सर गोविंदराव..!

प्रकाश अकोलकर
गुरुवार, 23 मार्च 2017

ते अंतर्बाह्य ब्रिटिश होते!

ते अंतर्बाह्य ब्रिटिश होते!
ब्रिटिशांचा उदारमतवाद व्हाया पंडित जवाहरलाल नेहरू त्यांच्यापर्यंत येऊन पोचला होता आणि त्या उदारमतवादाबरोबरच ब्रिटिशांची करडी शिस्त, पोशाखी उच्चभ्रूपणा तसेच त्याचबरोबर आपल्या व्यवसायावरची निष्ठा आणि त्यासाठी करावा लागणारा व्यासंग हे गुण त्यांच्या रोमारोमांत भिनलेले होते. त्याबरोबरच ब्रिटिशांची दुसऱ्यापासून काहीशी फटकून दूर राहण्याची अलिप्त कलाही त्यांच्या अंगी होती. (आपल्या विपुल लेखनास त्यामुळेच त्यांना मोठा अवधी मिळाला असणार!) लंडनची तर त्यांना अगदी गिरगावातील गल्लीबोळांसारखी माहिती होती. त्यांच्या या ब्रिटिशप्रेमामुळेच त्यांचे एक ज्येष्ठ स्नेही विनायकराव पाटील हे त्यांना ‘सर गोविंदराव...’ म्हणत असत!

खरे तर ते एक गाढे विचारवंत होते आणि त्याचबरोबर साक्षेपी पत्रकारही होते. कोणाचीही भीडभाड न ठेवता ठाम आणि स्पष्ट भूमिका घेण्याबद्दल ते प्रसिद्ध होते आणि अग्रलेख हा तर त्यांच्या हातचा मळ असे. महाराष्ट्र आणि भारताच्या राजकारणाची त्यांना खडा न्‌ खडा माहिती असे. भले त्यांचे विरोधक त्यांची संभावना ‘हस्तिदंती मनोऱ्या’तील संपादक म्हणून करोत; त्याची त्यांना पर्वा नसे. त्याचे कारण म्हणजे यशवंतराव चव्हाणांपासून शरद पवारांपर्यंत आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्यापासून एस. एम. जोशी, विठ्ठलराव गाडगीळ यांच्यापर्यंत भले भले राजकीय नेते, कुसुमाग्रजांपासून पु. ल. देशपांडे, बा. भ. बोरकर, पु. भा. भावे यांच्यापर्यंत अनेक मोठे साहित्यिक, तसेच तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यापासून अ. भि. शहा, मे. पुं. रेगे, अच्युतराव पटवर्धन अशा अनेकांबरोबर त्यांची ऊठबस असे आणि त्यामुळेच राजकीय-सांस्कृतिक, तसेच सामाजिक घडामोडींची त्यांना बारकाव्यांनिशी माहिती असे. मात्र, त्यानंतर ते अग्रलेख लिहायला बसले, की त्यांची साक्षेपी वृत्ती आणि सुबोध लेखनशैली जागृत होत असे. त्यामुळेच १९७०, ८० आणि ९० अशी जवळपास तीन दशकं त्यांनी आपले अग्रलेख आणि स्फुटलेख यांनी मराठी पत्रकारिता दणाणून सोडली होती... ते म्हणजे गोविंद तळवलकर. 

द्वा. भ. कर्णिक यांच्यानंतर १९६७ मध्ये ते ‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक झाले. जवळपास तीन दशकं या संपादकपदाचा मानसन्मान त्यांनी आपल्या लेखनानं केला. त्याआधी ते काही काळ ‘लोकसत्ता’ दैनिकात होते. तेथे त्यांना ह. रा. महाजनी भेटले आणि ते एकदम तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री, अ. भि. शहा आदी रॉयिस्टांच्या वर्तुळात ओढले गेले. तरीही त्यांचे ब्रिटिश प्रेम कायम होते आणि ‘लंडन टाइम्स’ तसेच ‘द गार्डियन’ ही नियतकालिकं हे त्यांचं व्यसन होतं. टीव्हीचे आक्रमण होण्याआधी आणि इंटरनेटवरून जुजबी माहिती कोणाच्याही हाती लागून तो विचारवंत म्हणून गणल्या जाण्याच्या आधीपासूनच त्यांना देशाच्या राजकारणाबरोबरच आंतरराष्ट्रीय घडामोडींची माहिती असे आणि त्या जोरावरच त्यांनी मराठी वाचकांच्या काही पिढ्या अनुभवसमृद्ध करून सोडल्या. त्या तीन दशकांतील त्यांच्या अग्रलेखांची टोकदार आणि नजाकतदार शीर्षकं आज चार दशकांनंतरही वाचकांच्या स्मरणात असणं, एवढी एकच बाब त्यांच्या लेखनशैलीची साक्ष द्यायला पुरेशी आहे. 

राजकीय नेत्यांबरोबर त्यांची उठबस असली तरी त्यांनी ती नेतेमंडळी जशजशी चुकत गेली, तसे त्यांना आपल्या कडक मात्रेचे दोन वळसे द्यायलाही कधी मागे पाहिलं नाही. मग ते शरद पवार असोत की अंतुले. त्यामुळेच जॉर्ज फर्नांडिस यांनी ‘फटके जरा कमी मारा!’ या शीर्षकाचा एक लेख त्या दैनिकातच लिहिला होता! गोविंदराव आपल्या कडक शिस्तीबद्दल कमालीचे प्रसिद्ध तर होतेच आणि सहकाऱ्यांच्या मनात त्यांच्याबद्दल आदरयुक्‍त धाक असे. तरीही आपल्या सहकाऱ्यांना त्यांनी लेखनस्वातंत्र्य दिले. प्रस्तुत लेखकालाच त्याचा  अनुभव आला आहे. ‘आपल्या वृत्तपत्राच्या धोरणाची काळजी करायला मी समर्थ आहे... तुम्ही वास्तव काय ते लिहा...’ असं त्यांच्याकडून ऐकलेलं आहे. 

तळवलकरांना व्यसन होतं ते वाचनाचं आणि त्यांचा ग्रंथसंग्रहही विपुल होता. ‘स्ट्रॅण्ड’ या फोर्ट भागातील प्रख्यात बुकस्टॉलमध्ये त्यांच्याबरोबर जाण्याचा योग आला की त्यांना त्या काळातील नवनव्या पुस्तकांची कशी माहिती असे, ते चटकन ध्यानात येई. अशा उत्तम, दर्जेदार पुस्तकांचा परिचय करून देणारा ‘वाचस्पती’ या टोपणनावानं चालवलेला त्यांचा स्तंभ त्या काळात प्रचंड गाजला आणि त्याच्या जोरावरच अनेकजण आपणच ते पुस्तक वाचलं आहे, असा टेंभाही मिरवत! त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते कशातही गुंतून न पडता आपल्या मनातील एक ‘विंडो’ तत्काळ बंद करून दुसरी उघडू शकत. त्यामुळेच आपलं संपादकपद अत्यंत करड्या पद्धतीनं सांभाळतानाही ते ब्रिटिशांकडून भारताकडे झालेल्या ‘सत्तांतरा’च्या कहाणीचे दोन खंड तसेच रशियाचा समग्र इतिहास सांगणारे भले मोठे अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहू शकले. त्यांना आणखी एक प्रेमाचा आणि अभ्यासाचा विषय हा स्कॉच व्हिस्की हा होता आणि ‘कटिसार्क’ ही त्यांची आवडती स्कॉच! त्यामुळेच त्यांनी स्कॉच व्हिस्कीवर लिहिलेला लेखही खूप गाजला होता!

प्रसारमाध्यमांमध्ये ‘ब्रॅण्ड’, ‘प्रॉडक्‍ट’ असे शब्द प्रचलित होण्याआधीच आपला व्यासंग तसेच लेखन या जोरावर ते स्वत:च एक ‘ब्रॅण्ड’ बनले होते आणि नव्वदी गाठल्यावरही अमेरिकेतून त्यांचे लेखन सुरूच असे. त्यांच्या निधनामुळे मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील हा अनोखा ‘ब्रॅण्ड’ काळाच्या पडद्याआड गेला आहे...

Web Title: prakash akolkar article on govind talvalkar