प्रदूषणात हरवली दिल्ली!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

मुंबई आणि पुणे या देशातील दोन महानगरांनी यंदा कमालीचा संयम पाळला आणि फटाक्‍यांची आतषबाजी बऱ्याच प्रमाणात कमी केली, हे खरे असले तरी अन्यत्र यंदाही फटाक्‍यांनी धूम मचवली. परिणामी, प्रदूषणात कमालीची वाढ झाली आहे. त्यात दिल्लीने तर कमाल केली आणि भाऊबीजेची सकाळ उजाडली, तीच प्रदूषणयुक्‍त धुक्‍याची चादर पांघरून! त्यामुळे विमानतळ, रेल्वे स्थानके आदी महत्त्वाच्या स्थानांवर हातभर अंतरापलीकडचे दिसणे कठीण झाले होते. 

सीमेवरील चकमकींमध्ये जवान रक्‍ताने न्हाऊन निघत असताना आतषबाजी टाळावी, असे आवाहन करण्यात आले होते. दिल्लीकरांनी ही आवाहने धुडकावून लावली आणि दिल्लीतील प्रदूषणाचे प्रमाण सुरक्षित वातावरणाच्या २०पट अधिक वाढले. अर्थात, दिल्लीची हवा ही काही केवळ फटाक्‍यांमुळेच प्रदूषित होते, असे बिलकूल नाही. घनकचरा जाळण्याची पद्धत यास मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरत आहे. त्याविरोधात अनेक याचिकाही प्रलंबित आहेत आणि गेल्याच आठवड्यात दिल्ली हे ‘गॅस चेंबर’ बनल्याचा शेरा उच्च न्यायालयाने मारला होता. मात्र, या साऱ्या बाबींकडे डोळेझाक करून दिल्लीकरांनी मनमानी पद्धतीने फटाके फोडले. मुंबई-पुणे येथील नागरिकांना हे भान आले, त्यास औरंगाबादेत फटाक्‍याच्या दुकानांना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लागलेली आगही कारणीभूत ठरली असणारच. या आगीत सुदैवाने प्राणहानी झाली नाही; मात्र नुकसान लक्षावधींचे झाले आहे. त्यामुळे फटाक्‍यांच्या वापरावरील निर्बंधांबाबत कठोर अंमलबजावणीचा मुद्दा हा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने शेजारच्या काही राज्यांना नोटिसा पाठवल्या आहेत; तर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनीही याबाबत तातडीने बैठक बोलवली आहे.

अर्थात, सरकारच लोकांचा अनुनय करत विशिष्ट दिवशी रात्री उशिरापर्यंत फटाके फोडण्यास परवानगी देत असते! मात्र, जोपावेतो नागरिकांनाच वास्तवाचे भान येत नाही आणि ते संयम पाळत नाहीत, तोपर्यंत अशा कितीही बैठकी झाल्या तरी त्यातून काहीही साध्य होणार नाही, हे निश्‍चित. त्यामुळेच प्रदूषणमुक्‍त जीवनाची जबाबदारी ही सरकार; तसेच नागरिक या दोघांचीही आहे.

Web Title: pollution in New Delhi