लेखननिष्ठा धर्म मानणारा लेखक

मनोहर शहाणे यांच्याशी गप्पा मारणे ही एक ‘मौज’ असायची. तसे शहाणे हे पटकन खुलणारे असे गृहस्थ नव्हते. त्यांच्याकडे पाहिले तर बऱ्याच वेळा ते स्वत:शीच बोलत असावेत आणि तेही गंभीर अशा भावात, असे वाटे.
Veteran writer Manohar Shahane
Veteran writer Manohar Shahanesakal

- प्रमोद तेंब्रे

ज्येष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या सुहृदाने जागवलेल्या त्यांच्या आठवणी...

मनोहर शहाणे यांच्याशी गप्पा मारणे ही एक ‘मौज’ असायची. तसे शहाणे हे पटकन खुलणारे असे गृहस्थ नव्हते. त्यांच्याकडे पाहिले तर बऱ्याच वेळा ते स्वत:शीच बोलत असावेत आणि तेही गंभीर अशा भावात, असे वाटे. पण काही मंडळींमध्ये ते खुलत. असे असले तरी मध्येच बोलता बोलता गप्पा मारीत असताना ते केव्हा स्वत:शी बोलायला लागले आहेत हे पाहणे मोठे मजेचे आणि अभ्यासनीय असायचे आणि तेच त्यांच्या साहित्यात आढळते.

अगदी पहिल्या ‘धाकटे आकाश’ या कादंबरीपासून ते अगदी २००८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘उद्या’ ह्या कथासंग्रहापर्यंत. (आणि म्हणून तर कै. द. भि. कुलकर्णी यांनी त्यांच्या ‘उद्या’ या कथासंग्रहाला ब्लर्ब लिहिताना असे म्हटले की, ‘जाणीव आणि नेणीव यांच्यामध्ये जो एक धूसर पट्टा असतो तिथे आसन घालून मनोहर शहाणे हा कथावंत कथानिर्मिती करीत असतो.’)

‘हे बघ प्रमोद, मी क्रिटिकल असे काही लिहिणार नाही. याचे कारण मी एक लिहिता लेखक आहे,’ असे ते एकदा गप्पांच्या ओघात म्हणाले आणि त्या वाक्यामध्ये आढ्यता दिसत नव्हती तर एक प्रकारचा आपल्या निर्मितीबाबत असलेला अभिमान आणि निष्ठा दिसत होती. (आणि खरेच होते ते. त्यांच्या ‘उद्या’ या कथासंग्रहांतील काही कथा ह्या २००० सालातील आहेत) त्यांना मी एकदा टोकलेच, ‘रशियन साहित्य त्यातही दोस्तोयवस्की तुम्हाला आपले वाटतात आणि ते वाचले पण आहेत; मग कधी तुम्हाला वाटले नाही का, की ते अनुवाद करावेत म्हणून?’ त्याला त्यांनी फार गंभीरपणे उत्तर दिले ते असे : ‘नाही. आणि खरे सांगू का? मला अनुवाद करणे आवडत नाही.

एक वाटते की त्यात अडकलो तर आपल्या लिखाणावर त्या लेखकाचा प्रभाव पडेल. आणि मला ते मान्य नाही. कारण माझी कृती ही माझी निर्मिती आहे आणि त्या निर्मितीला मीच केवळ कारणीभूत आहे. कलाकृतीची निर्मिती ही त्या त्या कलावंताची- लेखकाची असते, त्यामुळे मी कोणाचे शिष्यत्व पत्करले नाही की, कोणाचा माझ्यावर प्रभाव नाही.

मी इंग्रजी साहित्य आणि त्यात रूपांतर झालेले रशियन, फ्रेंच, इटालियन खूप वाचले आहे. (आणि अजूनही वाचतो) त्यातल्या त्यात मला डोस्टोवस्की, चेकोव्ह, गॉर्की विशेष करून प्रभावित करतात आणि एका अदृश्य नात्याने ते साहित्य मला खूप जवळचे वाटते. पण म्हणून माझ्या कथा, कादंबरी, नाटकात ते डोकावणार नाहीत.’ ही मनोहर शहाणे यांची त्यांच्या लेखनावर असलेली एकनिष्ठता होती. ते एकदा म्हणाले होते.

‘निर्मिती ही एक अशी गोष्ट आहे की तिच्या आगेमागे काही असत नाही. थोडक्यात माझा गुरु-शिष्य परंपरेवर विश्वास नाही. कलाकृतीची निर्मिती ही त्या त्या कलावंताची लेखकाची असते, त्यामुळे मी कोणाचे शिष्यत्व पत्करले नाही, की कोणाचा माझ्यावर प्रभाव नाही. मराठी समीक्षेने एकंदरच साचे पाडले आहेत अमुक/तमुक एक साचा असेल तर ते यशस्वी व समजेल असे काहीसे. पण असे असू शकत नाही.

लेखकाने जे लिहिले आहे ते सादर करताना साचा उपयोगी पडणार नाही.’ ‘पुत्र’ ही त्यांची छोटेखानी पण अत्यंत वेगळी अशी कादंबरी. या लेखकाने एक वेगळी वाट वापरून माणसांच्या आणि त्यांच्याच भाषेत आणि त्यांना समजतील अशी साहित्यनिर्मिती केली आहे. ‘पुत्र’ कादंबरी ही १९७१ ची. त्याचे त्यावरील नाटक पण त्याच दशकातले.

‘पुत्र’ जीवनातील विसंगतीला भिडत समकालीन दांभिक समाज आणि भोंदू धार्मिकतेच्या रेट्याखाली उद्ध्वस्त होत जाणारे कोमल आणि निरागस मानवी जीवन याची कथा सांगते. म्हणून या कादंबरीचे इंग्रजी अनुवादकर्ते डॉ. विलास साळुंखे यांनी त्यांनी त्या इंग्रजी अनुवादाला सबटायटल दिले आहे. ‘A Tale told by an Indian Outsider’ शहाणे सारस्वतांच्या दरबारात तसे outsiderच राहिले. त्यांच्यावर व त्यांच्या लेखनावर प्रेम करणाऱ्या सर्वांची ही खंत होती. इतका स्फटिकवत मनाचा हा लेखक आज नाही; तरी मनात कायम घर करून होता आणि राहीलही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com