ढिंग टांग! :...अब क्‍या करें? 

ढिंग टांग! :...अब क्‍या करें? 

दीदी : (दबक्‍या पावलांनी प्रवेश करत) कुणी आहे का?...हलोऽऽऽ... 
रागा : (पलंगावर आडवे पडून) मी इथे आहे..! 
दीदी : (हुश्‍श करत) सापडलास..! कित्ती शोधलं तुला मी! कुठे गेला होतास? 
रागा : (पांघरूण डोक्‍यावर घेत) इथेच आहे मी सकाळपासून! 
दीदी : (काळजीच्या सुरात) किमान चाळीस फोन केले असतील तुला! 

रागा : (खोल आवाजात) आणखी थोडे केले असतेस, तर आपल्या जिंकलेल्या प्रत्येक सीटमागे एक कॉल असा रेट पडला असता!! 
दीदी : (विषय झटकत) जाऊ दे रे! एवढं काय मनावर घेतोस? चलता है!! 
रागा : (रडक्‍या सुरात) असं किती वर्षं म्हणत राहायचं? 
दीदी : (कपाळ चाचपत) ये क्‍या हाल बना रख्खा है... कुछ लेते क्‍यूं नहीं! बरं वाटत नाहीए का तुला? 
रागा : (घुश्‍शात) मी अगदी खुशीत आहे दीदी! 
दीदी : (गालगुच्चा घेत) एक माणूस खट्टू झालंय, ते कळतंय बरं का मला! पण तुझी समजूत घालायलाच आले होते!! मम्मा कुठाय? 

रागा : (मान खाली घालून) डोण्ट नो... 
दीदी : (विचारात पडत) आपली मम्मा बहुतेक पुन्हा बिझी होणार असं दिसतंय! 
रागा : (उसळून) म्हंजे? रिटायर होऊन तिनं माझ्याकडे सगळी पार्टी सोपवली आहे! ती पुन्हा बिझी होणार म्हंजे नेमकं काय म्हणायचंय तुला? 
दीदी : (विषय बदलत) हे बघ, माझं नीट ऐकून घे! इतकं मनाला लावून घेण्यासारखं हे इलेक्‍शनच नव्हतं! आपण मज्जेत प्रचार केला की नाही? हातात साप घेतले! गाडीच्या टपावर बसून फिरलो! देवळांमध्ये गेलो! बोटीत बसलो! होडीत बसलो! हेलिकॉप्टरने हिंडून घेतलं... झालं तर मग! आता एवढी मेहनत करूनही आपला पराभव झाला, त्याला काय करणार? तू कर्तव्यात कुठलीही कसूर केली नाहीस, ह्याचा प्रचंड अभिमान आहे आम्हाला! तेव्हा दोन दिवस आराम कर आणि पुन्हा कामाला लाग! 

रागा : (सात्त्विक संतापाने) तेच म्हणतो मी! पण... 
दीदी : (प्रेमळपणाने) पण? पण काय? 
रागा : (निरागसपणाने) कामाला लागू म्हंजे मी नेमकं काय करू? 
दीदी : (उत्तर टाळत) सध्या तू आरामच कर! खूप दमला असशील! 
रागा : (तंद्रीतून भानावर येत संतापानं) हे सरळसरळ चीटिंग आहे!! मी इतकं जोराजोराने ओरडून जगाला सांगत होतो की चौकीदार चोर है, चौकीदार चोर है...पण कुणीही ऐकलं नाही!! ह्याला काय अर्थय? 

दीदी : (सुस्कारा सोडत) आपल्या राशीला सध्या शनीची बाधा झाली आहे! त्याची फळं आहेत ही बरं! सारा काही ग्रहांचा खेळ आहे!! 
रागा : (भडकून) सब मिले हुए है, सब मिले हुए है... हे ग्रह, हे मीडियावाले, हे आपले नेते... सब मिले हुए है... 
दीदी : (मटकन बसून) मेरे खयालसे जनता भी उनसे मिली हुई है!! काय करणार? 

रागा : (गोंधळात पडलेल्या अवस्थेत) अब क्‍या करें दीदी... कुछ तो आयडिया दे दो!! 
दीदी : (हुशारीने) मला असं वाटतं की तू काही दिवस आरामच करावास... हेच बरं! 
रागा : (खांदे उडवत) मला काय झालंय? मी ठीक आहे! 
दीदी : (हळूचकन) पक्षासाठी म्हणतेय मी! तू आराम करावास हेच बरं! 
रागा : (हात चोळत) अब आराम में भी दिल लगता नहीं!! 
दीदी : (चुटकी वाजवत) एक झक्‍कास आयडिया! तू... तू... तू विपश्‍यनेला का जात नाहीस पुन्हा? 

- ब्रिटिश नंदी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com