आत्मश्रद्धेचे महत्त्व (पहाटपावलं)

आत्मश्रद्धेचे महत्त्व (पहाटपावलं)

"तूच आहेस तुझ्या जीवनाचा कर्ता-करविता आणि मार्गदीपही! त्यासाठी अन्य कोणाची, ईश्‍वरी शक्तीची गरज नाही,' असे अडीच हजार वर्षांपूर्वी भगवान गौतम बुद्धांनी "अत्त दीपो भव' या जीवनसूत्राच्या माध्यमातून सांगितले. या विश्‍वात पृथ्वी आहे, माणूस आहे, इतर प्राणी आहेत, त्यात ग्रह - तारे आणि आकाशगंगाही आहेत; पण त्यांचा कर्ता - नियंता किंवा तत्सम शक्ती आहे काय? असले प्रश्‍न माणसाने जरूर करावेत, तशी जिज्ञासा जरूर ठेवावी. त्याच्या विचारशक्तीचा तो आरंभ आणि आविष्कार आहे. माणसाला पडणारे प्रश्‍न नैसर्गिक असतात. ते पडू नयेत किंवा अमुकच पडावेत असे म्हणता येणार नाही; पण ज्या प्रश्‍नाचे उत्तर मिळत नाही, त्याचा नाद सोडावा आणि पुढच्या प्रश्‍नाकडे वळावे. म्हणूनच स्वामी विवेकानंद आस्तिक - नास्तिकांना समान असा विचार देताना दिसतात.

एक वेळ ईश्‍वर नाकारला तरी चालू शकते, त्यावर श्रद्धा ठेवा, ठेवू नका, बिघडत काहीच नाही; पण माणसाने स्वतःवर विश्‍वास जरूर ठेवावा. आत्मश्रद्धा हीच त्याच्या जीवनाचे कल्याण करीत असते. म्हणूनच ते शिकागोचे व्यासपीठ गाजवून आणि अमेरिकेचा दौरा करून भारतात आल्यावर येथील तरुणांना "तू अमृताचा पुत्र आहेस, सिंह आहेस' असे उच्चरवाने सांगू लागले. बुद्धांनाही हेच सांगायचे होते. त्यांनी माणसाचे लक्ष ईश्‍वराकडून स्वतःकडे वळविले, त्याच्यातल्या शक्तीला आवाहन केले. माणसाचे परमकल्याण त्याच्या स्वतःतच दडले आहे, त्यासाठी बाहेर हिंडण्याची गरज नाही. बुद्धांनी नित्य आत्मा नाकारला; पण स्वतःला घडविणारी- मार्गदीप ठरणारी आत्मजाणीव मात्र नाकारली नव्हती. 

ईश्‍वर असेल- नसेल त्याच्याशी आपला संबंध नाही; पण आपण ईश्‍वराची कल्पना ज्याप्रमाणे करतो, त्याप्रमाणे तो सर्व सद्‌गुणांचे निधान आहे. या सद्‌गुणांचा ध्यास म्हणजे आपणच मानलेल्या गुणांचा ध्यास, हे आपल्या जीवनाचे ध्येय राहिले, तर आपण ईश्‍वराची जागा घेऊ शकतो. ईश्‍वराची प्राप्ती आणि ईश्‍वर बनणे यांत अंतर आहे. इट इज ए प्रोसेस ऑफ बिकमिंग, नॉट अचिव्हिंग. ईश्‍वराची प्राप्ती ही माणसाची दुर्बलता आणि पराधीनता दर्शविते. याउलट ईश्‍वर बनण्याची क्षमता ही माणसाची सबलता आणि स्वयंभूता दाखविते.

ईश्‍वराची प्राप्ती ही स्वतःजवळ नसलेल्या गोष्टींची प्राप्ती असते आणि गंमत अशी, की जे स्वतःजवळ नसते, ते प्राप्त कसे होणार? आडात नसेल, तर पोहऱ्यात येणार कोठून? "मी हे करू शकतो, हे होऊ शकतो, बनू शकतो,' यामागे बुद्धविचार आहे. विवेकानंदांची आत्मश्रद्धा याचेच प्रतीक आहे. "मी माणूस बनू शकतो, संत बनू शकतो, त्यापुढे जाऊन बुद्ध होऊ शकतो,' हा विश्‍वास, ही श्रद्धा याचे नाव आत्मश्रद्धा. गीतेत म्हटले आहे, आपल्या मनात सततचा ज्याविषयीचा ध्यास असतो, तसे आपण बनतो. आजचे मानसशास्त्र हेच सांगते. म्हणूनच बुद्धविचारांना समस्त मानवी जीवनाच्या दृष्टीने "अत्त दीपो भव'चे महत्त्व येते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com