काँग्रेसचाही धक्कातंत्राचा प्रयोग 

अनंत बागाईतकर
सोमवार, 28 जानेवारी 2019

प्रियांका गांधी यांच्या राजकारणप्रवेशाचे टायमिंग लक्षात घेता कॉंग्रेसचे हे धक्कातंत्रच म्हणावे लागेल. ते बऱ्यापैकी यशस्वीही झाले; पण निवडणुकीत त्या कितपत प्रभाव पाडतात, यावर बरेच काही अवलंबून असेल. 

प्रियांका गांधी-वड्रा यांचा अनेक वर्षे बहुप्रतीक्षित असलेला सक्रिय राजकारणप्रवेश अखेर झाला. या घटनेचे अन्वयार्थ लावण्याचे प्रकारही लगेचच सुरू झाले. राहुल गांधी हे अपयशी ठरल्याची कबुली म्हणजे प्रियांका यांचा राजकारणप्रवेश हा अर्थ कॉंग्रेसविरोधातील प्रमुख शक्ती असलेल्या भाजपतर्फे लावण्यात आला. ते स्वाभाविकही होते. दुसऱ्या टोकाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेशी टक्कर देऊ शकणारे व्यक्तिमत्त्व म्हणूनही याकडे पाहिले गेले. सर्वसाधारण पातळीवर त्यांच्या राजकारणप्रवेशाचे स्वागत झाले आहे. विशेषतः कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या पातळीवर त्यांचे विशेष स्वागत झाल्याचे आढळून येते. कॉंग्रेसमध्येही हीच भावना मुख्यतः आढळून येते, की प्रियांका गांधी यांच्या प्रवेशामुळे सर्वसाधारण कार्यकर्त्यांमध्ये व एकंदर संघटनेत चैतन्य निर्माण होईल आणि तशी चिन्हे दिसून येत आहेत. या पार्श्‍वभूमीवरच प्रियांका गांधी यांच्या सक्रिय राजकारणप्रवेशाचे आकलन करावे लागेल. 

प्रियांका गांधी यांनी सक्रिय राजकारणात सहभागी व्हावे, अशी अनेक नेत्यांकडून गेली अनेक वर्षे सातत्याने मागणी करण्यात येत होती. किंबहुना राजकारणात राहुल गांधी यांनी सक्रिय व्हावे की प्रियांका यांनी, यावरूनच सुरवातीला चर्चा होती. सोनिया गांधी यांनी पक्ष व कुटुंबप्रमुख या नात्याने राहुल गांधी यांच्या राजकारणप्रवेशाला पसंती व प्राधान्य दिले. तुटक किंवा अलिप्तपणेच राहुल राजकारण प्रवेश करते झाले. त्यांच्या या अलिप्ततेतूनच त्यांना "पप्पू' म्हणून त्यांची टिंगलही करण्यात आली होती. त्या वेळी कॉंग्रेस हितचिंतक व कार्यकर्ते या चेष्टेने एवढे गर्भगळित आणि नामोहरम झाले की राहुल यांच्याऐवजी ते प्रियांका गांधीच पक्षाच्या तारणहार म्हणून अधिक प्रभावी ठरतील, अशा भावनेने प्रियांका गांधी यांच्या राजकारण प्रवेशासाठी धावा सुरू करण्यात आला होता; परंतु त्या वेळी प्रियांका गांधी यांनी राजकारण प्रवेशाबाबत सूतराम पसंती किंवा उत्साह दाखवला नव्हता. आपल्याला लहान मुले असल्याचे कारण पुढे करून त्यांनी या अटकळबाजीचा मुकाबला केला होता. आता परिस्थिती बदलली आहे.

प्रियांका गांधी यांची मुलेही आता मोठी झाली आहेत. त्याचप्रमाणे राहुल गांधी यांची अपयशी आणि "पप्पू' म्हणून होणारी हेटाळणी आता बहुतांशी थांबलेली आहे. राहुल गांधी यांची राजकारणाबद्दलची उदासीनता, तुटकपणा व अलिप्तता ही आता इतिहासजमा झालेली आहे. उलट भारतीय राजकारणात त्यांची दखल घेतली जाऊ लागली आहे. त्यांच्यावर बसलेला अपयशाचा शिक्काही आता तेवढा दाट आणि गडद राहिलेला नाही. ज्या तीन हिंदी भाषक राज्यांमध्ये भाजपचे वर्चस्व मानले जात होते, तेथे भाजपला पराभूत व्हावे लागले आणि गेली पंधरा वर्षे सत्तेपासून दूर असलेल्या कॉंग्रेसची सरकारे मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये स्थापन झाली.

राजस्थानातही कॉंग्रेसला यश मिळाले. यामध्ये राहुल गांधी यांचा वाटा किती, हा नेहमीच वादाचा मुद्दा राहील आणि त्याबाबत उलटसुलट युक्तिवादही केले जातील; परंतु या निमित्ताने त्यांच्यावरील अपयशाचा शिक्काही दूर झाला. त्यामुळे प्रियांका गांधी यांचा सक्रिय राजकारणातील प्रवेश ही राहुल यांच्या अपयशाची कबुली असल्याची भाजपची टीका कॉंग्रेस व राहुल यांच्यावर चिकटू शकणार नाही. 

कॉंग्रेसमधील काही दिग्गजांच्या मते अतिविलंबाने झालेल्या या प्रियांका-प्रवेशाचा पक्षाला कितपत लाभ होईल, याबाबत आताच काही सांगता येणार नाही. कारण पूर्वीच त्यांनी प्रवेश केला असता, तर एव्हाना त्यांचे आसन स्थिरस्थावर झाले असते; परंतु दुसऱ्या बाजूला पक्षातील तरुण नेतृत्वाला या निर्णयाचे "टायमिंग' अचूक वाटते. कारण नरेंद्र मोदी यांच्या "धक्कातंत्री' राजकारणाला कॉंग्रेसने दिलेले चोख उत्तर, असे त्यांचे म्हणणे आहे. प्रियांका यांची वलयांकित नेत्यांमध्ये गणना होते. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांच्या वलयाचा पक्षाला लाभ होईल, असे मानले जाते. प्रियांका यांच्या प्रवेशाच्या बातमीला माध्यमजगतात ज्या पद्धतीने प्रसिद्धी मिळाली व त्यावरील भाजपच्या मतप्रदर्शनामुळे कॉंग्रेसचे हे धक्कातंत्र बऱ्याच अंशी यशस्वी झाले, असे मानले जात आहे. 

प्रियांका गांधी यांच्याबाबत पक्षातील वरिष्ठ मंडळींमध्ये स्वागत व सदिच्छेची भावना असली तरी अद्याप त्यांच्या मनात काही शंका आहेत. प्रियांका गांधी यांची लोकसभा निवडणुकीतील कामगिरी कशी राहते, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहतील, असे त्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर कॉंग्रेस पक्षावर घराणेशाहीचा जो आरोप लावला जातो त्याची तीव्रता आगामी काळात वाढत जाईल आणि त्याचा प्रतिवाद कॉंग्रेस पक्ष कितपत यशस्वीपणे करू शकेल, याबाबत या वरिष्ठ नेत्यांच्या मनात शंका आहेत.

थोडक्‍यात, प्रियांका यांच्या मूल्यामापनासाठी लोकसभा निवडणुकीच्या निकालांपर्यंत वाट पहावी लागेल, असे या नेत्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार प्रियंका-प्रवेशाचा निर्णय हा राहुल-प्रियांका-सोनिया या तीनजणांनी मिळूनच केला आहे. त्यामागे काही प्रमाणात धास्तावलेपणाची भावनादेखील आहे. प्रियांका यांच्या प्रवेशामुळे त्यांचे पती रॉबर्ट वड्रा यांच्या मागे असलेला ससेमिरा कदाचित कमी होऊ शकतो, अशी एक अटकळही व्यक्त केली जाते. अर्थात, वर्तमान राज्यकर्त्यांनी चुकाच करायचे ठरविले असल्यास त्याचा लाभ कॉंग्रेसला होऊ शकेल, याकडे डोळेझाक करता येणार नाही. 

याचे काही राजकीय अन्वयार्थ आहेत. उत्तर प्रदेशाची जबाबदारी प्रियांका गांधी यांच्यावर आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने आघाडी करून कॉंग्रेसला बाहेर ठेवले आहे. प्रियांका यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशाची जबाबदारी आहे. सुमारे 42 लोकसभा मतदारसंघ या विभागात आहेत. यामध्येच लखनौ व मध्य उत्तर प्रदेशाचाही समावेश होतो. याखेरीज पंतप्रधानांचा वाराणसी मतदारसंघ, अमेठी, रायबरेली हे मतदारसंघ याच विभागात आहेत. अर्थात, कॉंग्रेसला प्रामुख्याने याच विभागातून यश मिळालेले आहे. या ठिकाणी भाजप, समाजवादी व बहुजन समाज पक्ष हे तिन्ही पक्ष आपापले सामर्थ्य राखून आहेत. त्यामुळे प्रियांका यांचा मार्ग निष्कंटक नाही. भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी "ठाकूरवादा'चा काहीसा अतिरेक करून ब्राह्मण समाजाला दुखावले आहे. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे लहान व्यापारी वर्ग नाराज आहे. अर्थात, केंद्र सरकारने उच्चवर्णीयांमधील आर्थिक दुर्बलांसाठी राखीव जागांची तरतूद करून काही प्रमाणात त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केलेला असला तरी ते उशिरा सुचलेले शहाणपण आहे. या नाराजीचा लाभ कॉंग्रेस उठवू पाहत आहे. त्यासाठी प्रियांका हा हुकमी पत्ता कॉंग्रेसने काढला आहे.

अर्थात, हे करतानाही राहुल गांधी यांनी समाजवादी व बहुजन समाज पक्षांशी समझोत्यास अनुकूलता दाखविलेली आहे हे विशेष. त्यामुळे अद्यापही उत्तर प्रदेशातील विरोधी पक्षांच्या राजकारणाची सूत्रे समाजवादी व बहुजन समाज पक्षाकडेच आहेत. मायावती यांनी अद्याप या घटनेवर प्रतिक्रिया दिलेली नाही, ही बाब लक्षणीय आहे. या सर्व चौकटीतच प्रियांका यांना कामगिरी करून दाखवावी लागणार आहे. त्यामुळे सुरवातीचा उत्साह मावळल्यानंतर स्थिरचित्तानेच त्यांच्यासमोरील आव्हाने विचारात घ्यावी लागतील. त्यांचे मूल्यमापन लोकसभा निवडणुकीनंतरच होईल व त्यावरच त्यांच्या राजकीय भवितव्याचे हिशोब मांडले जातील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Article on Current Political Situation