टफ टास्क मास्टर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prachi Gavaskar writes about share market investment money management

शेअर बाजार हा विषय आता केवळ विशिष्ट वर्तुळापुरता सीमित राहिलेला नाही.

टफ टास्क मास्टर

- प्राची गावस्कर

शेअर बाजार हा विषय आता केवळ विशिष्ट वर्तुळापुरता सीमित राहिलेला नाही. तेथील घडामोडींविषयी सर्वसामान्यांमधील उत्सुकताही वाढली आहे. केवळ उत्सुकताच नव्हे, तर गुंतवणुकीचा पर्याय म्हणून मोठ्या प्रमाणावर लोक त्याकडे वळत आहेत.

त्यांची जिज्ञासा केवळ शेअरच्या भावांमधील चढउतारांशी आणि त्यांच्या कारणांशी संबंधित असते, असे मानता येणार नाही. हा सगळा जो गुंतवणूक आणि परताव्याचा ‘खेळ’ सुरू असतो, त्यात कधी सरशी, कधी पिछाडी असे होणारच, हे बहुतेकांना ठाऊक असते.

मात्र काही मूलभूत नियम आणि शिस्तशीर कार्यपद्धतीनेच तो चालतो आहे ना, याविषयी गुंतवणूकदार म्हणून प्रत्येकाला आस्था नि काळजी वाटणे स्वाभाविक आहे. त्यामुळेच या सगळ्याचे व्यवस्थापन करणाऱ्या अधिकारी मंडळींचे विशेष महत्त्व आहे.

आशियातील पहिला आणि देशातील सर्वांत मोठा शेअर बाजार म्हणून ओळख असलेल्या मुंबई शेअर बाजाराची (बीएसई) सूत्रे सुंदररामन राममूर्ती हाती घेणार आहेत, याची त्यामुळेच दखल घेतली जाणे क्रमप्राप्त आहे.

येत्या चार जानेवारीपासून ६२ वर्षीय राममूर्ती ‘बीएसई’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून धुरा सांभाळतील. राममूर्ती यांचा अनुभव विविधांगी आणि व्यापक आहे. मुख्य म्हणजे परदेशातील रोखे बाजारांच्या कामाची त्यांना सखोल माहिती आहे.

‘बँक ऑफ अमेरिके’च्या भारतीय शाखेत व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. जागतिक स्तरावरील प्रशासन, भारतातील बँकिंग घटकाचे नियंत्रण आणि सिक्युरिटीज विभाग यांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्यांची ख्याती कठोर शिस्तीचा प्रशासक अशी आहे.

‘‘कठीणातील कठीण कामेही ते लीलया पार पाडतात. आपल्या निर्णयावर ते ठाम असतात. त्यामुळे याबाबतीत त्यांच्यावर कोणी अवाजवी प्रभाव टाकू शकत नाही. मूल्ये, तत्त्वे, नियम याबाबत कोणतीही तडजोड करण्यास ते तयार नसतात. त्यामुळे अनेकदा त्यांचा सहकाऱ्यांशी संघर्ष होतो,’’ असे बँक ऑफ अमेरिकेतील त्यांचे सहकारी म्हणतात. ‘टफ टास्क मास्टर’ अशी त्यांची ओळख आहे.

‘कॉर्पोरेट गव्हर्नन्स’मधील त्यांचे कौशल्य वाखाखण्याजोगे आहे, असेही त्यांचे सहकारी सांगतात. या विभागातील विविध समस्यांचे निराकरण करणे आणि व्यापाऱ्यांना आकर्षित करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने राममूर्ती यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांचा या क्षेत्रातील अनुभव आणि विशेष कौशल्यामुळे, ‘बीएसई’ला आपले उद्दिष्ट साध्य करण्यात यश मिळू शकेल, असे मानले जात आहे.

विज्ञानाचे पदवीधर आणि चार्टर्ड अकाउंटंट असलेले राममूर्ती यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात आयडीबीआय बँकेतून केली होती. त्यानंतर ते ‘एनएसई’त आले. ‘एनएसई’च्या स्थापनेपासून म्हणजे १९९५ ते २०१४पर्यंतच्या काळात ते विविध पदांवर कार्यरत होते.

तेथील तांत्रिक परिवर्तन, आर्थिक व्यवहारांचा वेळच्या वेळी निपटारा तसेच विशिष्ट कालावधीत सौदेपूर्तता या सगळ्या गोष्टींमध्ये राममूर्ती यांचा सहभाग मोठा होता. इक्विटी डेरिव्हेटिव्ह विभागातही त्यांनी लक्षणीय छाप उमटवली.

आज ‘इक्विटी डेरिव्हेटिव्ह’मध्ये ‘एनएसई’चा जवळपास ९० टक्के हिस्सा आहे. ‘बँक निफ्टी’च्या यशातही त्यांचा मोलाचा वाटा आहे. राममूर्ती यांनी ‘एनएसई’मध्ये नॅशनल सिक्युरिटीज क्लिअरिंग कॉर्पोरेशन, एक्सचेंजचे क्लिअरिंग हाउसचे नेतृत्वही यशस्वीरित्या केले.गेल्या जुलैपासून ‘बीएसई’तील हे पद रिक्त होते.

या आधी आशिष चौहान यांच्याकडे या पदाची जबाबदारी होती.आता चौहान यांच्याकडे ‘एनएसई’ची सूत्रे, तर ‘एनएसई’मध्ये प्रदीर्घ काळ काम केलेले राममूर्ती यांच्याकडे ‘बीएसई’ची सूत्रे असा योगायोग या नियुक्तीमुळे घडून आला.