राजकीय निष्ठावंत

राजकीय निष्ठावंत

गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याविषयी सर्वांनाच उत्सुकता होती. भारतीय जनता पक्ष तेथे जुन्या जाणत्या नेत्याला संधी देणार की नव्या नेतृत्वाला वाव देणार, याविषयीही चर्चा आणि तर्कवितर्क सुरू होते. आता मुख्यमंत्रिपदी विजय रुपानी यांची निवड होऊन त्यांचा शपथविधी झाला आहे. या चर्चेला पूर्णविराम मिळाला असला, तरी पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी निष्ठावंत असलेल्या रुपानी यांच्या गळ्यात ही माळ घातली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निष्ठावंत म्हणून अमित शहा यांचे नाव घेतले जाते. त्याचप्रमाणे शहा आणि रुपानी यांचे नाते आहे. यामुळेच ज्येष्ठ नेत्यांना डावलून त्यांना संधी देण्यात आली. पटेल आरक्षणाबाबत सुरू असलेल्या आंदोलनाचा विचार करता पक्षानेही जैन बनिया व्यक्तीला मुख्यमंत्री करून पटेल आणि दलित असे धुव्रीकरण टाळून सावध खेळी केली. 


रुपानी यांचा एकंदर राजकीय उदय पाहता त्यांच्या बदललेल्या निष्ठा त्यांच्यासाठी फलदायी ठरलेल्या दिसून येतात. पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मंत्रिपद आणि त्यातच महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी मिळणे, हा निव्वळ योगायोग नाही. जलसंपदा, कामगार आणि रोजगार मंत्रालयाची धुरा त्यांच्याकडे होती. त्यातच प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारीही तेच सांभाळतात. म्हणजेच नवख्या नेत्याला एवढ्या जबाबदाऱ्या आणि आता मुख्यमंत्रिपद हे रुपानी यांच्या पक्षीय कार्यकर्तृत्वाची पावती आहे. विद्यार्थी दशेपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व पक्षाशी त्यांची नाळ जोडली गेली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून त्यांची राजकीय वाटचाल सुरू झाली. त्यांचा प्रवास राजकोटचे नगरसेवकपद ते महापौर आणि आता आमदारपदापासून मुख्यमंत्रिपदापर्यंत पोचला आहे. योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी उपस्थित असण्याची खुबी काही जणांकडे असते. या खुबीचा फायदा रुपानी यांना मोठ्या प्रमाणात मिळत आला आहे.
प्रशासकीय अनुभवाचा रुपानी यांच्याकडे अभाव आहे; मात्र, संघटनात्मक पातळीवर काम करण्याचा त्यांचा अनुभव मोठा आहे. अनेक वर्षे ते पक्षाचे सौराष्ट्र विभागाचे प्रमुख होते आणि नंतर पक्षाचे सरचिटणीस होते. केशुभाई पटेल यांना सोडून नरेंद्र मोदींच्या बाजूला येण्याचे फळ रुपानी यांना राज्यसभेच्या रूपाने मिळाले. ते 2006 ते 12 मध्ये राज्यसभा सदस्य होते. सौराष्ट्रातील वजनदार नेते वजूभाई वाला यांना कर्नाटकच्या राज्यपालपदी 2014 मध्ये पाठविण्यात आले. हे रुपानी यांच्या पथ्यावर पडले. तिथून विधानसभा निवडणूक जिंकून आता दोन वर्षांत ते मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले. पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांची 2015 मध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली. पक्षातील सत्ताकेंद्र ताब्यात ठेवून सरकारमधील सत्ताकेंद्र ताब्यात घेण्यात ते यशस्वी ठरले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com