यह फिल्म नहीं आसां! (ढिंग टांग!)

यह फिल्म नहीं आसां! (ढिंग टांग!)

महामॅडम : (विषण्ण स्थितीत बसून) तरी मी तुम्हाला सांगत होते, आपलं चरित्र आपणच लिहावं! दुसऱ्या कुणी लिहिलं की असे ऍक्‍सिडंट होणारच! 
डॉ. सिंग : (चुळबुळत) ते थोडं चुकलंच! 
महामॅडम : (नाराजीनं) तुमचा बायोडेटाच बत्तीस पानी आहे! त्यात थोडी भर घातली असतीत, तरी सहज आत्मचरित्र झालं असतं! दुसऱ्या कुणाला कशाला लिहू द्यावं? 
डॉ. सिंग : (जागच्या जागी थिजत) पण त्यांनी चरित्र लिहिलेलं नाही माझं! 

महामॅडम : (भिवया उंचावत) मग? 
डॉ. सिंग : (खुलासा करत) त्यांनी त्यांचंच आत्मचरित्र लिहिलं! त्यात माझी वर्णनं आली त्याला मी काय करणार? 
महामॅडम : (मान हलवत) तुम्ही परवानगी द्यायलाच नको होती त्यांना असं पुस्तक लिहायला! 
डॉ. सिंग : (हतबलतेनं) मी नाहीच दिली! 
महामॅडम : (जाब विचारल्यागत) मग? 
डॉ. सिंग : (ओशाळल्यागत) त्यांनी मागितलीच नाही, मग मी देणार कशी? 

महामॅडम : (निषेधाच्या सुरात) त्यांनी शहाजोगपणे पुस्तक लिहिलं, आणि त्यांनी तितक्‍याच बेमुर्वतपणे त्याच्यावर आधारित सिनेमा काढलान! "ऍक्‍सिडेंटल प्राइम मिनिस्टर' म्हणे! हु:!! 

डॉ. सिंग : (अपराधी सुरात) मला खरंच वाटलं नव्हतं असं काही होईल म्हणून! मला आरबीआय गव्हर्नर व्हायचं नव्हतं, झालो! मला अर्थमंत्री व्हायचं नव्हतं, झालो! मला पंतप्रधान तर अजिबात व्हायचं नव्हतं, पण- 
महामॅडम : (किंचित रागाने) म्हंजे सगळं खापर माझ्यावरच फुटतंय की! 

डॉ. सिंग : (हताशपणे) हे सगळं मी केलं नसतं, तर आज आयुष्याचा असा सिनेमा झाला नसता!! 
महामॅडम : (आश्‍चर्यानं) ह्या सिनेमावाल्यांचीसुद्धा कमाल आहे! कश्‍शावरही सिनेमा काढतात! आता तुम्ही म्हंजे मेरी कोम आहात की मिल्खा सिंग? साधे पीएम तर होता तुम्ही!! पण तुमच्यावर डायरेक्‍ट सिनेमा काढणं म्हंजे अतिच झालं! आपल्या देशात आजवर कमी का पीएम झालेत? पण सिनेमा तुमच्या एकट्याचा! हे काही मला लोकशाहीला धरुन वाटत नाही... 
डॉ. सिंग : (हळवेपणाने) पण ह्यात माझं काय चुकलं? 
महामॅडम : (बराच वेळ विचार करून असहाय्यपणे) तुम्ही इतके शिकलातच का? 

डॉ. सिंग : (हळहळ व्यक्‍त करत) तेही जरा चुकलंच! 
महामॅडम : (विचारमग्न अवस्थेत) आत्ता कुठे पार्टीला अच्छे दिन...आपलं सॉरी...ते हे...चांगले दिवस येताना दिसतायत! आत्ता कुठं आशेचा किरण दिसू लागलेला असताना नेमका तुमचा हा "ऍक्‍सिडेंटल प्राइम मिनिस्टर' चित्रपट येणार! म्हणजे बऱ्याच दिवसांनी बासुंदीची वाटी तोंडाला लावावी, तेवढ्यात त्यात माशी पडणार!! छे!! 

डॉ. सिंग : (जुजबी खुलासा करत) पत्रकारांनी काल मला चित्रपटाविषयी छेडलंच! 
महामॅडम : (काळजीच्या सुरात) मग तुम्ही काय बोललात की काय? 

डॉ. सिंग : (चुळबुळत) बोलणार होतो! पण तेवढ्यात चार पावलं पुढे चालत गेलो! बोलणं झालंच नाही!! 
महामॅडम : (सुस्कारा सोडत) हुश्‍श!! म्हंजे नेहमीसारखंच झालं म्हणायचं! झालं ते बरंच झालं म्हणा!! 
डॉ. सिंग : (खजील होत) आता काय करायचं? म्हंजे मी काय भूमिका घ्यायची? 

महामॅडम : (कंटाळून) तुमच्या भूमिकेमुळेच हा सिनेमा येतोय ना!! आता तुम्ही काही करू नका!! (बराच वेळ शांतता...) असं करा!! एखादा चांगलासा निर्माता शोधा! भावी पंतप्रधानाच्या कारकिर्दीवर एखादा छानसा चित्रपट आपल्याला काढता येणार नाही का? बघा, जमतंय का!! 

- ब्रिटिश नंदी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com