शैशव (पहाटपावलं)

शैशव (पहाटपावलं)

ज्येष्ठ नागरिक व्हायचं वय झालं, त्या सुमाराला नवं घर बांधायला घेतलं. वर्षानुवर्षे पहिल्या मजल्यावर राहायची सवय. त्यामुळे आम्ही उभयताने पहिल्या मजल्यावर राहायचं ठरवलं. लिफ्ट लावायची नाही, असंही ठरवलं. जिन्याला दोन्ही बाजूंनी आधाराला बार लावून घेतले. हात-पाय चालताहेत तोपर्यंत किमान हा चढ-उताराचा व्यायाम तरी घडावा हा उद्देश.

घरी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचीही सोय त्यामुळे होणार होती. 
उद्या काय होईल, हा विचार करायची मला सवय नाही. रात्री छान झोप लागली व सकाळी आपोआप जाग येऊन ताजंतवानं वाटलं की, देवाचे आभार मानायचे व रोजच्या दिनक्रमाचा पाठपुरावा करायचा, हे आम्ही उभयतानं ठरवलं आहे. दोघेही डॉक्‍टर असल्यामुळे कुठल्या लक्षणांची काळजी करायची हे ठाऊक आहे. शारीरिक हालचालीनंतर थोडेफार निर्बंध आल्यामुळे बाहेर पडण्याचं प्रमाण कमी झालं असलं, तरी मोतिबिंदू काढल्यावर डोळे शाबूत आहेत.

मनाची एकाग्रता नीट साधते. डोकं शांत असतं. त्यामुळे चारचाकी वाहन अजून तरी स्वत: चालवतो. क्वचित नकारात्मक विचार मनात डोकावतात; पण लगेचच एखादा प्रसंग असा घडतो की सगळी जळमटं निघून जातात. 
परवा असंच झालं. वर्तमानपत्र चाळत होतो. तेवढ्यात निरोप आला. ""एक आजीबाई खाली आल्या आहेत. भेटायचं म्हणताहेत.''

मी म्हटलं, ""जिना चढणार असल्या तर वर घेऊन ये. नाहीतर मी खाली येतो.'' थोड्याच वेळात एक हसतमुख, कृश देहयष्टी असलेली वृद्धा "येऊ का?' म्हणून दारात उभी राहिली. मला अपराधी वाटलं, ""अहो, तुम्हाला पायऱ्या चढाव्या लागल्या. मी आलो असतो खाली.'' त्यावर त्या हसत-हसत म्हणाल्या, ""अहो, त्यात काय, माझ्या लेकीकडे 60 पायऱ्यांची उतरचढ दिवसातून 4-5 वेळा करते.'' मी शकुंतला भागवत. माझे पती डॉक्‍टर होते. आम्ही तुमच्या गल्लीत राहत होतो.''

एकदम आठवलं. खास वऱ्हाडी व्यक्तिमत्त्व असलेले डॉ. सुधाकर भागवत माझ्यापेक्षा 8-10 वर्षांनी मोठे असले तरी आमचं मैत्र होतं.

शकुंतलाबाई म्हणाल्या, ""अहो, तुमचा "सकाळ'चा स्तंभ मी नियमित वाचते. छान लिहिता तुम्ही.'' 
""अहो, वाचकांची पसंती आम्हाला लिहायला खंडीभर बळ देते. तुमची तब्येत काय म्हणते?'' 

शकुंतलाबाई म्हणाल्या, ""एकदम ठणठणीत. आता मुलीच्या घरून चालत आले. जिना चढून तुमच्यापर्यंत पोचले. कुठलीही व्याधी नाही. ना मधुमेह ना रक्तदाब. पुण्याला माझी मुलगी व जावई मला फार जपतात. घरी बाग आहे. त्या बागेची निगराणी मी करते. छान वेळ जातो. वाचनाची आवड आहे. लिहिण्याचीही. पण, लिखाण स्वत:पुरतं, स्वत:साठी. प्रसिद्ध नाही केलं. माझे वडील त्यांच्या काळचे प्रसिद्ध साहित्यिक होते. बुलडाण्याचे श्री या. मा. काळे त्यांचं नाव. त्यामुळे वाचन भरपूर घडलं. खेळामध्ये, नाटकांमध्ये पुढे असायची मी. कित्येक पारितोषिकं जिंकली त्या काळी. लग्नानंतर मात्र बंधनं आली सगळ्यांवर. शंभर टक्के गृहिणी व आईची भूमिका निभावली. वाचन मात्र सुरू राहिलं.

लेखन, वाचन, बागकाम व जुन्या रम्य आठवणी यात छान मन रमतं. डॉक्‍टरसाहेब गेल्यावर स्थिरस्थावर व्हायला थोडा काळ गेला; पण मुलांनी सांभाळून घेतलं. डॉक्‍टर साहेबांसोबतचे चांगले क्षण आठवणं हाही विरंगुळा असतो. त्यांचं बोलणं मी ऐकत होतं. स्पष्ट उच्चार, खणखणीत आवाज, समृद्ध भाषा यामुळे बोलणं रंजक होतं.''

वयाच्या 84व्या वर्षी, पतीच्या निधनानंतर एकटेपणा असला, तरीही कसलीही खंत किंवा खेद न ठेवता सकारात्मक विचार करण्याची वृत्ती यामुळेच त्यांची प्रकृती ठणठणीत असावी. वयासोबत येणारे कुठलेही आजारपण किंवा व्याधी नाहीत हे सगळं ईश्‍वरदत्त असलं तरी प्राप्त परिस्थितीमध्ये आनंदी राहण्यासाठी वेगळीच वृत्ती लागते.

निघता निघता त्या म्हणाल्या, ""अहो, मला म्हातारपण आलं असं वाटतच नाही.'' "तुझं आहे तुजपाशी' या पु. ल. देशपांडे यांच्या नाटकातलं वाक्‍य बदलून मी म्हणते - शैशवच अजून संपलं नाही.'' 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com