ढिंग टांग : मनधरणी

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 27 जून 2019

मला आता या पुढे अध्यक्ष राहायचं नाहीए! मी राजीनामा दिलाय! राजीनामा दिलेल्या माणसाला काम सांगायचं नसतं, अशी पद्धत आहे जगात!! 

मम्मामॅडम : (दरवाजावर टकटक करत) टक टक टक टक! 
बेटा : (घुश्‍शात) मुझे अकेलाही छोड दो! 
मम्मामॅडम : (उमेदीने) तू हल्ली कोणालाही भेटत का नाहीस? लोक वाट पाहतायत तुझी! 
बेटा : (चुळबुळत) कोणीही वाट पाहत नाहीए माझी! 
मम्मामॅडम: (समजूत घालत) तू पक्षाचा अध्यक्ष आहेस, बेटा! इच्छा असो वा नसो, कधी कधी जावं लागतं कचेरीत! 
बेटा : (हट्‌टानं) नोप! मी या पुढे त्या ऑफिसात कधीही जाणार नाही!! 
मम्मामॅडम: (आमिष दाखवत) ऐसा दिल खट्‌टा ना करो! तू ऑफिसात नुसता चक्‍कर मारून आलास तरी मी तुला छानपैकी पिझ्झा करुन देईन! 
बेटा : (कडवटपणाने) मला नकोय पिझ्झा! मला आता या पुढे अध्यक्ष राहायचं नाहीए! मी राजीनामा दिलाय! राजीनामा दिलेल्या माणसाला काम सांगायचं नसतं, अशी पद्धत आहे जगात!! 
मम्मामॅडम : (विचारात पडत) ते अहमद अंकल केव्हापासून घराबाहेर उभे आहेत! त्यांना दारसुद्धा नाही उघडलंस? 
बेटा : (उदासपणे) अहमद अंकल नेहमी कागदपत्रं घेऊन सह्या घ्यायला येतात! कुठल्याही कागदावर मी सही करणार नाही आता! 
मम्मामॅडम: (संयमानं) तुझ्या अशा वागण्यानं आपल्या पक्षातली उरलीसुरली सगळी मंडळी आता पुन्हा माझ्या दारात यायला लागली! एक मिनिट फुर्सत मिळेल तर शपथ!! त्यांना तोंड देताना माझी पुरेवाट होतेय!! रिटायरमेंटनंतर मम्माला इतका त्रास देऊ नये रे!! 
बेटा : (दोन्ही हात डोक्‍यामागे नेत सहजपणाने) कांट हेल्प! 
मम्मामॅडम : (समजूत घालत) एक इलेक्‍शन हरल्यानंतर इतका मूड गेला तुझा? आश्‍चर्यच आहे! मला वाटलं होतं, तुला एव्हाना सवय झाली असेल! 
बेटा : (गाणं गुणगुणत) दुखी मन मेरे सुन मेरा कहना, जहां नहीं चैना, वहां नही रहनाऽऽऽ 
मम्मामॅडम : (हताशेनं) इलेक्‍शन झालं! तुझी फॉरेन ट्रिपदेखील झाली!...सगळं मनासारखं झालं! अजून काय हवंय तुला? 
बेटा : (खुर्चीतल्या खुर्चीत आडवा होत) आराम! 
मम्मामॅडम: (किंचित वैतागून) हे आरामाचं वय आहे का तुझं? मला आराम मिळावा, म्हणून मेलं मी कित्ती राजकारण करून तुला तिथं बसवलं! शेवटी झालं काय? निवृत्तीनंतर मलाच करावी लागताहेत तुझी कामं! 
बेटा : (कोरडेपणानं) सॉरी! 
मम्मामॅडम : (कमरेवर हात ठेवून जाब विचारल्यागत) तुला हवंय तरी काय? तू म्हणशील ते सर्व करायला आम्ही तयार आहोत! तुला वाटेल तसा तू पक्ष चालव! तुला कोणीही काहीही बोलणार नाही! पूर्ण स्वातंत्र्य घे, पण पक्षाला असं वाऱ्यावर सोडू नकोस!! बाहेर बघ जरा, किती लोक ताटकळताहेत तुझी मनधरणी करायला!! त्यांना बघून तुझं मन द्रवत कसं नाही? स्वत:साठी नाही, तरी त्यांच्यासाठी तरी पक्ष सांभाळ! तुझ्याशिवाय त्यांना आहेच कोण? 
बेटा : (ठामपणाने) नाय नो नेव्हर! मैंने एकबार ठान ली, तो मैं खुद की भी नहीं सुनता!! 
मम्मामॅडम : (मनधरणी करत) प्लीऽऽऽज! मम्मासाठीसुध्दा एवढं नाही करणार? 
बेटा : (थोडा विचार करत) ओके! ठीकंय...मी पक्ष सांभाळायला तयार आहे, लेकिन एक शर्तपर! 
मम्मामॅडम : (उजळलेल्या चेहऱ्यानं) शर्त मंजूर है! बोल!! 
बेटा : (पेचात टाकत) पहिले वो मोदीजी और अमित शहा को वहां से निकाल दो!!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political Satire in Marathi Dhing Tang