शुक्रतारा! (ढिंग टांग!)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

बघ पहाट झाल्यावरती 
अवतरतील पश्‍चिमवारे 
तिमिरात हरवले सूर 
तू पहाटगाणे गा रे 

बघ पहाट झाल्यावरती 
अवतरतील पश्‍चिमवारे 
तिमिरात हरवले सूर 
तू पहाटगाणे गा रे 

अंधाऱ्या रात्री हलती 
भिंतीवर त्या पडछाया 
कंठात थिजे आकांत, 
थर्थरे भयाने काया 

पथदीप उभे रांगेने 
खालती घालुनी मान 
तारेवर निश्‍चल घूक 
घे अमंगळाची तान 

हे कण्हणारे आभाळ, 
तुटणारे अगणित तारे 
तिमिरात हरवले सूर 
तू पहाटगाणे गा रे 

ही नक्षत्रांची दुनिया 
पांगली अशी कशाने 
चंद्राची चाहुल येता 
सळसळती पिंपळपाने 

घर कौलारावर माझ्या 
साकळे अशी तिन्हीसांज 
दूरस्थ राऊळी तिथल्या 
वाजते मंदशी झांज 

ती रात्र दिवे मालवते, 
अंधारातच दडते सारे 
तिमिरात हरवले सूर 
तू पहाटगाणे गा रे 

हा कोण उभा दाराशी 
अपरात्री अंगणवेडा 
त्या स्वमग्न प्राजक्‍ताचा 
भूमीशी मौन बखेडा 

त्या शुभ्र फुलांच्या देठीं 
आरक्‍त पेटल्या ज्योती 
नि:शब्दांमधल्या ओळी 
जणू काही सांगून जाती 

ह्या खिन्न मनाच्या भवती 
दु:खाचे क्रूर पहारे 
तिमिरात हरवले सूर 
तू पहाटगाणे गा रे 

अज्ञात नदीच्या काठी 
मज आठवते ती धून 
गतजन्माच्या स्मरणांची, 
अन्‌ ओळख देते खूण 

मी खणतो, वाहुनि नेतो, 
स्मरणाचे किती ढिगारे 
तिमिरात हरवले सूर 
तू पहाटगाणे गा रे 

ही लबडब होते आंत 
स्पंदते उराशी काही 
दु:खाचे झाडच वठले, 
मज त्याचा गहिवर नाही 

कुणि निश्‍चल शय्येवरती, 
मोजतसे येरझारे 
तिमिरात हरवले सूर 
तू पहाटगाणे गा रे 

बाजार सुरांचे भरले 
ही सजली भव्य दुकाने 
हा कोलाहल केव्हाचा 
हे कुठले नवे तराणे 

पेठेत येथल्या तरीही 
आहे ती दिव्य सराई 
जेथे न कुणी पांथस्थ 
तहानेने व्याकुळ जाई 

जेथील सुरांचे बुधले, 
आकंठ प्राशुनी घ्या रे 
तिमिरात हरवले सूर 
तू पहाटगाणे गा रे 

चल, सरली रात्र सख्या रे 
पथदिवे हळूहळू विझले 
पूर्वेच्या जरा कडेला 
शुक्राचे दर्शन झाले 

बघ, मंद मंद वाऱ्यांची 
ती ऐकून घेई गीते 
वाऱ्यातच असती सूर 
वाऱ्यांचे असते नाते 

शुक्राच्या अंगावरती, 
दु:खाचे क्‍लांत शहारे 
तिमिरात हरवले सूर 
तू पहाटगाणे गा रे 

तो गेला, गाऊन गेला 
त्याच्यासम दुजा न कोणी 
वाऱ्यावर वाहत गेली, 
शुक्राची एक विराणी 

-ब्रिटिश नंदी 
 

Web Title: Pune Edition Article Editorial Article on Shukra Tara

टॅग्स