ढिंग टांग : गदा आणि गदागदा!

ब्रिटिश नंदी
शनिवार, 6 जुलै 2019

गदा? मी कशाला गदाबिदा घेईन खांद्यावर? छे!! साधा धनुष्यबाण घेतला तरी रग लागते माझ्या खांद्याला! तलवारसुद्धा जरा हलकी देत चला, अशा सूचना देऊन ठेवल्या आहेत मी आपल्या मावळ्यांना! गदा कुठली फिरवतोय!! 

स्थळ : मातोश्री हाइट्‌स, वांद्रे. 
वेळ : नीजानीज. 
काळ : गुड नाइटपूर्वीचा. 
पात्रे : आपलीच! 

चि. विक्रमादित्य : (दार ढकलून आत येत) हाय देअर बॅब्स... मे आय कम इन? 
उधोजीसाहेब : (पांघरुणाची घडी पायाने सोडवत) नोप! 
विक्रमादित्य : (गंभीर चेहऱ्यानं) थोडा सीरिअस टॉक करायचा आहे!! 
उधोजीसाहेब : (पांघरूण घेत) उद्या... उद्या सकाळी बोलू! 
विक्रमादित्य : (आग्रहाने) सीरिअस आहे ना पण! अर्जंट आहे एकदम! 
उधोजीसाहेब : (शांतपणे समजूत घालत) असं काहीही नसतं मुला! जगातली कुठलीही गोष्ट बारा तास थांबू शकते आणि अर्जंट असं ह्या जगात काहीही नसतं! कळेल तुला हळूहळू! गुड नाइट!! 
विक्रमादित्य : (ठामपणाने) राज्याचं पुढलं बजेट मी सादर करणार आहे, असं आपलं ठरलंय ना? 
उधोजीसाहेब : (तितक्‍याच ठामपणाने) नाही! असं काहीही ठरलेलं नाही!! 

विक्रमादित्य : (चिडक्‍या सुरात) पुढला सीएम मी होणार, असं ठरलेलं आहे की नाही? 
उधोजीसाहेब : (सावधपणाने) शूऽऽऽ हळू बोल! त्याला वेळ आहे अजून! इतकं काही अर्जंट नाहीए ते! तू झोपायला जा कसा!! 
विक्रमादित्य : (काहीएक न ऐकता) मग देवेन अंकलच्या ह्या कवितेचा अर्थ काय? 
उधोजीसाहेब : (खचून जात) रात्री झोपायच्या वेळेला कविताबिविता नको रे!! 
विक्रमादित्य : (खिशातला कागद काढून वाचत) मी पुन्हा येईन, ह्याच निर्धाराने, ह्याच भूमिकेत... नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी!! व्हॉट डझ दॅट मीन? सांगा, सांगा ना!! 

उधोजीसाहेब : (गुळमुळीतपणे) कवितेत असं म्हणावं लागतं बाबा! उदाहरणार्थ, "एक तुतारी द्या मज आणुनी, फुंकीन मी जी मत्प्राणाने' असं कवी म्हणतो, तेव्हा खरंच कुणी त्याला तुतारीबितारी आणून दिली, तर त्याला फुंकता येईल का? 
विक्रमादित्य : (पॉइण्ट कन्सीड करत) ओके! मग तुम्ही परवा गदा का घेतलीत खांद्यावर? 
उधोजीसाहेब : (चक्रावून जात) गदा? मी कशाला गदाबिदा घेईन खांद्यावर? छे!! साधा धनुष्यबाण घेतला तरी रग लागते माझ्या खांद्याला! तलवारसुद्धा जरा हलकी देत चला, अशा सूचना देऊन ठेवल्या आहेत मी आपल्या मावळ्यांना! गदा कुठली फिरवतोय!! 

विक्रमादित्य : (आरोप करत) येस्स! गदाच!! परवा देवेन अंकलच्या साथीनं तुम्ही अटल उद्यानाच्या उद्‌घाटनावेळी खांद्यावर गदा घेऊन घोषणा दिल्या होत्या! आय हॅव सीन विथ माय ओन आइज!! 
उधोजीसाहेब : (एकदम आठवून) हांहां!! ते होय!! अरे तीसुद्धा एक गंमतच होती! अटल उद्यानात गेल्या गेल्या मला आपल्या मित्रपक्षाच्या लोकांनी हातात गदा दिली, तेव्हा कसंतरीच झालं! 
विक्रमादित्य : (संशयानं) काय झालं नेमकं? उधोजीसाहेब : (आवंढा गिळत) गदगदून आलं होतं! त्याच गदगदलेल्या आवाजात मी म्हणालो की "ही गदा आम्ही एकमेकांवर चालवणार नसून, विरोधकांना गदागदा हलवण्यासाठी वापरणार आहोत!!' (मवाळपणे) आता आपलं मैत्रीचं पर्व चालू आहे! ह्या पर्वात गदाबिदा चालवणं योग्य नाही!! 

विक्रमादित्य : (हाताची घडी घालून जाब विचारल्यागत) तुमची ती गदा कुठे आहे? 
उधोजीसाहेब : (पलंगाखाली नजर टाकत) सुरक्षित ठिकाणी ठेवली आहे! भलत्याच्या हाती लागावं, असं ते शस्त्र नाही!! 
विक्रमादित्य : (थंड सुरात) मला हवी आहे ती गदा! द्या!! 
उधोजीसाहेब : (तितक्‍याच थंड सुरात) गदायुद्धाची पहिली अट माहिती आहे? 
विक्रमादित्य : (आव्हानात्मक सुरात) सांगा! 
उधोजीसाहेब : (गंभीरपणाने) ती उचलता येणं ही! कळलं? गुड नाइट!!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political Satire in Marathi Dhing Tang