ढिंग टांग : आपलीच इडली, आपलेच ओठ! (एक वृत्तांत...)

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 11 जुलै 2019

काही निरागस काँग्रेस आमदारांचे दिवसाढवळ्या अपहरण करुन त्यांना मुंबईतील अज्ञात पंचतारांकित स्थळी दडवून ठेवण्याची कमळ पक्षाची खेळी (कानडी) जनता उघड्या डोळ्यांनी पाहात्ये आहे.

कर्नाटक काँग्रेसमधील पेचप्रसंगाने आम्ही कमालीचे व्यथित झालो असून लोकशाहीचा गळा घोटण्याचा हा प्रयत्न अगदीच अश्‍लाघ्य असल्याचे आमचे स्पष्ट मत आहे. इतकेच नव्हे, तर चक्‍कर येऊन रस्त्यात अर्धमेल्या अवस्थेत पडलेल्या पादचाऱ्याला इस्पितळात पोचवण्याऐवजी त्याचे पाकिट मारण्याचा हा उद्योग निषेधार्ह आहे, असेही आम्ही म्हणू. काही निरागस कॉंग्रेस आमदारांना फोडून विद्यमान सरकार खुर्चीवरून खाली खेचण्याचे सत्ताधारी कमळ पक्षाचे हे कारस्थान निंदनीय असून त्याचा त्रिवार निषेध करतो. 

काही निरागस कॉंग्रेस आमदारांचे दिवसाढवळ्या अपहरण करुन त्यांना मुंबईतील अज्ञात पंचतारांकित स्थळी दडवून ठेवण्याची कमळ पक्षाची खेळी (कानडी) जनता उघड्या डोळ्यांनी पाहात्ये आहे. योग्यवेळी सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचे मनोमन ठरवत्ये आहे. का. नि. कॉं. आ.ना कोंडून ठेवून त्यांच्या पालकांस ब्लॅकमेल करण्याचा हा प्रकार म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून फिरौती किंवा खंडणीचाच गुन्हा आहे, ह्याबद्दल आमच्या मनात तरी शंका नाही. सदर प्रकरणाची शहानिशा करून वाचकांसमोर त्यासंदर्भातील वस्तुनिष्ठ वृत्तांत ठेवण्याच्या कर्तव्यबुध्दीने आम्ही सदरील मजकूर लिहीत आहो. 

त्याचे झाले असे, की काही दिवसांपूर्वी का. नि. कॉं. आ. ना विविध प्रकारची आमिषे दाखवून भुलवून मुंबईत आणण्यात आले. "तुम्हाला विमानाने फिरवून आणतो' असे खोटेच प्रलोभन दाखवून भराभरा मोटारीत कोंबले व विमानाने कुठेही न फिरवता थेट मुंबईतच आणले. तेथे पोचल्यावर "तुम्हाला चांगले इडली- सांबार खाऊ घालतो' असे खोटेच सांगून त्यांना विमानतळानजीकच्या एका पंचतारांकित हॉटेलात नेण्यात आले. तेथे इडली- सांबार मिळालेच नाही, अशी गंभीर तक्रार एका नि. कॉं. आ.ने नंतर (आमच्याकडे) केली.

त्या हाटेलातील खोल्यांमध्ये भयंकर थंडी वाजत होती. तसेच अन्य सुखसोयींचीही प्रचंड वानवा होती. खोल्या साऊण्डप्रूफ नसल्याने शेजारील खोलीतील नि. कॉं. आ. कानडी भाषेत रात्रभर घोरत राहिल्याने अन्य पाहुण्यांना जागरण झाले. का. नि. कॉं. आ. ना फलाहार करायचा होता. तेव्हा त्यांना "उद्या पपई मिळेल' असे खोटेच आश्‍वासन देण्यात आले. दुसऱ्या दिवशी पपईऐवजी पवईतील एका पंचतारांकित अज्ञात स्थळी नेण्यात आले!! 

...ह्या प्रकरणी प्रसिद्धिमाध्यमांचाही 'कात्रज' करण्याचा प्रयत्न झाला. सदरील का. नि. कॉं. आ. ना पुण्याला नेणार असे सांगून पवईत हलविले!! त्यामुळे का. नि. कॉं. आ. तर पवईलाच पुणे समजत होते, हे मागाहून लक्षात आले!! 

सदरील का. नि. कॉं. आ.चा एक निकटचा नातलग त्यांना परत नेण्यासाठी त्याच हॉटेलात उतरण्यासाठी आला असता, हॉटेल व्यवस्थापनाने "तुमचे बुकिंगच नाही' असे खोटेच सांगितल्याने नातलगास काही करता येईना!! अखेर सदरील अज्ञात स्थळावरील हॉटेलाच्या परिसरात पोलिसांनी संचारबंदीच लागू केल्याने. का. नि. कॉं. आ. आतमध्ये, आणि बाकीचे बाहेर, अशी अवस्था झाली. प्रचंड मोठा कल्लोळ झाला. का. नि. कॉं. आ. चा निकटचा नातलग हाटेलपासून सुमारे दीड किमी अंतरावरील एका टावरान हाटिलात इडली- सांबार खाताना आम्हाला दिसला. आम्ही त्याला छेडले असता त्याने हा घोडेबाजार असल्याची प्रतिक्रिया दिली. 

"इतका मोठा व्याप करून तुम्ही काय साधणार?'' असे विचारताच ते गंभीर झाले. घास ओठांत अडला. 
"आपलीच इडली, आपलेच ओठ! काय करणार?'' असे म्हणताना त्यांचे निष्पाप काँग्रेसी डोळे भरून आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political Satire in Marathi Dhing Tang