कमळीची कळकळ ! (ढिंग टांग!)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

साम-दाम-दंड-भेदाचा डायलॉग मी पालघरच्या प्रापर्टीसाठी मारला असा तुमचा गैरसमज झाला का? तुमच्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी "साम, दाम, दंड, भेद' ह्यातला कुठलाही मार्ग वापरू असे मी म्हटले होते.

प्रिय "अहो', 
शतप्रतिशत प्रणाम. पत्र लिहण्यास कारण कां की मी एताना चुकून फडताळाचे कुलूप लावून आल्ये. किल्ली माठावर ठेवली आहे. ती घेणे व आतील दूध तापवून ठेवणे. एक दिवसाआड पावशेर दूध घालण्यास भय्याला सांगून आल्ये आहे. एका माणसाला काय करायचे आहे अर्धा लिटर दूध? माझे ठीक चालले आहे. "तू एथून जा, नाहीतर मी तरी जातो,' असे तुम्ही निक्षून सांगितल्यावर मीच निघाल्ये. एताना डागडागिने व वरकड रक्‍कम मी घेऊन आल्ये आहे. (तुम्ही एटीएममधून काढा !) पालघरच्या प्रापर्टीचे तुम्ही येवढे मनाला लावून घेऊ नका. ती प्रापर्टी (आता) आपलीच आहे.

पालघरच्या प्रापर्टीचा सातबारा माझ्या नावावर वेळीच केला असता तर ही वेळ आली नसती. मला तलाठ्याला फोडावे लागले !! पण ह्या प्रापर्टीवर तुमचा डोळा आधीपासून होता. शेतकरी असल्याशिवाय अशी जमीन घेता येत नाही, हा साधा कायदा तुम्हाला माहीत नाही, ह्याला काय म्हणायचे? जाऊ दे झाले... झाले गेले गंगेला मिळाले, असे म्हणायचे, आणि (जमेल तसे) एकत्र नांदायचे. 

पहिल्यापास्नं तुमचा स्वभाव तिरका आणि संशयी. माणसानं किती संशय घ्यायचा ह्याला काही लिमिट? माझ्यासारखी सालस, सोशीक आणि समजूतदार जोडीदार तुम्हाला त्रिखंडात मिळणार नाही, हे आता तरी लक्षात आले का? तुम्ही वाटेल तसे मला टोमणे मारत होता, पण मी मान खाली घालून ऐकत (आणि मोजत) ऱ्हायले. कधी उलटा शब्द म्हणून मुखातून काढला नाही. म्हटले, काही झाले तरी आपलं माणूस आहे. येईल वळणावर ! (जातो कुठे?) आपण एकत्र राहून गुण्यागोविंदाने संसार करून आपली प्रापर्टी जोडीने वाढवू असे मी कमी कां सांगत होत्ये? शंभरदा सांगितले, पण तुम्ही ऐकले नाही. आता झाले ना तोंडाचे बोळके? 

माझ्याशिवाय तुमचे पानदिखील हलत नाही हे आता साऱ्या जगाला ठाऊक झाले आहे. त्यात काय लपवण्यासारखे आहे? तीन वेळा तुम्ही स्वबळावर लढण्याची भाषा केलीत. तिन्ही वेळा काय झाले? तोंडघशी पडलात. अहो, स्वबळावर तुम्हाला साधा भिंतीत खिळादिखील ठोकता येत नाही आणि भाषा मात्र तलवारीची करायची, हे का शहाणपणाचे आहे? भिंतीत खिळ्यावरून आठवले ! मागल्या खेपेला तुम्ही एकदा भिंतीत खिळा ठोकण्यासाठी स्टुलावर चढला होता. मी पदोपदी सांगत होते की ही कामं आपली नाहीत. पण तुम्ही ऐकेनात ! "मीच स्वबळावर खिळा ठोकणार आणि त्यावर स्वबळाने क्‍यालिंडर लटकवणार' हा तुमचा "पण' होता. तेवढ्यात कुठूनशी मेली ती पाल सरसरत आली आणि... मग काय झाले ते आठवते आहे ना? अगदी तस्सेच पालघरच्या बाबतीतही घडले ! हो की नाही? खिळा ठोकायला गेलात आणि...जाऊ दे झाले !! झाले गेले गंगेला मिळाले, असे म्हणायचे, आणि (जमेल तसे) एकत्र नांदायचे. 

साम-दाम-दंड-भेदाचा डायलॉग मी पालघरच्या प्रापर्टीसाठी मारला असा तुमचा गैरसमज झाला का? तुमच्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी "साम, दाम, दंड, भेद' ह्यातला कुठलाही मार्ग वापरू असे मी म्हटले होते. कारण शेवटी तुम्ही "आपलं माणूस' आहात. दाम, दंड आणि भेदाचे मार्ग वापरून झाले आहेत. "साम'वाला मार्ग बाकी होता. सामचा अर्थ सामोपचाराचा मार्ग ! म्हणूनच हे पत्र लिहीत आहे. झाले गेले गंगेला मिळाले असे म्हणून एकोप्याने आणखी पंचवीस वर्षे नांदू आणि एकत्र प्रापर्टी वाढवू असे मी सामोपचाराने सुचवत्ये. पटले तर कळवा, लग्गेच निघून येत्ये. परमेश्‍वर तुम्हाला सद्‌भुद्धी देवो. कळावे. आपकी अपनी कमळाबाई. 

ता. क. : सुवाच्य हस्ताक्षर बघून पत्र फाडून टाकू नका! (...तुम्हाला वाईट सवय आहे, म्हणून सांगत्ये!) कमळी. 

-ब्रिटिश नंदी 
 

Web Title: Pune Edition Article Editorial Article on Dhing tang

टॅग्स