तरुणांना घडविणारी "यशोधरा' (पहाटपावलं)

डॉ. श्रीकांत चोरघडे 
सोमवार, 8 एप्रिल 2019

रोजगाराच्या शोधात खेड्यातून शहराकडे, पूर्वेकडून पश्‍चिमेकडे, विकसनशील देशांकडून विकसित देशांकडे तरुणांचे फार मोठ्या प्रमाणावर स्थलांतर हल्ली सुरू आहे. सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे.

रोजगाराच्या शोधात खेड्यातून शहराकडे, पूर्वेकडून पश्‍चिमेकडे, विकसनशील देशांकडून विकसित देशांकडे तरुणांचे फार मोठ्या प्रमाणावर स्थलांतर हल्ली सुरू आहे. सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. गरज आहे त्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होत नाही, असा तज्ज्ञांचा दावा आहे. अशावेळी तन्वीर मिर्झा नावाचा युवक गावातच राहून, गावात किंवा गावाजवळ रोजगाराच्या, व्यापाराच्या संधी आहेत, या विश्‍वासातून "यशोधरा' या संस्थेच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीचे प्रयोग करीत आहे. हा सर्वसामान्य लोकांच्या मताने अव्यापारेषुव्यापार आहे. सरन्यायाधीश पित्याच्या पोटी जन्मलेला, उच्चशिक्षित असलेला हा तरुण स्वकर्तृत्वावर देशोदेशी मोठ्या हुद्यांवर काम करून, भरपूर गंगाजळी जमा करून देशहिताने प्रेरित होऊन या कार्यात उतरला आहे. 

हिरवाई कशी वाढेल, शेती फायदेशीर कशी होईल, पाण्याचा थेंबन्‌थेंब कसा वाचवता येईल, ग्रामीण व स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, या दृष्टीने तन्वीर मिर्झा कार्यरत आहे. यासोबतच पर्यावरण रक्षणासाठीही त्याची धडपड सुरू आहे. यासाठी तन्वीरने वेगवेगळे प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत. त्यातून सौरऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांविषयी माहिती व वापरण्याच्या कौशल्याचा परिचय करून दिला जातो. सूर्यचूल, सूर्यविद्युत, सूर्यऊर्जेवर चालणारे पाण्याचे पंप आदी विविध साधनांचा परिचय व प्रशिक्षण देण्याचे काम या संस्थेमार्फत केले जाते. घनकचऱ्याचे, शिळ्यापाळ्या अन्नाचे खत कसे बनवायचे, जमिनीतील पाण्याचा स्तर कसा वाढवायचा, पर्यावरणाचे रक्षण कसे करायचे, वृक्षलावगड शास्त्रोक्त पद्धतीने कशी करायची, याचे ज्ञान व प्रशिक्षण या संस्थेमार्फत दिले जाते. याशिवाय पशुसंवर्धन, कुक्‍कुटपालन, मधुमक्षिकापालन व मधनिर्मिती, गांडूळखत व सेंद्रिय खतनिर्मिती, सेंद्रिय शेती, औषधी शेती व भाजीपाल्याची लागवड या शेतीपूरक व्यवसायांबद्दल तरुणांना प्रशिक्षण दिले जाते. शेडनेट, फुलांची शेती, पॉलिहाउस याविषयीचे प्रशिक्षण या संस्थेमार्फत दिले जाते. 

याशिवाय तरुणांना सुरक्षितपणे वाहन चालवणेही शिकवले जाते. संगणक, इंटरनेटचा वापर कसा करायचा याचेही प्रशिक्षण दिले जाते. आधुनिक काळाची गरज लक्षात घेऊन इंग्रजी संभाषणाची कला शिकवली जाते. ज्यांच्या घरी शेती आहे, अशा तरुणांना शेती व शेतीपूरक व्यवसायातून सक्षम होता येईल. ज्यांच्याकडे शेती नसेल, त्यांना तंत्रशिक्षणातून सक्षम होता येईल, असा प्रयत्न येथे होतो.

नोकरी मिळविण्यापेक्षा नोकरी देण्याची मानसिकता खेड्यातील तरुणांमध्ये रुजवता आली, तर शहराकडे जाणारा बेरोजगारांचा लोंढा थांबवता येईल आणि खेडी स्वयंपूर्ण व समृद्ध होतील, हे तन्वीर मिर्झाचे स्वप्न आहे. तन्वीर मिर्झासारखे सुशिक्षित तरुण पश्‍चिमेकडून पूर्वेकडे व शहराकडून खेड्याकडे जाऊ लागले, तर देश "सुजलाम सुफलाम' होईल यात शंका नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Article in Pahatpaval