कर्नाटकी कशिदा! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी असल्याचे भाजपने दाखवून दिले. या विधिनिषेधशून्य सत्ताकारणाला कर्नाटकात चपराक मिळाली. आता कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली का होईना सत्तेत सहभागी होता आले, एवढ्यावर कॉंग्रेसला समाधान मानून चालणार नाही; कारण ही लढाई संपली असली तरी खरे युद्ध अजून बाकीच आहे! 

भारतीय जनता पक्षाचे नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शुक्रवारी सकाळी शपथ घेतली, तेव्हा "रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी...' आपला हा कर्नाटकी कशिदा पूर्तीस नेण्याचे स्वप्न ते बघत होते! येडियुरप्पा यांचा आत्मविश्‍वास इतका जाज्वल्य होता की विश्‍वासदर्शक ठराव सभागृहात मांडला जाण्यापूर्वीच शनिवारी सकाळी त्यांनी "मी रविवारी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेईन आणि कानडी जनतेने विजयोत्सव संध्याकाळी पाचनंतर सुरू करावा' असे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते.

मात्र, जनता दल (एस) आणि कॉंग्रेस यांच्या गठबंधनाचे धागे हे येडियुरप्पा यांच्या "लाल-काळ्या' धाग्यांपेक्षा अधिक मजबूत ठरले आणि विश्‍वासदर्शक ठराव मताला टाकण्याआधीच राजीनाम्याचा निर्णय घेण्याची वेळ त्यांच्यावर आली. 

आठ आमदार त्यांना आपल्या छावणीत आणता आले नाहीत आणि त्यामुळेच आता हे "हौतात्म्य' आहे, अशा थाटात ते आणि भाजप अध्यक्ष अमित शहा बोलू लागले आहेत. आता माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे पुत्र कुमारस्वामी यांना राज्यपाल वजुभाई वाला यांनी पाचारण केले असून, बुधवारी ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. हे खरे तर आधीच व्हायला हवे होते; पण देशातील बहुतेक राज्यपाल हे बहुतेक वेळा केंद्र सरकारच्या हातात दोऱ्या असलेल्या कठपुतळ्यांप्रमाणे काम करतात. पण तसे वागून त्यांनी आपल्याच पक्षाचा मुखभंग घडवून आणला आहे, हे मात्र खरे.

आता शहा यांनी "कुमारस्वामी यांचे सरकार फार काळ टिकू शकणार नाही!' असे भाकीत केले असल्यामुळे आमदार फोडण्याचे आपले "जीवितकार्य' शहा आणि येडियुरप्पा पुढे सुरूच ठेवतील, असे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. हे आमदार फोडण्यासाठीच त्यांना राज्यपालांनी 15 दिवसांची मुदत दिली होती; मात्र सर्वोच्च न्यायालयाने लगावलेल्या सणसणीत चपराकीमुळे ही मुदत काही तासांवर आली. त्यामुळेच येडियुरप्पा हे अवघ्या 52-53 तासांचे मुख्यमंत्री ठरले! 

शहा तसेच येडियुरप्पा यांच्या कारवाया या पुढेही सुरू राहणार असल्याने कुमारस्वामी विश्‍वासदर्शक ठराव तरी जिंकणार ना, असे प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. कुमारस्वामी सरकारचा पराभव झालाच तर त्यामुळे भाजपच्या रणनीतीवर झगझगीत प्रकाश पडेल आणि कॉंग्रेसची प्रतिमा अधिक उजळून निघेल. त्यामुळेच कर्नाटकात निकालानंतरच्या चार दिवसांत जे काही घडले, त्यापासून कोण काय बोध घेणार, हा प्रश्‍नही समोर आला आहे. प्रादेशिक पक्षांचे साह्य घेतल्याशिवाय आपण भाजपचा पराभव करू शकत नाही, हा धडा कॉंग्रेसने या अनुभवातून घेतलेला दिसतो. त्यामुळेच बुधवारच्या शपथविधीस देशभरातील विविध प्रादेशिक पक्षांच्या बड्या नेत्यांना कॉंग्रेसने आवर्जून आमंत्रण दिले आहे. एका अर्थाने आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर ही नव्या समीकरणांची फेरजुळणीच आहे.

भाजपला मात्र या कर्नाटकी महानाट्यापासून बरेच काही शिकावे लागणार आहे. एकतर "सत्तातुराणां न भयं न लज्जा' या पद्धतीच्या वर्तनामुळे भाजपच्या प्रतिमेला तडा गेला आहे. पुढच्या चार महिन्यांत होणाऱ्या राजस्थान, मध्य प्रदेश तसेच छत्तीसगड या राज्यांमध्ये पक्षाची पुन्हा कसोटी लागेल. मात्र, या तिन्ही राज्यांमधील लढाई ही भाजप तसेच कॉंग्रेस या दोन पक्षांमधील थेट लढाई आहे. तेथे जद(एस) प्रमाणे कोणताही तिसरा भिडू नाही. शिवाय, जखमी झालेला वाघ ज्याप्रमाणे अधिक चवताळून उठतो, त्या न्यायाने भाजपही गेल्या चार वर्षांत आत्मसात केलेले आपले "किलर इन्स्टिंक्‍ट'चे कसबही संघपरिवारास सोबत घेऊन सर्वशक्‍तीनिशी पणास लावणार आहे. 

या साऱ्या पोरखेळात खऱ्या अर्थाने नाचक्‍की झाली ती येडियुरप्पा यांचीच! फाजील आत्मविश्‍वास त्यांना नडला. अर्थात, या आधी एकदा फोडाफोडीच्या राजकारणातून कमावलेले मुख्यमंत्रिपद त्यांना आठवडाभरात सोडावे लागले होतेच. मात्र, त्यांच्या शपथविधीला अनुपस्थित राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच शहा यांनी आपण या "खेळा'पासून दूर असल्याचा देखावा उभा केला. पण पूर्ण बहुमत मिळते, तर त्याचे श्रेय या जोडगोळीस देण्यात भाजप नेत्यांमध्ये स्पर्धा लागली असती! त्यामुळे आता या "अपश्रेया'चे धनीही हेच दोघे आहेत. मोदी-शहा यांच्याविना 2008 मध्ये येडियुरप्पा यांनी 110 जागा भाजपला जिंकून दिल्या होत्या.

अवघी कुमक कर्नाटकात उतरवून आणि पंतप्रधानांनी दोन डझनाहून अधिक सभा घेऊनही तो आकडाही गाठता न येणे, हे मोदी-शहा दुकलीचेच अपयश आहे. त्यामुळे आता या पराभवानंतर भाजप तसेच संघपरिवार अधिक जोमाने आणि कौशल्याने पुढची रणनीती आखणार, यात शंका नाही. त्यामुळे कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली का होईना सत्तेत सहभागी होता आले, एवढ्यावर कॉंग्रेसला समाधान मानून चालणार नाही; कारण ही लढाई संपली असली, तरी खरे युद्ध अजून बाकीच आहे! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Article Editorial Article on Karnataka Politics