ढिंग टांग : राजीनामा देऊ कुणा?

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 9 जुलै 2019

आपल्या पार्टीत प्रत्येक जण हा कुठला ना कुठला नेताच असतो. कार्यकर्ता कोणीही नाही. मी मात्र कार्यकर्ताच आहे व राहू इच्छितो. इतक्‍या वर्षात लोकांनी इतक्‍या पार्ट्या बदलल्या; पण मी पार्टी कधीही सोडली नाही. पार्टी सोडणारे नेते असतात, कार्यकर्ते नाही, हे खरे आहे.

प्रति, 
टू व्हूम सो इट मे कन्सर्न 

विषय : कांग्रेस पक्षाचा राजीनामा देणेबाबत. 

महोदय किंवा महोदया, 
आयुश्‍यात पैल्यांदा पत्राचा मजकूर तयार असला तरी मायना सापडायला तयार नाही, अशी सिच्युएशन आली आहे. मी कांग्रेस पार्टीचा पहिल्यापासून एकनिष्ठ व प्रामाणिक कार्यकर्ता असून आपल्या पार्टीत मी बहुधा एकलाच कार्यकर्ता असेन.

कारण आपल्या पार्टीत प्रत्येक जण हा कुठला ना कुठला नेताच असतो. कार्यकर्ता कोणीही नाही. मी मात्र कार्यकर्ताच आहे व राहू इच्छितो. इतक्‍या वर्षात लोकांनी इतक्‍या पार्ट्या बदलल्या; पण मी पार्टी कधीही सोडली नाही. पार्टी सोडणारे नेते असतात, कार्यकर्ते नाही, हे खरे आहे. पत्र लिहिण्यास कारण की सध्या आपल्या पक्षाचे पुनर्वसन करण्याच्यासाठी राजीनामे देण्याचे लोण आले आहे. पुनर्वसन म्हटले की आपल्याला उत्साह येतो. मी म्हटले, आपणही राजीनामा देणे कर्तव्याचे ठरेल. पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून ही डूटी निभावण्यासाठीच लेटर लिहायला घेतले; पण ते पाठवायचे कुणाकडे? असा सवाल निर्माण झाला आहे; परंतु अध्यक्षापासून गल्लीप्रमुखापर्यंत सर्व्यांनी राजीनामा दिल्यावर राजीनामा कुठे द्यावा? मायन्यात कोणाचे नाव घालावे? ह्या प्रश्‍नांची उत्तरे मिळाल्याशिवाय राजीनामा देण्यात पॉइण्ट नाही, असे वाटते. 

पैल्यांदा मी आमचे राज्य अध्यक्ष मा. आशुकरावसाहेबांना भेटलो. राजीनाम्याचा कागद बघून ते असे मलूलपणाने हसले की मी निमूटपणाने निघून आलो! मोठ्या माणसांचा सल्ला घ्यावा, म्हणून मी मा. बाबाजी चव्हाणसाहेबांना भेटलो. धक्‍का बसल्यासारखे करून ते म्हणाले, ""हे काय आणलं?'' मी म्हटलं, "राजीनामा!'' त्याचे काय करावे? असा प्रश्‍न त्यांना पडला. शेवटी कागद माझ्या हातात देऊन ते म्हणाले, "हा गंभीर विषय आहे. तू शहर अध्यक्षांकडेच जा...रीतीप्रमाणे होऊ दे!'' त्याप्रमाणे राजीनामा पत्र घेऊन मी आमच्या शहर अध्यक्षांकडे गेलो. तेव्हा ते घरच्या घरी सोफ्यावर बसून पेशन्सचा पत्त्यांचा डाव लावून बसले होते.

तिथे गेल्यानंतर कळाले की ज्याच्याकडे आपण शहर अध्यक्ष म्हणून आलो, ते आता शहर अध्यक्ष काय, पक्षाचे कोणीच नाहीत!! तरीही त्यांना राजीनामा सुपूर्द केला. ते म्हणाले की "मला काढून टाकण्यात आले असून, तू राजीनामा मिलिंदभाई देवराजींकडे देऊन टाक...विषय संपीव!'' त्याप्रमाणे मी टाकोटाक दक्षिण मुंबईची बस पकडून त्यांच्याकडे गेलो. ते कानात काडी घालून म्हणाले, ""मला कशाला देतो तो कागद? मी कोणीही नाही. मीच राजीनामा दिला आहे..!'' गेल्यापावली परत यावे लागले. 

हे प्रकरण दिल्लीलाच जावे, असा सल्ला मला एका नेत्याने दिला. त्यालाही राजीनामा द्यायचा होता; पण कुठे द्यायचा ह्यावर अडले होते. शेवटी तिकीट काढून (आम्ही) दिल्लीला गेलो. अकबर रोडच्या पक्ष कार्यालयात प्रचंड गर्दी होती. जो तो राजीनामे द्यायला आला होता. तिथे ज्योतिरादित्यसाहेब शिंदे भेटले. त्यांना मुजरा करून सांगितले, "महाराज, राजीनामा देनेका हय!'' त्यावर पटकन मोहरा बदलून ते अदृश्‍यच झाले. सचिनजी पायलट, राज बब्बर दिसले, पण तेही घाईघाईने निघून गेले. येणाऱ्याला प्रत्येक जण विचारत होता की 'दिया?' त्यावर तो उत्तरत होता, "कहां यार! कल से खडा हूं....'' 

...असे चालले आहे! ज्यांनी राजीनामा दिला, त्यांना आपला एकच सवाल : तुम्ही राजीनामा दिलात तरी कुठे? आणि कोणाला? कृपया मार्गदर्शन करावे. 

आपला आज्ञाधारक. 
एक काँग्रेस कार्यकर्ता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political Satire in Marathi Dhing Tang