esakal | ढिंग टांग : मेगाभरती फेस्टिवल!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

...आमचा मेगाभरतीचा कार्यक्रम जोरदार झाला. आमच्या कार्यालयात इतके काँग्रेसवाले एकगठ्ठा दिसण्याची ही पहिलीच खेप आहे! सामूहिक विवाह सोहळा आहे, असे वाटून आमचे सोलापूरचे बापूसाहेब देशमुखही उगीचच डोकावून गेले. मा. विखेसाहेब प्रवेशद्वाराशी उभे होते. त्यांच्या हातात यादी होती. माणूस आत आला की ते लागलीच कागदावरचे नाव पेनाने टिक करायचे!! आमची पक्षशिस्त त्यांना कळली आहे, असेच म्हटले पाहिजे!! 

ढिंग टांग : मेगाभरती फेस्टिवल!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

आजची तिथी : विकारी संवत्सर श्रीशके 1941 आषाढ दर्श अमावस्या (दिव्यांची अवस.) 
आजचा वार : ट्यूसडे विथ कमळ! 
आजचा सुविचार : या बालांनो सारे या, भरभर लवकर सारे या! 
करा रे मजा करा, आज दिवस तुमचा समजा 
स्वस्थ बसे तोचि फसे, नवभूमी दाविन मी..! 
...................... 
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (108 वेळा लिहिणे) आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्याजोगा आहे. सकाळी जागा झालो तोच मुळी 'या बालांनो, या रे या' ही कविवर्य भा. रा. तांबे ह्यांची बालकविता गुणगुणत. बालवाडीत असताना म्हणायचो, पण ही कविता आजदेखील आपल्या राजकारणाला लागू पडते! कवी खरेच द्रष्टे असतात!! 

कवितेचे जाऊ दे, निवडणुकीला उभे राहायचे तर ते कोणासमोर उभे राहायचे? अवघा महाराष्ट्रच जर आमच्या पक्षात सामील झाला तर विरोधक आणायचे तरी कुठून? हा खरा सवाल आहे. परवा विरोधकांचे एक नेते मंत्रालयात भेटले, त्यांना म्हणालो, 'आता भेटू निवडणुकीच्या रिंगणातच!' तर ते म्हणाले, ''कशाला? आता मी तुमच्याच पक्षात आलोय! कार्यालयातच भेटू!!'' 

हे असे सारे चालले आहे! गेले काही दिवस आमच्या पक्ष कार्यालयासमोर ऍडमिशनसाठी एवढी झुंबड उडाली आहे की ज्याचे नाव ते! सकाळी आमचे नवे कमळाध्यक्ष चंदूदादा कोल्हापूरकर घाईघाईने आले. मी म्हणालो, 'चहा घेताय ना?' (नुसतेच म्हणालो!) त्यावर ते म्हणाले, की ''चहाबिहा नंतर...आधी आपल्या पक्षकार्यालयात चला, तिथं मेगाभरतीचा कार्यक्रम आहे.'' 

''आज किती आवक आहे?'' मी विचारले. त्यावर त्यांनी बोटे मोडून 'एक दोन तीन चार...सात...नाही नाही...चार अधिक साडेतीन हाफ...' असे पुटपुटत शेवटी पाच बोटे दाखवली. 
''एवढ्यांना रिचवायचे कुठे?'' मी चिंता व्यक्‍त केली. 
''रिचवू हो कुठेतरी...सध्या घेऊन तर ठेवू! बेगमीचा फायदाच असतो! पुढेमागे उपयोगी पडतील!'' दादांनी उतावीळपणाने घाई सुरू केली. 
''हे असंच सुरू राहिलं तर परिस्थिती कठीण होईल!'' मी म्हणालो. 
''आपले नवे शिक्षणमंत्री शेलारमामा तर म्हणत होते की ऑनलाइन प्रवेश देता येतोय का बघा! कल्पना वाईट नाही!!'' दादांनी हसत हसत सांगितले. मीही थोडेसे हसलो. (पण थोडेसेच!) 

...आमचा मेगाभरतीचा कार्यक्रम जोरदार झाला. आमच्या कार्यालयात इतके काँग्रेसवाले एकगठ्ठा दिसण्याची ही पहिलीच खेप आहे! सामूहिक विवाह सोहळा आहे, असे वाटून आमचे सोलापूरचे बापूसाहेब देशमुखही उगीचच डोकावून गेले. मा. विखेसाहेब प्रवेशद्वाराशी उभे होते. त्यांच्या हातात यादी होती. माणूस आत आला की ते लागलीच कागदावरचे नाव पेनाने टिक करायचे!! आमची पक्षशिस्त त्यांना कळली आहे, असेच म्हटले पाहिजे!! पेढ्यांचे पुडे सोडले जात होते, वाटले जात होते. फुलेमाळांनी व्यासपीठ सजले होते. इच्छुकांची व्यासपीठावरच एवढी गर्दी झाली होती की त्यांच्या स्वागतासाठी आलेले कार्यकर्ते कमी पडू लागले!! कुण्या उत्साही कार्यकर्त्याने तेवढ्यात सनईवाला उचलू आणलान!! मी कपाळाला हात लावला... 

...येत्या इलेक्‍शनला आम्हाला प्रचंड बहुमत मिळणार हे उघड आहे. पण ते विक्रमी कसे मिळेल, एवढेच बघायचे आहे, असे मी माझ्या जोशपूर्ण भाषणात म्हणालो. लोकांनी टाळ्या वाजवल्या. नवे विक्रम मोडायचे आहेत, असेही मी म्हणालो. पण खरे तर मला एकच महाविक्रम घडवायचा आहे. तो म्हणजे महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 288 जागा बिनविरोध जिंकायचा विक्रम करायचा आहे. बहुतेक जमेल असे दिसते!!

loading image