स्वैर बोलंदाजी (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

इम्रान खान यांच्याकडे पाकिस्तानच्या कारभाराची सूत्रे आल्यानंतर काही सकारात्मक बदल घडतील, अशी आशा व्यक्त होत होती. पण ती फोल ठरली आहे. दहशतवादी हल्ल्याविषयी त्यांच्या निवेदनात ना संवेदनशीलता दिसली, ना सत्यता.

इम्रान खान यांच्याकडे पाकिस्तानच्या कारभाराची सूत्रे आल्यानंतर काही सकारात्मक बदल घडतील, अशी आशा व्यक्त होत होती. पण ती फोल ठरली आहे. दहशतवादी हल्ल्याविषयी त्यांच्या निवेदनात ना संवेदनशीलता दिसली, ना सत्यता.

पा किस्तानचे पंतप्रधान म्हणून प्रख्यात क्रिकेटपटू इम्रान खान यांची निवड झाली, तेव्हाच्या प्रचारमोहिमेत त्यांनी ‘नया पाकिस्तान!’ असा नारा दिला होता. इम्रान खान हे उच्चविद्याविभूषित आणि जगभरात नावाजलेले गेलेले खेळाडू आहेत. त्यामुळे आता खरोखरच पाकिस्तान बदलू शकेल, असे अनेकांना वाटले होते. मात्र, पुलवामा येथे गेल्या आठवड्यात भारतीय सीमा सुरक्षा दलांच्या जवानांवर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर पाच दिवसांचे मौन सोडताना, त्यांनी जे काही तारे तोडले आहेत, ते बघितल्यावर पाकिस्तान तर सोडाच खुद्द इम्रान खानही बदललेले नाहीत, यावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. पुलवामा येथील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा बदला घेतला जाईल आणि भारतीय जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असा कडक इशारा पाकिस्तानला दिला आहे. त्यानंतर आता खानसाहेबांचा एक व्हिडिओ आला असून, त्यात त्यांनी भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यास त्यास रोखठोक प्रत्युत्तर दिले जाईल, अशी दर्पोक्ती केली आहे. त्याचबरोबर पाकिस्तानी लष्कराचे पिल्लू असलेल्या ‘जैशे महम्मद’ या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी तातडीने स्वीकारली असतानाही, इम्रान खान या हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याचा पुरावा मागत आहेत. भारताने अर्थातच या मुक्‍ताफळांचा कडक समाचार घेतला असून, इम्रान यांचे पितळ उघडे पाडले आहे. या हल्ल्याचा सूत्रधार तसेच ‘जैश’चा म्होरक्‍या मसूद अझर हा पाकिस्तानमध्येच उजळ माथ्याने फिरत असून, त्यास खानसाहेबांचे सरकार हे संरक्षण देत असताना, आणखी कोणत्या पुराव्यांची पाकिस्तानला गरज आहे, असा सवाल भारताने केला आहे. इम्रान खान असोत की आणखी कोणी पाकिस्तानी पंतप्रधान हा तेथील लष्कराच्या हातातील बाहुलेच असतो, हीच बाब खानसाहेबांच्या या उद्दाम भाषेमुळे अधोरेखित झाली आहे.
इम्रान खान यांनी या व्हिडिओत आणखी बरेच प्रवचन दिले असून, पाकिस्तान हा दहशतवाद्यांना स्थान देत नाही, पाकिस्तानला आता एक नवे राष्ट्र बनायचे आहे, वगैरे भाष्य केले आहे. प्रत्यक्षात पाकिस्तान हा जागतिक स्तरावरील अनेक दहशतवाद्यांना आपल्या देशात आश्रय देत असतो. अमेरिकेतील ‘ट्‌वीन टॉवर्स’वरील भीषण हल्ल्याचा सूत्रधार ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानातील ओबाटाबाद येथे राहत होता. हे तेथे अचानक आणि धाडसी कारवाई करून अमेरिकी सैनिकांनी त्यास ठार मारल्यामुळे सिद्ध झाले आहे. एवढेच नव्हे, तर मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याचा सूत्रधार आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील घोषित दहशतवादी हाफिज सईद हाही पाकिस्तानातच आहे. खरे तर अमेरिकी सरकारने त्याच्यासाठी एक कोटी डॉलरचे बक्षीस लावले आहे. मात्र, पाक लष्कर त्यासही भीक घालत नाही आणि पाक सरकारही हाफिज असो की अझर असो, यांना उघड संरक्षण देत असतानाही हे खानसाहेब ‘नया पाकिस्तान’ आणि पाकची नवी प्रतिमा आदी विषयांवर प्रवचन झोडत आहेत. भारत सरकारचे परराष्ट्र खाते तसेच अर्थमंत्री अरुण जेटली यांनी इम्रान यांचे थेट कान उपटले तर आहेतच; शिवाय, यापूर्वीचा मुंबईवरचा हल्ला असो की पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावरील हल्ला असो, त्या त्या वेळी भारताने पाकिस्तानकडे सज्जड पुरावे दिले होते. त्याचे काय झाले? पठाणकोट येथे पाकने केलेल्या हल्ल्यानंतर ‘पठाणकोट डोसियर’ या नावाने पुराव्यांचा एक दस्तावेज पाकला देण्यात आला होता, याची आठवण तर काश्‍मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि ‘पीडीपी’च्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनीच पाकला करून दिली आहे. तर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही भारत पाकला ‘जशास तसे’ उत्तर देईल, असे ठणकावले आहे. खानसाहेबांच्या या मुक्‍ताफळातील सर्वात गर्हणीय भाग म्हणजे त्यांनी भारतात येत्या दोन-अडीच महिन्यांत होऊ घातलेल्या निवडणुकांमुळे या विषयाचे राजकारण होत आहे, असे तोडलेले तारे! ‘पाकशी वाकडे घेऊन मते मिळवणे सोपे असते!’ असे ते म्हणाले आहेत. भारतात लोकशाही आहे आणि त्या प्रचारात कोणताही विषय येऊ शकतो. त्याच्याशी इम्रान खान यांचे देणेघेणे ते काय? मात्र, त्यापलीकडची बाब म्हणजे या निवेदनास पाच दिवस लागले कारण म्हणे सौदी अरेबियाचे राजपुत्र पाकिस्तानात होते! खरे तर त्यांनी या हल्ल्यात ठार झालेल्या जवानांच्या प्रती किमान दु:ख व्यक्‍त करून त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा द्यायला हवा होता. प्रत्यक्षात हे निवेदन अत्यंत असंवेदनशील आणि उद्दाम असे आहे आणि त्यामुळेच इम्रान सतत जी ‘नया पाकिस्तान’ची भाषा करीत असतात त्यातील फोलपणही उघड झाले आहे. पाकिस्तान बदलला तर नाहीच; उलट नव्या बाटलीतून इम्रान जुनीच मात्रा देत आहेत. यापलीकडे त्यांच्या निवेदनात काहीही नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pulwama Terror Attack : pakistan pm imran khan statement in editorial