ढिंग टांग : एक काँग्रेसी कैफियत!

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 12 जुलै 2019

कर्नाटकातून आलेल्या मा. शिवकुमार ह्यांना मुंबईतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी म्हणावी तशी साथ दिली नाही, असा आरोप होत आहे.

मा. श्रीमती महामॅडम यांच्या चरणारविंदी, मी काँग्रेस पक्षाचा साधासुधा कार्यकर्ता आहे. आमच्या मुंबईत सध्या नेतेच नसल्याने थेट तुम्हालाच पत्र लिहीत आहे, त्याबद्दल क्षमस्व. परंतु, आमच्या मुंबईत हल्ली एक काँग्रेसवाला दुसऱ्या काँग्रेसवाल्याला ओळखही दाखवत नाही, अशी स्थिती आहे. माझ्यासारख्या सामान्य (रस्त्यावरच्या) कार्यकर्त्याने काय करावे? तरी माझ्या कैफियतीचा गंभीरपणे विचार करावा, ही कळकळीची विनंती. हे पत्र पोचताच अविलंब कारवाई करुन पक्षाला आता (तरी) वाचवावे, अशी माझी प्रार्थना आहे. 

त्याचे झाले असे की, मुंबईतील पवईस्थित पंचतारांकित हॉटेलात जोरजबरदस्तीने डांबून ठेवलेल्या आपल्या पक्षाच्या आमदारांना न भेटताच कर्नाटकचे ज्येष्ठ मंत्री श्रीमान डी. शिवकुमारप्पा बंगळुरास परत निघून गेले. त्यांना पोलिसांनी आदरपूर्वक विमानात बसवून बाहेरून दार लावून घेतले. पायलटाने क्षणाचाही विलंब न लावता अस्मानात झेप घेऊन विषय संपवला. 

लोकशाहीचा गळा घोटून घोडेबाजार करणाऱ्या नतद्रष्ट कमळ पार्टीचेच हे कारस्थान होते, ह्यात काही शंका नाही. "लोकशाहीचा गळा घोटणे, घोडेबाजार करणे, सत्तेचा दुरुपयोग करणे, गैरमार्गाने आर्थिक उलाढाली करणे, असे गंभीर गुन्हे एका दिवसात करून नामानिराळी राहणारी कमळ पार्टी हा भारतीय लोकशाहीला लागलेला शाप आहे,' अशी जहरी टीका आम्ही करूनही काहीही उपयोग झाला नाही. घडायचे ते घडलेच. 

तथापि, कर्नाटकातून आलेल्या मा. शिवकुमार ह्यांना मुंबईतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी म्हणावी तशी साथ दिली नाही, असा आरोप होत आहे. त्याची काही कारणे अशी : 

1. मा. शिवकुमारप्पा सकाळी दहाच्या सुमारास पवईच्या पंचतारांकित हॉटेलाच्या गेटपाशी आले, तेव्हा आपले कार्यकर्ते नुकतेच झोपेतून जागे होऊन दातबित घासत होते. इतक्‍या सकाळी आंदोलने करणे उचित नव्हे!! 

2. मा. शिवकुमारप्पा ह्यांनी बंगळुरुहून निघण्यापूर्वी त्याच हॉटेलात कमरा बुक केला होता. परंतु, "सदर इसमास आम्ही ओळखत नसून त्यास आमची भेट घेण्याची परवानगी देऊ नये'' असे निर्दय पत्र अपहृत आमदारांनी पोलिसांना देऊन ठेवले होते. त्यानुसार मा. शिवकुमारप्पा ह्यांना गेट उघडण्यात आले नाही. अखेर नजीकच्या दुर्गा वडापाव सेंटरमधून वडापाव खाऊन मा. शिवकुमारप्पा ह्यांना दिवस काढावा लागला. 

3. मा. शिवकुमारप्पा ह्यांच्या बैठ्या आंदोलनाच्या बातम्या टीव्ही वाहिन्यांवर दिसू लागल्यानंतर काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांना कळले की ओबी व्हॅनसुद्धा आल्या आहेत!! 

4. मा. शिवकुमारप्पा ह्यांच्या आंदोलनासाठीच ओबी व्हॅन आल्याची खबर लागल्यावर आम्ही धावाधाव केली. आंदोलन म्हटले की आमच्यासारखे कार्यकर्ते (जनरली) कपडे आधी घालतात, मग प्रकार काय आहे ते विचारतात! ह्या केसमध्ये आपलीच पार्टी आंदोलन करीत असल्याचे पाहून आम्हा काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आश्‍चर्यास पारावार उरला नाही. 

5. मा. शिवकुमारप्पा ह्यांच्या आंदोलनाबाबत आपण नेमके काय करायचे हे मुंबईतील काँग्रेस नेत्यांना दुपार उलटून गेल्यावर समजले! तोवर आंदोलनच संपले होते. 

6. मा. शिवकुमारप्पा ह्यांच्या आंदोलनाबाबत आपण काय करायचे नाही, हे काँग्रेस कार्यकर्त्यांना मात्र चांगले समजले होते! 

7. मा. शिवकुमारप्पा ह्यांचे आंदोलन तीन वाजेपर्यंत संपेल का? हा कार्यकर्त्यांच्या मनातला सर्वांत सवाल होता. कारण तीन वाजता इंडिया-न्यूझीलंड क्रिकेट म्याच सुरू होणार होती. 

8. क्रिकेट म्याचच्या दिवशी भारतात कुठेही आंदोलन ठेवू नये, ही एका कार्यकर्त्याची नम्र विनंती आहे. कृपया विचार व्हावा. 
आपला नम्र व आज्ञाधारक. एक कार्यकर्ता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political Satire in Marathi Dhing Tang