ढिंग टांग : मी आणि 'मी'!

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 2 जुलै 2019

"माझी 'मन की बात' एरवी कोट्यवधी लोक ऐकतात. तुला एकदाही ऐकता येत नाही? पे अटेन्शन!'' मग काय, बसला ऐकत. शेवटी मला न सांगताच तो बहुधा सटकला. जाऊ दे झाले!

मित्रों, इलेक्‍शनच्या आधी फेब्रुवारीत मी तुम्हाला रेडिओवरून शेवटचे भाषण दिले होते. आता एकदम जुलैमध्ये भेटू असे सांगून मी गेलो होतो. मार्च, एप्रिल, मे आणि जून!...चार महिन्यांचा हा विरह सहन होण्यासारखा का होता? छे! तुमचे चार महिने धामधुमीत गेले; पण मला एकदम विरक्‍तीच आली. राजकारण हे असार आहे, असे वाटू लागले. शेवटी भयंकर विरक्‍ती आल्याने मी केदारनाथच्या गुहेत जाऊन तपश्‍चर्या करून आलो. तिथल्या गुहेत काही तास काढून मी पुन्हा माणसात, म्हणजे तुमच्यात आलो! मी तिथे कशाला गेलो होतो? असे तुम्ही विचाराल. सांगू?

मी तिथे एका माणसाला भेटायला गेलो होतो. तो माणूस म्हणजे मीच!! गुहेत आम्ही दोघे होतो. चिक्‍कार गप्पा मारल्या. उणीदुणी काढली. जुन्या आठवणी काढून एकमेकांना गोरेमोरे केले. त्याला माझी 'मन की बात' ऐकवली. तो सारखा जांभया देत होता; पण मी हटलो नाही. त्याला म्हणालो, "माझी 'मन की बात' एरवी कोट्यवधी लोक ऐकतात. तुला एकदाही ऐकता येत नाही? पे अटेन्शन!'' मग काय, बसला ऐकत. शेवटी मला न सांगताच तो बहुधा सटकला. जाऊ दे झाले! 

तुम्ही स्वत:ला भेटायला तिथे का गेलात? ही काय भानगड? असे कुणी मला विचारले तर त्याचे उत्तर- "अस्संच! तुम्हाला काय करायचेय?'' हे आहे. पण मी ते देणार नाही. कारण तसे उत्तर देणे अहंकारीपणाचे आहे आणि मी-एखाद्याने कांदा-लसूण खाणे सोडावे, तद्वत अहंकार सोडला आहे. 

दिलेल्या शब्दाला जागून मी पुन्हा आपल्या (आकाशवाणीच्या) सेवेत हजर झालो आहे. मित्रों, मी आलेलो नाही, लालेलो आहे... याने मैं आया नहीं, लाया गया हूँ!! जिसने मुझे लाया उसे ढूँढो मत... वो तुमही हो!! तुम्हीच फिर एकबार मला ही संधी दिलीत, त्याबद्दल मी तुम्हाला शतशत् नमन करतो. 

मित्रों, गेल्या पाच वर्षांत मी रेडिओवरून एकंदर त्रेपन्न भाषणे दिली. त्रे-प-न्न! पन्नास तीन!! छप्पन भाषणे देण्याचा संकल्प होता; पण महिनेच कमी पडले, त्याला काय करणार? ह्या टर्ममध्ये वर्षाला तेरा महिने करण्याचे क्‍यालिंडर तयार करायची योजना आहे. हा जादा महिना फ्री असेल, ह्याची जनतेने नोंद घ्यावी. सव्वाशे कोटी लोकांसाठी क्‍यालिंडराचाही विकास करणे हे माझे कर्तव्यच आहे. म्हणजेच येत्या पाच वर्षांत मला साठ भाषणे देता येतील. 

माझी रेडिओ भाषणे तुम्ही किती मन लावून ऐकता? गावोगावची मंडळी रेडिओसमोर बसून माझी 'मन की बात' मनोभावे ऐकतात. मला असे सांगण्यात आले आहे, की अनेक गावांमध्ये लोक सकाळी आंघोळ बिंघोळ करून कानबिन साफ करून रेडिओसमोर फुले ठेवून माझी 'मन की बात' ऐकतात. हे ऐकून माझे मन फुलून आले! काही लोक आधी भाषण ऐकून मग आंघोळीला जातात, असेही माझ्या कानावर आले आहे! काही मोजके लोक भाषण ऐकल्यानंतर आंघोळीला सरळ चाट देतात आणि थेट जेवूनच घेतात, असेही कळले आहे; पण काही लोक जाम ऐक्‍कत नाहीत! 

...ह्या वेळची 'मन की बात' तुम्हाला थोडीशी वेगळी वाटली का? मला वाटली. केदारनाथाच्या गुहेत मी आणि मी स्वत: असे दोघे भेटलो होतो. त्यातला एक तिथेच राहिला, एकाने येऊन ही 'मन की बात' सांगितली. कौन गया? कौन लाया गया? केदारनाथाला ठाऊक. असो. जय हिंद.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political Satire in Marathi Dhing Tang