चिंतन !  (ढिंग टांग!) 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

स्थळ : 10, जनपथ, न्यू डेल्ही. 
वेळ : शोकमग्न. 
प्रसंग : दु:खद. 
पात्रे : महामॅडम, मनमोहनजी आणि...लाडला बेटा! 

महामॅडम : (शून्यात नजर लावत सुस्कारा सोडत) काय करावं....काही समजत नाही!! 
मनमोहनजी : (समजूत घालत) हं! 
महामॅडम : (शून्यवत नजरेनं) सतत असा मार किती वर्ष खाणार? 
मनमोहनजी : (धीर देत) हं! 
महामॅडम : (कष्टी आवाजात) कुणाला कुंडली दाखवावी का? 
मनमोहनजी : (नुसता हात दाखवत) च..च...! 

महामॅडम : (गोंधळून) हात दाखवू म्हणताय? कशाला नसतं अवलक्षण?..आणि इतकी वर्ष दाखवलाच ना हात? 
मनमोहनजी : (मनमोकळेपणाने कबूल करत) हं! 
महामॅडम : (शेजारी बसलेल्या लाडक्‍या पुत्रास) बेटा, काही खाल्लंयस का सकाळपासून? 
बेटा : (मोबाइलमधून मान वर न काढता) चिक्‍कार! 
महामॅडम : (त्याच्या जावळातून हात फिरवत)...खूप मेहनत केली हो ह्यानं! कित्ती उन्हातान्हात फिरला! कित्ती देवळात जाऊन आला!! पण म्हणतात ना...दैव देतं नि कर्म नेतं! देवाची इच्छाच नसेल तर काय होणार? 
मनमोहनजी : (विषण्णपणाने) हंऽऽ...! 
बेटा : (मोबाइल गेममधून क्षणभर डोकं काढत) मम्मा, मला विश्‍वेश्‍वरय्या म्हणता येतं! म्हणून दाखवू? 

महामॅडम : (चिडखोर आवाजात) कित्ती चिडवलंन ह्याला! नाही म्हणता आलं विश्‍वेश्‍वरय्या म्हणून काय झालं? तुम्हाला तरी येतं का मनमोहनजी? पण तुम्ही झालात ना पीएम? 
मनमोहनजी : (सपशेल कबूल करत) हो! 
महामॅडम : (नाक मुरडत) ही काय प्रचाराची पातळी म्हणायची? काय ती भाषा! काय त्या घोषणा! काय त्या मिरवणुका!! अशानं एक दिवस लोकशाही लयाला जाईल! लिहून ठेवा तुम्ही!! ह्या देशात कोणालाही पीएम व्हायचा हक्‍क आहे! आहे की नाही? 
मनमोहनजी : (ठामपणाने) हो! 
महामॅडम : (तावातावाने) मग ह्यांना असं म्हणायचा काय अधिकार आहे? ह्या देशातली प्रत्येक संस्था ताब्यात घेत चालले आहेत हे कमळवाले! चांगला विरोधी पक्ष ही लोकशाहीची गरज असते आणि लोकशाही टिकवण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांवरच अधिक असते! हो की नाही? 

मनमोहनजी : (मान हलवत) हो! 
महामॅडम : (मुद्दा मांडत) ह्याचा अर्थ विरोधी पक्ष सशक्‍त हवा, ह्यासाठी सत्ताधाऱ्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत! हो की नाही? 
मनमोहनजी : (स्पष्टवक्‍तेपणानं) हं! 
महामॅडम : (पुत्राकडे पुन्हा पाहत)...म्हणून म्हणत होते, दाखवावी का पत्रिका कुणाला? तुमचं काय मत? 
मनमोहनजी : (परखडपणे मत मांडत)...हं! 
महामॅडम : (काळजीच्या सुरात) मला ह्याची भारी काळजी वाटते! देशातलं वातावरण फार बिघडलं आहे! लोकशाहीचा गळा घोटला जात आहे! प्रचाराची भाषा किती बिघडली आहे, ते तुम्ही जाणताच! 
मनमोहनजी : (सलग एका वाक्‍यात...) मी कालच तसं पत्र राष्ट्रपतीजींना पाठवलं आहे! त्या मोदीजींना जरा रागवा, असं त्यांना सांगितलंय...बहुतेक रागावतील बरेच!! 

महामॅडम : (कपाळाला हात लावत) अशा परिस्थितीत ह्या आमच्या मुलाचं कसं होणार? कल्पनेनंही कसं तरीच होतं! त्याच्यासाठी अग्निपरीक्षाच आहे ही! नाही का? म्हणून म्हणते, कुणाला दाखवू पत्रिका? 
बेटा : (मोबाइलवर गेम खेळण्यात दंग...) खल्लास! एका झटक्‍यात दहा उडवले!! हाहा!! 
महामॅडम : (त्याच्याकडे बघून मान हलवत) काय झालं बेटा? 
बेटा : (निरागसपणे) काही नाही! मी आरामात जिंकलो!! 
महामॅडम : (गप्प करत) शूऽऽऽ....मोठ्यांदा बोलू नकोस असं काही तरी! लोक ऐकतील!! 
बेटा : (दुर्लक्ष करत) ही लेव्हल मी पार केली ना की डायरेक्‍ट जॅकपॉटच!! हाहा!! 

-ब्रिटिश नंदी 
 

Web Title: Pune Edition Article Editorial Article on CHINTAN

टॅग्स