बायोचार : चांगल्या चक्राची सुरूवात

पृथ्वीचे सरासरी तापमान औद्योगीकरणापूर्वीच्या तुलनेत १.५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढले तर निसर्गचक्र इतके बिघडेल की अपरिमित जीवितहानी होईल...
 beginning of a good cycle
beginning of a good cyclesakal
Summary

पृथ्वीवरील हिरव्या वनस्पती आणि काही सूक्ष्मजीवही प्रकाश संश्‍लेषणाद्वारे वातावरणातील कार्बन-डायऑक्साइड हा हरितगृह वायू काढून घेत असतात. त्यातील कार्बन या सजीवांच्या शरीरांचा भाग बनतो. जेव्हा हे जीव मरण पावतात तेव्हा त्यांची कलेवरे कुजून कार्बन-डायऑक्साइड वातावरणात परत जातो.

पृथ्वीचे सरासरी तापमान औद्योगीकरणापूर्वीच्या तुलनेत १.५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढले तर निसर्गचक्र इतके बिघडेल की अपरिमित जीवितहानी होईल, मालमत्तेचे प्रचंड नुकसान होईल, जगाची अर्थव्यवस्था तसेच राजकीय व सामाजिक व्यवस्थाही कोलमडून पडेल. आत्ताचा तापमानवाढीचा वेग पहाता ही लक्ष्मणरेषा २०४० मध्येच ओलांडली जाऊ शकते. विनाशी भविष्य टाळायचे असेल तर जगाचा खनिज इंधन वापराचा चढता आलेख आजपासूनच खाली यायला हवा. गेल्या वर्षीपासून आयपीसीसी ही जागतिक संघटना वातावरण बदलाबाबतच्या सद्यस्थितीचा सहावा अहवाल टप्प्याटप्प्याने प्रसृत करते आहे. ४ एप्रिल २०२२ रोजी आलेल्या तिसऱ्या भागात हरितगृह वायूंचे वातावरणातील प्रमाण नियंत्रित करण्याच्या उपाययोजनांचा उहापोह केला आहे. यानुसार हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करणे किंवा थांबवणे आता पुरेसे असणार नाही, तर त्याच्या जोडीला वातावरणातील हरितगृह वायू काढून घेण्यासाठीच्या उपाययोजनाही राबवाव्या लागतील.

पृथ्वीवरील हिरव्या वनस्पती आणि काही सूक्ष्मजीवही प्रकाश संश्‍लेषणाद्वारे वातावरणातील कार्बन-डायऑक्साइड हा हरितगृह वायू काढून घेत असतात. त्यातील कार्बन या सजीवांच्या शरीरांचा भाग बनतो. जेव्हा हे जीव मरण पावतात तेव्हा त्यांची कलेवरे कुजून कार्बन-डायऑक्साइड वातावरणात परत जातो. म्हणजे वातावरणातील हरितगृह वायू काढून घेण्याची नैसर्गिक पण तात्पुरती यंत्रणा उपलब्ध आहे. तेव्हा जंगले, कुरणे, इ. नैसर्गिक परिसंस्थांचे पुनरुज्जीवन करून त्यांचे क्षेत्र वाढवले पाहिजे. वातावरणातून हरितगृह वायू काढून घेण्यासाठीच्या तंत्रज्ञानावर संशोधन चालू आहे, पण खूपच प्राथमिक टप्प्यात आहे आणि महागही आहे. वस्तुतः नैसर्गिक प्रकाशसंश्‍लेषण क्रियेला अत्यंत सोप्या आणि जुन्या मानवनिर्मित तंत्राची जोड दिली तर माफक खर्चात हे साध्य करता येऊ शकते. लाकडाचा कोळसा केला तर त्यातील एकूण कार्बनपैकी साधारण ३० टक्के शुद्ध आणि घन स्वरूपात उपलब्ध होतो. हा कोळसा मातीत मिसळला तर कायमस्वरूपी तसाच रहातो; त्याचा कार्बन-डायऑक्साइड होत नाही. म्हणजेच झाडाने वातावरणातून काढलेल्यापैकी ३० टक्के कार्बन वातावरणात परत जाण्यापासून थांबवता येतो. पण झाडे तोडून कोळसा करत बसायचे का? तर नाही. पानगळ होत असते, काटक्या-कुटक्या खाली पडत असतात.

नारळासारख्या झाडांच्या झावळ्या पडतात. शेतातील कोणत्याही पिकातला ५०-६० टक्के भाग शेतीचे उत्पादन असतो, तर उरलेला जैवभार कचरा असतो. अशा प्रकारे जंगलांमधून, बागांमधून, शेतांमधून विविध प्रकारचा शुष्क (आर्द्रता १०-१५ टक्कांच्या आत असणारा) जैवभार सातत्याने उपलब्ध होत असतो. जमिनीवर नैसर्गिक आच्छादन, कंपोस्ट इ. सर्वांची काळजी घेतल्यावरही बराच कचरा शिल्लक रहातो. बहुतेकदा तो नुसता उघड्यावर जाळून हवेच्या प्रदूषणात भर घातली जाते. त्याऐवजी निर्धूर व हातवाही कोळसा भट्ट्या वापरून त्याचे उपलब्ध आहे तिथेच कोळशात रूपांतर करता येते. या कोळशाला ‘बायोचार’ म्हणतात. हा कोळसा स्थानिक जंगलात, माळरानावर, शेतात, बागेत मातीत मिसळून टाकायचा आहे. हे तंत्र स्वस्त आणि सोपे आहे. सामान्य लोकही आपापल्या परिसरात हे करू शकतात. यातून वाळक्या जैव कचऱ्याचे प्रदूषणरहित व्यवस्थापनही होते. महत्त्वाचे म्हणजे बायोचार मातीत मिसळल्याने मातीची सुपीकता वाढते. त्यामुळे बायोचारयुक्त जमिनीवर अधिक जोमाने हिरवाई उगवेल, वातावरणातून अधिक कार्यक्षमतेने कार्बन-डायऑक्साइड काढेल... एका चांगल्या चक्राची सुरूवात होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com