माणसाचं लक्षण (पहाटपावलं)

डॉ. नवनाथ रासकर
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

खरोखर, "माणूस नावाचा प्राणी' हा माणूस असतो काय? हा प्रश्‍न केल्यावर आपण विचारात पडतो आणि लक्षात येतं, की माणूस असणं अन्‌ माणूस नावाचा प्राणी असणं यात फरक आहे. तो प्राणी असतो तेव्हा सहजप्रवृत्तीच्या अधीन असतो. भूक लागली खावं, झोप आली झोपावं, किंबहुना शरीराशी निगडित अन्य प्रवृत्ती तिच्याच परिघात येतात. हे प्राणित्वाचे लक्षण आहे. याहून माणूस वेगळा आहे. माणूस असतो तेव्हा तो अशा प्रवृत्तींचे नियमन करीत असतो. भूक लागली तरी तो उपाशी राहील. झोप आली तरी तो जागाच राहील.

खरोखर, "माणूस नावाचा प्राणी' हा माणूस असतो काय? हा प्रश्‍न केल्यावर आपण विचारात पडतो आणि लक्षात येतं, की माणूस असणं अन्‌ माणूस नावाचा प्राणी असणं यात फरक आहे. तो प्राणी असतो तेव्हा सहजप्रवृत्तीच्या अधीन असतो. भूक लागली खावं, झोप आली झोपावं, किंबहुना शरीराशी निगडित अन्य प्रवृत्ती तिच्याच परिघात येतात. हे प्राणित्वाचे लक्षण आहे. याहून माणूस वेगळा आहे. माणूस असतो तेव्हा तो अशा प्रवृत्तींचे नियमन करीत असतो. भूक लागली तरी तो उपाशी राहील. झोप आली तरी तो जागाच राहील.

अगदी असेच इतरही प्रवृत्तींच्या बाबतीत तो वागू शकतो आणि वागतोही. यातच त्याचं माणूसपण दडलं आहे. आधी तो "माणूस नावाचा प्राणी' असतो, नंतर "माणूस' बनतो. आई-वडिलांचे संस्कार, समाज, संस्कृती, मूल्ये आणि शिक्षण यांच्या गोळाबेरजेतून त्याचं हे माणूसपण घडत असतं, म्हणजे त्याच्या अस्तित्वाला "अर्थ' प्राप्त होत असतो. अर्थ म्हणजे मूल्य. त्यामुळे अर्थयुक्त जीवन हेच त्याचं माणूसपण. म्हणूनच माणूस आणि त्यानं प्राणी असणं यात अंतर आहे. ते घटावं किंबहुना मिटावं यासाठीच माणसाची यातायात (गेली हजारो वर्षे) चालू आहे. ऐतरेय नावाच्या "आरण्यका'मध्ये माणसाचं लक्षण सांगताना ऋषी म्हणतो, की वनस्पतींमध्ये रस, तर प्राण्यांमध्ये जाणीव असते. पण माणसामध्ये विज्ञान म्हणजे बुद्धी कार्य करीत असते.

एकंदर त्याचे सर्व व्यवहार बुद्धीनं घडतात. आद्य शंकराचार्य "व्युत्पन्नचित्त' असं माणसाचे लक्षण सांगताना दिसतात. याचा अर्थ विवेक करणारा, बुद्धीनं वागणारा असा होतो. ऍरिस्टॉटल या ग्रीक विचारवंतानेही विवेकशील-बुद्धिशील या अर्थानेच माणसाकडं पाहिलं आहे. बुद्धीच्या साह्यानं स्वतःला घडवत प्राणित्वाकडून मनुष्यत्वाकडे तो जात असतो. तसं त्यानं जाणं हे चांगलंच आहे. हे त्याच्या निकोप वाटचालीचं लक्षण आहे. पण इतिहासाची साक्ष वेगळीच आहे. त्याचा प्रवास खडतर आहे. तो ठरवितो एक अन्‌ घडतं दुसरंच, म्हणून तर काही अंशानं "पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा' असं गदिमा म्हणतात त्याला काही अर्थ आहे. 

सांसारिक जीवनात गुरफटलेला तुलसी नंतर संत तुलसीदास होतो आणि "रामचरितमानस' हा अजोड ग्रंथ आकाराला येतो. या उलटही घडतं. चांगली माणसं आयुष्याच्या एका विशिष्ट वळणावर आपली वाट हरवून बसतात. चुकीच्या दिशेनं भरकटत जातात आणि संपतात. असं का घडावं? हा प्रश्‍न माणसाला पावलोपावली सतावत असतो. म्हणूनच मानवी जीवन आणि इतिहास संघर्षानं भरलेला आहे असं म्हटलं जातं. माणसाचा हा संघर्ष जसा त्याच्या स्वतःशी असतो, तसाच तो इतरांशीही असतो. अशा द्विस्तरावर तो जगत आणि वावरत असतो. तो स्वतःशी संघर्ष करीत असतो, तेव्हा तो माणूसपणाशी असतो. अगदी स्वतःशी संघर्ष करता करता इतरांशीही संघर्ष करतो, तेव्हाही तो माणूसपणाशीच असतो. संतांचा संघर्ष या पठडीतला असतो. मात्र केवळ इतरांशीच संघर्ष करीत राहतो, तो माणूसपणाला मुकत असतो. त्यापासून दूर जात असतो. देव-धर्म-संस्कृती, जात, सत्ता, देश, या नावानं होणारा संघर्ष हा माणूसपणाशी विपरीत असतो. स्वतःशी झगडत इतरांशी झगडण्यातून स्वतःमधलं माणूसपण सिद्ध करणं आणि इतरांतला माणूस जागवणं असतं.

महात्मा गांधींची जीवनरीत याच धाटणीची होती. त्यांना सत्याग्रहाच्या मार्गानं हृदयपरिवर्तन अपेक्षित होतं. त्यांनी ते करून दाखवलं, म्हणूनच खंडप्राय भारताचं नेतृत्व त्यांच्याकडे आलं आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं. माणसानं माणसाशी लढण्यासाठी माणुसकीचं हत्यार वापरावं. ते मानवी समाजाच्या हिताचं आणि खऱ्या प्रगतीचं लक्षण आहे, हा संदेश महात्मा गांधींच्या लढ्यातून मिळतोच, शिवाय खऱ्या माणसाचं लक्षणही मिळतं. 

Web Title: Pune Edition Article on PahatPawal