संवाद व्यवहाराची आचारसंहिता ठरवूया

prof raja aakash
prof raja aakash

‘‘मी  कॉल करण्यासाठी मोबाईल हातात घेतो तेव्हा स्क्रीन ओपन करताच मला व्हॉट्‌सॲप, फेसबुक, यू-ट्यूब इत्यादींवर बरेच नोटिफिकेशन्स आल्याचे आकडे दिसतात. मग मी व्हॉट्‌सॲप उघडतो. त्यावर तीस-चाळीस मिनिटे खर्च होतात. मग फेसबुक. त्यावर वीस-पंचवीस मिनिटे जातात. यू- ट्यूबवर आणखी अर्धा तास जातो. जो कॉल करणार होतो, तो मी विसरून जातो. मेंदू थकतो. बरीच महत्त्वाची कामे राहून जातात. ती मी उद्यावर ढकलतो... सगळं शेड्यूल डिस्टर्ब होऊन जातं...’’ माझ्या एका व्यावसायिक मित्राची ही तक्रार. पण हा प्रश्न आता एकट्या-दुकट्याचा नव्हे तर बहुतांश लोकांचा झाला आहे.

मुळात हे संवादाचे उपकरण. ते आता मनोरंजनासाठीही वापरले जाऊ लागले आहे. मोबाईल आणि इंटरनेट असलेली प्रत्येक व्यक्ती किमान तीन तास वेळ त्यावर वाया दवडते आहे. त्यातले कामाचे फार कमी, निरर्थक जास्त. मोठ्यांच्या तुलनेत लहान मुलांचा आणि युवकांचा मोबाईलचा वापर फार जास्त आहे. पूर्वी आमच्याकडे पालक आपल्या मुलांना कौन्सिलिंगसाठी यायचे तेव्हा ते ‘याचं टीव्हीचं व्यसन सोडवा हो‘, अशी विनंती करायचे. आता त्याची जागा मोबाईलच्या व्यसनानं घेतली आहे. पालक ‘मोबाईल’ या विषयावर काही चिडून बोलले किंवा तो परत मागितला तर मुले इतकी आक्रमक होतात, की शेवटी पालकांनाच माघार घ्यावी लागते. अगदी आत्महत्या करण्यापर्यंत काहींची मजल जाते. नागपुरात अवघ्या ---- वर्षांच्या मुलीने ब्ल्यू व्हेल गेमच्या नादात आत्महत्या केली. परवा चौदा वर्षांच्या मुलाने वडील मोबाईलचा हट्ट पुरवत नाहीत म्हणून स्वतःला संपवून घेतले. यावर उपाय काय, याची चर्चा व्हायला हवी.

कसं वागायचं, कोणते कपडे घालायचे, काय खायचं- प्यायचं, कशाला प्राधान्य द्यायचं, कोणता विचार करायचा, चांगले-वाईट काय इत्यादी सर्व गोष्टी जणू मोबाईल ठरवतो आहे, आपण नव्हे. वास्तविक या उपकरणाचा शोध हा प्रगतीतील महत्त्वाचा टप्पा. संवादाचा वेग व सुविधा या माध्यमानं वाढवली. बिल भरणं, टॅक्‍सी ठरवणं, प्रवासाचे रिझर्व्हेशन्स, बॅंकिंग, खरेदी-विक्री अशा अनेक गोष्टी सहजगत्या होतात. वेळ वाचतो. रांगा वाचतात. पण या कामांखेरीज जो मोबाईल वापरला जातो, तो मनोरंजन, गेमिंग किंवा बिनकामाचे सर्फिंग यासाठी. जितका जास्त वेळ आपण सोशल मीडियावर वावरतो, तेवढा वेळ आपल्या व्यक्तिगत आवडी-निवडी नोंदल्या जात असतात. गरजेशिवाय आपण खरेदी करू लागतो, तेव्हा निर्णयाचे स्वातंत्र्य नकळत आपण गमावलेले असते.

नात्यांत वितुष्ट आणण्यासाही ही वस्तू कारणीभूत होत आहे. यात सरकार काहीही करू शकत नाही. आपापल्या पातळीवर उपाय शोधावे लागतील. मोबाईलचा त्याग करणे हा पर्याय नाही. पण त्याच्या वापराचे नियमन, नियंत्रण आपल्या हाती आहे. प्रत्येक घरात ते व्हावे. मोबाईलची जीवनातील जागा निश्‍चित करून त्याला तेवढ्यापुरते सीमित ठेवणे जमले पाहिजे. त्यासाठी आचारसंहिता बनवावी लागेल. घरातील कर्त्या मंडळींनी स्वतःपासून सुरवात करावी. त्यातून इतरांना धडा मिळेल. कामापुरतेच हे उपकरण वापरावे. व्हॉट्‌सॲप, फेसबुक किंवा इतर चॅटिंगसाठी दिवसभरातील एक वेळ ठरवून घ्यावी आणि त्याच वेळी अधिकाधिक अर्धा तास मोबाईलवर राहावे. महत्त्वाचे असेल तर संबंधित व्यक्ती आपल्याला फोन करून सांगेल, अशी व्यवस्था किंवा सोय आपण केली पाहिजे. अनेकांना झोपताना उशाशी मोबाईल ठेवण्याची सवय असते. पोलिस, डॉक्‍टर, पत्रकार इत्यादींसाठी ते योग्य असेलही; पण प्रत्येकासाठी उशाला मोबाईल ठेवण्याची गरज नाही. हे खेळणं नाही. रिकामा वेळ मिळत असेल तर छंद जोपासावा, वाचन करावे किंवा एखादे क्रिएटिव्ह काम करावे. अगदीच काही जमत नसेल तर घरातल्या माणसांशी किंवा मित्रांशी गप्पा माराव्यात. प्रवासात किंवा खूप मोकळा वेळ असताना मोबाईलवर सिनेमा पाहणे हा अपवाद वगळला, तर एरवी ही सवय अजिबात चांगली नाही. त्याचा परिणाम डोळ्यांवर, मेंदूवर आणि एकूण मानसिकतेवरही होतो. पक्के ध्यानात ठेवा, मोबाईल मित्र असू शकतो; मालक नव्हे. आपल्या नकळत तो तसा होत असेल तर सावध व्हा. आपल्या जगण्यातले वैविध्य त्याने स्वतःपुरते केंद्रित करून घेतले आहे आणि त्यामुळे आपण आक्रसून जात आहोत. आपल्याला पुन्हा विस्तारायचे असेल तर मोबाईलने व्यापलेली जागा मोकळी करावी लागेल आणि त्याला त्याची मर्यादित असलेली जागा देऊन त्याचे व स्वतःच्या जगण्याचे मालक व्हावे लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com