ढिंग टांग : बदाम, आक्रोड!

ब्रिटिश नंदी
सोमवार, 1 जुलै 2019

दिल्लीतील आरोग्य मंत्रालयातील नोकरदारांना यापुढे चहा-बिस्कुटे, वडा, भजी आदी पदार्थ खाण्यास मनाई करून त्याऐवजी बदाम, पिस्ते, आक्रोड, भाजके चणे आणि दूध असे सकस पदार्थ उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्यमंत्री मा. श्री. हर्षवर्धन ह्यांनी घेतल्याचे वाचनात आले.

प्रति, मा. मुख्यमंत्री, 
दिल्लीतील आरोग्य मंत्रालयातील नोकरदारांना यापुढे चहा-बिस्कुटे, वडा, भजी आदी पदार्थ खाण्यास मनाई करून त्याऐवजी बदाम, पिस्ते, आक्रोड, भाजके चणे आणि दूध असे सकस पदार्थ उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्यमंत्री मा. श्री. हर्षवर्धन ह्यांनी घेतल्याचे वाचनात आले. मा. हर्षवर्धन ह्यांच्या ह्या निर्णयाला मी सहर्ष पाठिंबा देत असून, ह्याच धर्तीवर आपणही महाराष्ट्रात, मंत्रालयीन कर्मचाऱ्यांना वर उल्लेखिलेले खाद्यपदार्थ उपलब्ध करून द्यावेत, अशी शिफारस येथे करीत आहे. कृपया येत्या क्‍याबिनेट मीटिंगमध्ये ह्या सूचनेचा (बदाम-पिस्ते चघळत) विचार व्हावा, ही विनंती. 
आपला आज्ञाधारक. जी. भाऊ. (जलसंपदा) 
ता. क. : जलसंपदा खात्याशिवाय वैद्यकीय शिक्षण खातेही आमच्याकडेच आहे, ह्याची नोंद घ्यावी. थॅंक्‍यू! 
प्रत रवाना : सर्व मंत्री सहकारी व आमदारे. 
* * * * 
प्रति मा. श्री. नानासाहेब, जी. भाऊंचा निवेदन अर्ज वाचला का? कल्पना वाईट नाही. लोकांची कामे करणारा वर्गच कुपोषित राहून कसा चालेल? हजार मरोत, परंतु हजारांचा पोशिंदा जगला पाहिजे असा सुविचारच आहे. आमच्या महसूल खात्यातील कर्मचाऱ्यांकडे मी खडा टाकून पाहिला. "तुम्हाला काजू, पिस्ते, बदाम वगैरे पुरवतो' असे सांगितल्यावर खूश झाले. तथापि, काही लोकांनी सा. बां. वि. च्या विश्रामगृहात "मसाला काजू, तुकडा चकली, तिखट चणे पुरवा' अशीही विनंती करून ठेवली आहे.
कळावे. आपला.
चंदुदादा कोल्हापूरकर (महसूल व सा. बां. वि.) 
* * * 
श्री. नानासाहेब यांसी, कालपरवाच तुमच्या पक्षात आलो. कालपरवाच शपथविधीही झाला. अजून गृहनिर्माण विभागाच्या मंत्री-दालनात सेटलही झालो नाही, तेवढ्यात "बदाम हवे की आक्रोड? असा प्रश्‍न पुढ्यात आला आहे!! ह्यालाच अच्छे दिन म्हणत असतील!! हो ना? पुनश्‍च एकवार, अनेकवार आभार!! भाजके चणे पाठवलेत तरी गोड मानून घेईन (सांगतो कोणाला?) आपला. व्ही-पी. (माजी विरोधी पक्षनेता...अजूनही माझी हीच ओळख आहे! असो!!) 
* * * 
नानासाहेब सा. न., कळविण्यास अत्यंत आनंद होतो की केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पुढाकार घेऊन आपल्या मंत्रालयात बिस्कुटे बाद करून बदाम, पिस्ते, काजू, आक्रोड आदी सुकामेवा उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. त्याच धर्तीवर आमचे खाते नव्या धर्तीचा एनर्जीबार (पक्षी : चिक्‍कीच!) बनवून त्याचे वाटप करण्यास सक्षम आहे. कळावे. आपली.
पं. मुं. (ग्रामीण विकास, महिला बालकल्याण) 
* * * 
सर्व सहकारी, केंद्रीय आरोग्य मंत्री. डॉ. हर्षवर्धन ह्यांनी आपल्या मंत्रालयात सकस सुकामेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय निदर्शनास आला असून त्यावर अभ्यास चालू आहे!! तसेच, सदर निर्णयावर आधारित आपण सहकाऱ्यांनी केलेले विचार मंथनही सरकारने पाहिले असून त्यावरही अभ्यास चालू आहे!! 
जी. भाऊ हे व्यायामपटू असल्याने त्यांना बदामपिस्त्यांचा खुराक आवश्‍यक वाटणे साहजिकच आहे. परंतु, मा. चंदुदादा कोल्हापूरकरांनी सदर बदामपिस्ते तळलेल्या आणि खारवलेल्या स्थितीत पुरवावेत, अशी उपसूचना मांडली आहे, ती मात्र अंमळ संशयास्पद वाटत असल्याने त्याचाही अभ्यास करावा लागेल. माहिती अधिकाराच्या क्षेत्रात ही बाब येत असल्याने येणाऱ्या काळात "बदाम घोटाळा' बाहेर येण्याची शक्‍यताही गृहित धरावी लागेल. बदामाची चिक्‍की ही महागडी बाब आहे, ह्याचीही आपल्या सरकारने दखल घेतली आहे. एकंदरीत विचार करता पुढल्या टर्ममध्ये ह्याबाबत प्रस्ताव आणावा, असे ठरले आहे. कृपया नोंद घ्यावी. आपला.
नाना फडणवीस. (मु. म.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political Satire in Marathi Dhing Tang