ढिंग टांग : नेमकं काय ठरलंय?

ब्रिटिश नंदी
बुधवार, 26 जून 2019

‘आमचं ठरलंय...आमचं ठरलंय...आमचं ठरलंय...’ हे ऐकून ऐकून आमचे कान अगदी किटून गेले आहेत. असह्य झाले, तेव्हा आम्ही कानात कापसाचे बोळे घातले. बोटेही घातली, पण आवाज चालूच राहिला. कोण म्हणतो आमचं ठरलंय?

रातकिडा ओरडतो त्याने डोके फिरते. तो कुठे दडून ओरडतो, हे न समजल्याने अधिक डोके फिरते! माहितीच्या अधिकाराचे हे सरळसरळ उल्लंघन आहे. पण रातकिड्याला ते कोणी सांगावे? सांगण्यासाठी तो सापडावयास तर हवा!!

सांप्रत आमची डिट्टो अश्‍शीच परिस्थिती झाली आहे. ‘आमचं ठरलंय...आमचं ठरलंय...आमचं ठरलंय...’ हे ऐकून ऐकून आमचे कान अगदी किटून गेले आहेत. असह्य झाले, तेव्हा आम्ही कानात कापसाचे बोळे घातले. बोटेही घातली, पण आवाज चालूच राहिला. कोण म्हणतो आमचं ठरलंय? शिंच्यास हुडकून काढतोच कसा? ह्या इराद्याने आम्ही सर्व सांदीसपाटीत डोकावून पाहिले. पण किरकीर आपली सुरूच!! एवढी किरकीर ऐकूनही ‘नेमकं’ काय ठरलंय, ह्याची टोटल आजपावेता आम्हास लागलेली नाही. अखेर मनाचा हिय्या करून आम्ही ह्या ‘आमचं ठरलंय’वाल्या रातकिड्याचा शोध लावायचाच, असा निश्‍चय केला आणि निघालो.

‘आमचं ठरलंय...आमचं ठरलंय...आमचं ठरलंय...’ त्या लयीच्या ठेक्‍यावर आम्ही आमची शोधमोहीम चालू केली. आम्ही कमळाबाईचे जितके, तितकेच धनुष्यबाणवाले!! उभयतांमध्ये नेमके काय ठरलेय? हे महाराष्ट्रात कुणालाच कसे ठाऊक नाही? सर्वप्रथम आम्ही कमळाबाईच्या गोटात अंदाज घेतला. पण तेथे कोणालाच काही माहीत नव्हते. तेथे विचारले असता ‘‘कुठला रातकिडा?’’ असा उलटा सवाल एका चष्मिष्ट गृहस्थाने केला. त्यांचे नाव चंदुदादा कोल्हापूरकर असे होते. 

‘‘रातकिडा नाही हो! तुमच्यात नेमकं काय ठरलंय...ते हवाय!,’’ आम्ही.

‘‘ते व्यायाम करणारे गृहस्थ आहेत, त्यांना विचारा! त्यांना हल्ली सगळं माहीत असतं!,’’ असे सांगून चष्मिष्ट गृहस्थ घाईघाईने कोल्हापूरला निघून गेले. व्यायाम करणारे गृहस्थ अर्थातच आमचे मित्र मा. गिरीशभौ महाजनजी होते. त्यांना विचारलं. - नेमकं काय ठरलंय? 

‘‘सगळंच ठरलंय की!,’’ ते हसत हसत म्हणाले. 

‘‘सगळंच म्हणजे नेमकं काय?,’’ आम्ही चिकाटीने विचारले.

‘‘ते तुम्ही सीएमसाहेबांनाच विचारा!’’ त्यांनी एकदम श्‍वास आत ओढून रोखून धरल्याने आमचा नाइलाज झाला. आणखी एक-दोघांना विचारले तर त्यांनी ‘‘तुम्हाला काही कळले, तर आम्हालाही सांगा’ असे हळूचकन सांगून ठेवले. शेवटी आम्ही बांदऱ्याला मातोश्रीच्या गोटात शिरलो. इथे सगळेच आपले लोक असल्याने हमखास माहिती मिळेल अशी खात्री होती.

तिथे दरवाजावर एक लांबुळका इसम उभा होता. आम्ही जवळ जाताच त्याने एक लांब पाय दाराच्या समोरील चौकटीवर आडव्या खांबासारखा टाकला.

‘‘काय हवंय रे?’’ त्यांनी संशयाने विचारले. त्यांच्या कानाशी लागण्यासाठी आम्हाला स्टूल घेऊन टाचा वर करून बोलावे लागले असते. त्यामुळे हातातील वर्तमानपत्राचा भोंगा करून विचारले, ‘‘नेमकं काय ठरलंय?’’ त्यांनी निमूटपणे आडवा खांब उभा करून ‘आतमध्ये ‘इन्फर्मेशन’लाच विचारा!’ असे पडेल आवाजीत सांगितले. इन्फर्मेशन डेस्कावर एक राजपुत्रासारखा तरुण बसला होता.  

‘‘हाय!’’ त्याने हसतमुखाने अभिवादन केले. आम्ही इकडे तिकडे पाहिले. आम्हालाच ना? तेवढ्यात दारातून एक राजबिंडे व्यक्‍तिमत्त्व प्रविष्ट झाले. तुतारी फुंकल्याचा गगनभेदी आवाज आला. ‘हर हर हर हर महादेव’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला. साक्षात माननीय उधोजीसाहेब उभे होते! आम्ही तातडीने मुजरा घातला. ‘‘क्‍या है?,’’ बेसावधपणाने त्यांनी हिंदीत विचारले. मुंबईकराचे असेच होते... ‘‘साहेब, नेमकं तुमचं काय ठरलंय?,’’ मनाचा हिय्या करून आम्ही थेट सवाल केला. 

‘‘कुणी विचारलं की काय ठरलंय? तर ‘आमचं ठरलंय’, असं सांगायचं, हेच ठरलंय!,’’ त्यांनी स्पष्ट शब्द खुलासा केला.

...रातकिड्याची किरकीर अजूनही चालू आहे...अजूनही चालूच आहे!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political Satire in Marathi Dhing Tang