेक्स्टाइल पार्क’ उभारण्यासाठी एकंदर चार हजार ४४५ कोटी रुपये गुंतवणूक केली जाणार आहे. वस्त्रोद्योग क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी सरकारतर्फे घेतला जाणार हा आतापर्यंतचा सर्वात मोठा पुढाकार असेल.

पंतप्रधानांच्या ५-एफ व्हिजन (फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन) पासून प्रेरित ‘प्रधानमंत्री मित्र पार्क योजना’ म्हणजे आत्मनिर्भर भारत आणि ‘व्होकल फॉर लोकल’ या योजनांना साध्य करण्यासाठी एक मोठे पाऊल आहे. वस्त्रोद्योग क्षेत्राला २०३० पर्यंत २५० अब्ज अमेरिकन डॉलरची उलाढाल आणि १०० अब्ज अमेरिकी डॉलर निर्यातीचे उद्दिष्ट गाठायला हे ‘मेगा पार्क’ सहाय्यभूत ठरतील.

हे पाऊल वस्त्रोद्योगासाठी क्रांतिकारक ठरेल आणि प्रत्येक ठिकाणी जागतिक दर्जाच्या सुविधा, अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि एकात्मिक मूल्यशृंखलेच्या योगे भारतात या क्षेत्रातील विश्वविजेते घडवले जातील. प्रधानमंत्री मित्र पार्कची रचना, नियोजन, इमारत, वित्तपुरवठा, संचालन आणि देखभाल यासाठी उत्तरदायी असणाऱ्या एका प्रमुख विकासकाची निवड केली जाणार आहे. वस्त्रोद्योगासाठी ही एक मोठी झेप आहे. याचे कारण सध्या देशभर अस्तित्वात असलेली मूल्यशृंखला ही वितरण साखळीच्या प्रत्येक टप्प्यावर खर्च आणि खोळंबा वाढवण्यास कारणीभूत ठरणारी अशी विस्कळीत स्वरुपाची आहे.

भारतीय वस्त्रोद्योग जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनतील, कारण हे पार्क परिचालनाचे प्रमाण वाढवायला, खर्च कमी करायला, कार्यक्षमता सुधारायला आणि उच्च दर्जाची वस्त्रे आणि प्रावरणे पुरवायला सहाय्यकारी ठरतील. या ‘मेगा पार्क’ योजनेमुळे सुमारे २० लाख प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील. अंदाजे ७० हजार कोटी रुपयांची देशांतर्गत आणि परकी गुंतवणूक आकर्षित केली जाईल. सांडपाण्याचे शून्य उत्सर्जन, सामाईक सांडपाणी प्रक्रिया, प्रदूषणविरहित अशा अक्षय ऊर्जेचा वापर आणि वैश्विक दर्जाच्या सर्वोत्तम प्रक्रियांचा अवलंब यासह हे ‘मेगा पार्क’ निरंतरतेची देदिप्यमान उदाहरणे ठरतील. दोषविरहीत निर्दोष व पर्यावरणाची हानी न करणाऱ्या उत्पादनांची निर्मिती करावी यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाशी हे सुसंगत आहे.

शतकानुशतके, भारतीय कापडाने जागतिक पातळीवर आपला ठसा उमटविला आहे; परंतु दुर्दैवाने, त्यानंतरच्या सरकारांनी या क्षेत्राची केलेली उपेक्षा अनाकलनीय आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा एक प्रमुख आधार असलेल्या, निर्यातीत प्रमुख कमाई करणाऱ्या आणि छोट्या शेतकऱ्यांपासून, सुखवस्तू शहरवासी आणि प्रमुख व्यावसायिकांपर्यंत लाखो लोकांच्या उपजीविकेचा स्रोत असलेल्या वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी ‘पी एम मित्र योजना’ सुरू करणे हे पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचे एक उदाहरण.

‘पीएम मित्र पार्क’ उभारण्यासाठी १३ राज्यांमधून १८ प्रस्ताव आले होते. सात मेगा पार्कची निवड पारदर्शक प्रक्रियेद्वारे करण्यात आली होती. ही प्रक्रिया नावीन्यपूर्ण ‘पी एम गतिशक्ती राष्ट्रीय पायाभूत सुविधा मास्टरप्लॅन’द्वारे प्रमाणित करण्यात आली होती. हे सहकार्यशील संघवादाचे आणखी एक उदाहरण. केंद्र आणि संबंधित राज्ये ही दोन्ही ‘मेगा पार्क’ची स्थापना आणि व्यवस्थापन करणाऱ्या विशेष उद्देश वाहनांमध्ये भागीदार असतील.

राज्य सरकारांचे सहकार्य

संबंधित राज्य सरकारे यासाठी किमान एक हजार एकर इतके भूखंड उपलब्ध करून देतील आणि अखंडित वीज आणि पाणीपुरवठा, कचऱ्याची विल्हेवाट, प्रभावी स्वरुपाची एक खिडकी परवाना प्रणाली, सुरळीत कामकाज आणि व्यवसायसुलभता यांच्या निश्चितीसाठी एक अनुकूल आणि स्थिर धोरणव्यवस्था प्रदान करतील.

हे मेगा पार्क वस्त्रोद्योगासाठी उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्लग-अँड-प्ले सुविधा, तसेच प्रशिक्षण आणि संशोधनासाठी पाठबळ उपलब्ध करून देतील. हे मेगा पार्क म्हणजे, जिथे केंद्र आणि राज्य सरकारे गुंतवणूक वाढवण्यासाठी, नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी, नोकऱ्या निर्माण करण्यासाठी आणि अंतिमत: भारताला वस्त्रोद्योगात जागतिक नेता बनवण्यासाठी एकत्र काम करतील अशा एका वैशिष्ट्यपूर्ण आदर्शांचे प्रतिनिधिक नमुनेच ठरतील.

सर्व भागधारकांशी चर्चा करून सरकारने घेतलेल्या या महत्त्वपूर्ण पुढाकाराला वस्त्रोद्योग क्षेत्राने उत्साही प्रतिसाद दिला आहे. भारतीय उद्योग महासंघ आणि फिक्कीसारख्या प्रमुख उद्योग संस्थांसह वस्त्रोद्योग क्षेत्रातील आघाडीच्या उद्योग संघटनांनी पी एम मित्र मेगा पार्कच्या घोषणेची प्रशंसा केली आहे. वाहतूक खर्चात बचत, आधुनिक पायाभूत सुविधा, वैश्विक स्तरावरील परिचालन आणि केंद्र आणि राज्यांची सहाय्यक धोरणे या सर्व गोष्टी भारतीय वस्त्रोद्योगांना नवीन उंचीवर घेऊन जातील आणि भारतीय आणि परदेशी ग्राहकांना स्पर्धात्मक किमतीत उच्च दर्जाची उत्पादने प्रदान करतील असा आशावाद उद्योग संस्थांनी व्यक्त केला आहे.

वस्त्रोद्योग मंत्रालय या प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर देखरेख करील आणि प्रत्येक मेगा पार्कच्या विशेष उद्देश वाहनाला विकास भांडवल समर्थन या स्वरुपात ग्रीनफिल्ड पार्कसाठी ५०० कोटी रुपये आणि ब्राउनफिल्ड पार्कसाठी २०० कोटी रुपये इतके आर्थिक सहाय्य प्रदान करील. याशिवाय, जलद अंमलबजावणीसाठी प्रोत्साहित करण्याच्या हेतूने प्रत्येक मेगा पार्कातील युनिटना वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून ३०० कोटी रुपये दिले जातील. या युनिट्सना इतरही योजनांच्या सवलती मिळवून देण्यासाठी सहाय्य केले जाईल.

मुक्त व्यापार करारांवर स्वाक्षरी करण्याच्या दृष्टीने पीएम मित्र हे सरकारच्या पुढाकारांशी समन्वय साधतात, ज्यायोगे आपल्या भारतीय वस्त्र-प्रावरणे आणि इतर अनेक क्षेत्रांसाठी विकसित बाजारपेठा खुल्या होतात. भारताने यापूर्वीच युएइ व ऑस्ट्रेलियाशी व्यापार करार केले आहेत. कॅनडा, ब्रिटन व युरोपीय समुदायाशी वाटाघाटी सुरू आहेत. या प्रयत्नांमुळे भारतीय कापडांना फायदेशीर विकसित बाजारपेठांमध्ये खोलवर प्रवेश मिळण्यास मदत होईल आणि जागतिक वस्त्र आणि प्रावरणांच्या व्यापारात देशाचा वाटा वाढण्यास मदत होईल.

भारत हा आधीपासूनच वस्त्रे आणि प्रावरणांचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश आहे, परंतु पंतप्रधान मोदींच्या निर्णायक आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली देश २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना आपल्या देशाला जगातील सर्वात मोठा निर्यातदार बनवणे ही अमृत काळातील आमची आकांक्षा आहे.

(लेखक केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, वस्त्रोद्योग ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री आणि राज्यसभेतील सभागृह नेते आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com