ढिंग टांग : तथास्तु!

ब्रिटिश नंदी
Friday, 19 July 2019

विक्रमादित्य : (भाबडेपणाने) ज्या लोकांनी आपल्याला मतं दिली, त्यांना 'थॅंक्‍स' म्हणायचंय! ज्यांनी दिली नाहीत, त्यांची मनं वळवायची आहेत आणि जे देणारच नाहीएत त्यांना... 
उधोजीसाहेब : (थिजून) ही तुझी जनआशीर्वाद यात्रा?

स्थळ : मातोश्री हाइट्‌स, वांद्रे बुद्रुक. 
वेळ : आशीर्वादाची. 
काळ : शुभेच्छांचा. 
प्रसंग : पवित्र. 
पात्रे : अगदीच पवित्र! 

विक्रमादित्य : (प्रवासी पोशाखात) हाय देअर बॅब्स...मी निघालो! सी यु अगेन!! 
उधोजीसाहेब : (लक्ष न देता) संध्याकाळी सातच्या आत घरात आलं पाहिजे हं! शिस्त म्हंजे शिस्त!! 
विक्रमादित्य : (ब्यागेचे कुलुप लावत) नॉट पॉसिबल!! आय विल बी औटॉफस्टेशन!! 
उधोजीसाहेब : (लाइटली घेत) बांदऱ्यापलीकडे आपण जातो कुठे? फार तर माहीम!! ये लौकर!! 

विक्रमादित्य : (सॅक पाठीला लावत) भेटू महिनाभराने! बाय!! 
उधोजीसाहेब : (हादरुन) हे काय? कुठे निघालास? 
विक्रमादित्य : (गॉगल सारखा करत) उंबऱ्याबाहेर पडणाऱ्या माणसाला 'कुठे निघालास' असं विचारु नये! कामं होत नाहीत!! 
उधोजीसाहेब : (आणखी हादरुन) तू कामाला निघाला आहेस? 
विक्रमादित्य : (पाठीवरली सॅक ठीकठाक करत) येस्स...महत्त्वाच्या कामाला! 
उधोजीसाहेब : (संशयानं) वीकेंड जवळ येतोय! तू कुठे ट्रेकिंगला जात नाहीएस ना? 

विक्रमादित्य : (हसून) ट्रेकिंग? हॅ:!! महाराष्ट्रातले सगळे गड सर करुन झालेत माझे!! आता कसलं ट्रेकिंग? 
उधोजीसाहेब : (डोळे बारीक करत) पावसाळी पिकनिकला निघालास की काय? 
विक्रमादित्य : (आरशात डोकावत) मी यात्रेला निघालोय! 
उधोजीसाहेब : (प्राणांतिक दचकून) यात्रा? अरे, यात्रेला जायचं वय आहे का तुझं? 
विक्रमादित्य : (सुविचार सांगत) यात्रेनं पुण्य मिळतं!! 
उधोजीसाहेब : (कासावीस होत) तुला कशाला इतक्‍यात हव्यात पुण्याईच्या उठाठेवी? यात्रा निवृत्त माणसं करतात!! 
विक्रमादित्य : (गंभीर सुरात) लोकांचे आशीर्वाद घेत, पुण्य गाठीला बांधत माझी यात्रा मी कम्प्लीट करीन! मगच परत येईन!! 
उधोजीसाहेब : (चाचपणी करत) कुठे हिमालयात गुहेतबिहेत जाऊन बसणार नाहीस ना? केदारनाथला हल्ली गुहांना जाम डिमांड आहे, म्हणून विचारतोय!! 

विक्रमादित्य : (खंबीरपणाने) मी जळगावला चाललोय! तिथल्या गणपती मंदिरात वंदन करुन मी माझ्या यात्रेला आरंभ करणार आहे!! 
उधोजीसाहेब : (आमिष दाखवत) जळगावला कुणी यात्रेला जातं का? वेडा कुठला!! 
विक्रमादित्य : (निग्रहपूर्वक) काशीयात्रेपेक्षा अधिक पुण्य माझ्या यात्रेत आहे, बॅब्स! बघालच तुम्ही!! 
उधोजीसाहेब : (अजीजीनं) तुझ्यासाठी काय काय बेत रचले आहेत मी! यात्रेला कसला जातोस? तुझं सगळं बस्तान बसलं की मग मीच यात्रेला जायचं म्हणतोय!! 
विक्रमादित्य : (गंभीर आवाजात) तुम्हीसुध्दा यात्रा प्लान करताय? 
उधोजीसाहेब : (गुळमुळीत) तसा मध्यंतरी मी अयोध्येच्या यात्रेला जाऊन आलोय! पण...सध्या तेवढं पुरेसं आहे!! 

विक्रमादित्य : (युक्‍तिवाद करत) ती यात्रा वेगळी, ही वेगळी! 
उधोजीसाहेब : (समजूत काढत) आपल्यासारख्या नेत्यांनी मोर्चे काढावेत, दौरे काढावेत! अभियान का काय म्हंटात...ते काढावं! हे...हे...हे...काय? 
विक्रमादित्य : (दोन्ही हात उडवत) कुणी सत्यदेव म्हणतात, कुणी सत्यनारायण! शेवटी सगळ्यांचा हेतू एकच! जनांचा आशीर्वाद!! 
उधोजीसाहेब : (सावधगिरीने) नेमकी कुठे आहे तुझी ही यात्रा? 
विक्रमादित्य : (भाबडेपणाने) ज्या लोकांनी आपल्याला मतं दिली, त्यांना 'थॅंक्‍स' म्हणायचंय! ज्यांनी दिली नाहीत, त्यांची मनं वळवायची आहेत आणि जे देणारच नाहीएत त्यांना... 
उधोजीसाहेब : (थिजून) ही तुझी जनआशीर्वाद यात्रा? 
विक्रमादित्य : (अभिमानाने) येस्स!! फक्‍त एकच समस्या आहे! विचारू? 
उधोजीसाहेब : (नाइलाजाने) विचार आता...काय करणार? 
विक्रमादित्य : (एक पॉज घेत) जनआशीर्वाद यात्रेत आपण आशीर्वाद घ्यायचे की द्यायचे असतात?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political Satire in Marathi Dhing Tang