पोकेमॉन - पोरखेळ की खेळखंडोबा !

डॉ. केशव साठ्ये
सोमवार, 1 ऑगस्ट 2016

अतिवास्तवतेचा आभास देणाऱ्या ‘पोकेमॉन गो‘ या नव्या व्हिडिओ गेमने जगभरात धुमाकूळ घातला आहे. यातून उद्‌भवणारे आरोग्य, सामाजिक आणि उन्मादाचे धोके टाळण्यासाठी निश्‍चित धोरण ठरवावे लागेल. 

 

अतिवास्तवतेचा आभास देणाऱ्या ‘पोकेमॉन गो‘ या नव्या व्हिडिओ गेमने जगभरात धुमाकूळ घातला आहे. यातून उद्‌भवणारे आरोग्य, सामाजिक आणि उन्मादाचे धोके टाळण्यासाठी निश्‍चित धोरण ठरवावे लागेल. 

 

‘एखादी 30 सेकंदांची जाहिरात लाखो रुपयांचा माल विकत असेल, तर एक तासाचा व्हिडिओपट त्यात दाखवलेल्या दृश्‍यांचे प्रेक्षकांवर गारुड का करणार नाही ?‘ एका हिंसक कार्टूनपटाचा परिणाम होऊन एका पौगंडावस्थेतील मुलाने विध्वंस केल्याच्या खटल्यात आरोपीच्या वकिलाने न्यायालयात हा प्रश्न उपस्थित केला, तेव्हा न्यायाधीशही क्षणभर अवाक्‌ झाले होते. व्हिडिओ गेम्स आणि हिंसा या विषयावरील एका पुस्तकात ही अमेरिकेत घडलेली सत्यकथा काही वर्षांपूर्वी वाचली होती. तेव्हा ‘आपला याच्याशी काय संबंध?‘ असे म्हणून ते विसरूनही गेलो होतो. पण तेव्हा असे नव्हते वाटले, की हे व्हिडिओ गेम्सचे वादळ आपल्यासमोरही असे काही काळजीत टाकणारे प्रश्न निर्माण करील. 

 

‘अँग्री बर्ड‘, ‘कॅंडी क्रश‘, ‘वॉर क्राफ्ट‘ या खेळांमुळे भारतीय तरुणाई वेडी झालेली आपण पाहिली. आता ‘पोकेमॉन गो‘ नावाचा व्हिडिओ गेम सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, कॅनडामधील तरुण या ‘पोकेमॉन‘ला पकडण्यासाठी समुद्रकिनारी, मॉल्स यामधून सैरावैरा धावताना दिसत आहेत. अतिवास्तवतेचा आभास देणाऱ्या या खेळाने उत्पन्नाचे आणि लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मोडले आहेत आणि केवळ तरुणच नाही, तर ज्यांनी लहानपणी ‘पोकेमॉन‘ टीव्ही वर पाहिला आहे, ते मध्यमवयीन प्रौढही यामागे धावत आहेत. उत्तर अमेरिकेतील गुटेमाल शहराजवळ तर दोघे जण या खेळाच्या नादात मृत्युमुखी पडल्याची घटना समोर आली आहे. आता तर त्याचे लोण दिल्ली आणि पुण्या-मुंबईतील तरुणाईपर्यंत पोचले आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही या खेळाने काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या खेळात ‘जीपीएस‘ तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्यामुळे अनेक सार्वजनिक जागांचे, संवेदनशील जागांचे छायाचित्रण जगजाहीर होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे आखाती देशांत, इंडोनेशिया आणि कुवेतमध्ये या खेळावर निर्बंध घालण्यात आले आहेत. भारतात हा खेळ अधिकृतरीत्या येईल, तेव्हा सरकारला यातून निर्माण होणारे आरोग्यविषयक, सामाजिक आणि उन्मादाचे संभाव्य धोके टाळण्यासाठी काही निश्‍चित धोरण ठरवावे लागेल. 

 

मोबाईलधारकांमध्ये चीननंतर आपण जगात दुसऱ्या स्थानावर आहोत आणि स्मार्टफोनधारकांच्या संख्येने दहा कोटींचा आकडा ओलांडला आहे हे वास्तव आपल्याला किती सुखावणारे वाटले होते नाही? पण आता मोबाईल फोनचा वापर करून ‘सेल्फी‘ काढतानाच्या घडलेल्या दुर्घटना, अश्‍लील फोटो काढून ते सर्वदूर पसरवल्याच्या बातम्या, अश्‍लील चित्रफिती पाहण्यात लहान मुलांच्या, तरुणांच्या संख्येमध्ये झालेली वाढ, हे सर्व पाहता या ‘विकासवृक्षा‘ची विषवल्ली आपल्याला जाणवू लागली आहे. कारण अत्यंत निरुपद्रवी वाटणारे आणि मुलांना तासनतास गुंतवून ठेवणारे हे व्हिडिओ गेम्स ही व्यसन केंद्रे होऊ लागली आहेत. 

 

या व्हिडिओ गेम्समध्ये हिंसेचा भडीमार करणारे अनेक खेळ आहेत. ते खेळता खेळता मुलांची हिंसेबद्दलची संवेदनशीलताच नष्ट होते, असे अनेक संशोधन प्रकल्पांतून स्पष्ट झाले आहे. अमेरिकेत तर दहा मुलांमधील एक मुलगा हा व्हिडिओ गेमच्या व्यसनाच्या जाळ्यात अडकल्याचे एका संशोधन अहवालातून निष्पन्न झाले आहे. शारीरिक आणि मानसिक अशा अनेक व्याधी त्यामुळे अमेरिकन मुलांमध्ये निर्माण होताना दिसत आहेत. हे थरारक वादळ आता भारताच्या किनाऱ्यापर्यंतही पोचले आहे. 

 

वेगाने विकसित होणारे तंत्रज्ञान आणि त्यामुळे आधुनिक साधनांची होणारी उपलब्धता आणि त्या तंत्र जगताला, तंत्र संस्कृतीला आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यास आवश्‍यक असे विकसित समाजमन यातील विसंगती हे या सर्व समस्येचे महत्त्वाचे कारण दिसते. आपला चार-पाच वर्षांचा मुलगा किती सहजपणे मोबाईल हाताळतो याचे कौतुक रास्त आहे; पण त्याचबरोबर त्या यंत्राच्या साह्याने त्यांनी काय ऐकावे, काय पाहावे हा बाळकडू देण्यात मात्र आपण कमी पडतो आहोत. 

 

मुलांनी झोपून राहावे म्हणून कामावर जाताना त्याला अफू देणारी अशिक्षित मजूर स्त्री आणि आपल्या दैनंदिनीत व्यत्यय नको म्हणून मुलाच्या हातात मोबाईलरूपी व्यसन लावणारे उपकरण देणारे सुशिक्षित पालक यांच्यामध्ये फरक तरी कसा करायचा? मग मोठी झाल्यावर ही मुले समाजमाध्यमातील मयसभातून वारंवार पाय घसरण्याचा अनुभव घेतात. घरातील सर्वसाधारण संस्कार आणि हे आभासी जग याचा ताळमेळ मुलांना लावता येत नाही. या मुलांना मनोरंजनासाठी आपण चांगले पर्याय उपलब्ध करून दिले पाहिजेत, त्यांना मैदानी खेळांची जादू अनुभवायला दिली पाहिजे. अगदी मोबाईलवरसुद्धा त्यांच्या सृजनतेला वाव देणारे नवनिर्मितीला उद्युक्त करणारे खेळ खेळायला प्रोत्साहित केले पाहिजे. किंबहुना त्यांच्या मनोरंजनाच्या, आनंदाच्या, रोमहर्षकतेच्या व्याख्या बदलायला आपण त्यांना उद्युक्त केले पाहिजे. 

 

सध्या आपल्या देशात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ठरवले जात आहे. त्यात माहिती तंत्रज्ञानावर भर आहेच, पण या धोरणात नवमाध्यमाच्या या दुष्परिणामांना तोंड देण्यासाठी काही उपाययोजना प्राधान्याने आखल्या गेल्या पाहिजेत. अभ्यासक्रमाच्या माध्यमातून, शिक्षक हस्तपुस्तिकेतून, मूल्यशिक्षणाच्या पाठाद्वारे या माध्यमाच्या अयोग्य वापरातून निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्‍यांची जाणीव शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांनाही करून द्यायला हवी. 

 

सध्या थैमान घालत असलेल्या एकट्या ‘पोकेमॉन‘ या खेळापुरता हा प्रश्न मर्यादित नाही. हा प्रश्न त्याच्या मागे धावण्याचाही नाही, हा प्रश्न आहे सध्या होत असलेल्या आपल्या निर्हेतुक वणवणीचा. या आभासी जगाची खरी ओळख आपल्या तरुणाईला नीट झाल्याशिवाय ही ध्येयशून्य पायपीट थांबणे अवघड वाटते. 

 

(लेखक प्रसारमाध्यम अभ्यासक आहेत)

Web Title: Pokemona - porakhela of khelakhandoba!