राजकारण विकासाचे की विद्वेषाचे? 

अनंत बागाईतकर
सोमवार, 10 डिसेंबर 2018

निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय प्रचाराचा स्तर कमालीचा खालावल्याचे दिसले. भावनिक मुद्दे पुढे करून समाजात तेढ माजविण्याचे प्रयत्न तर त्याहूनही चिंताजनक आहेत. विकासाचे प्रागतिक राजकारण करण्याऐवजी पुराणमतवादाची कास धरली जात आहे. 

एका बाजूला भारताचा विकास व प्रगतीचे नगारे वाजविले जात आहेत. दुसरीकडे धार्मिक ध्रुवीकरण आणि पुराणमतवादाचा उन्मादी प्रसार! यावरुन अनुमान हेच निघू शकते, की वर्तमान राजवटीचे विकास व प्रगतीचे दावे वस्तुनिष्ठ नसावेत आणि त्यामुळेच मतांच्या जोगव्यासाठी हिंदुत्व, रामनाम, अल्पसंख्याकांचा द्वेष यांचा आधार घ्यावा लागत आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक प्रचारात "अवतारी नेतृत्वा'ने तर प्रगती व विकासापेक्षा विरोधी पक्षांची हेटाळणी करण्यावरच भर दिलेला आढळतो. हे सगळे घडत असतानाच उत्तर प्रदेशातील बुलंदशहरजवळ झालेल्या हिंसाचारामागे धार्मिक तेढ निर्माण करून सांप्रदायिक दंगे घडवून आणण्याचे कारस्थान होते, असे संकेत मिळाले आहेत. हा प्रकार फारच गंभीर आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि त्यातून सत्य बाहेर येईल, अशी अपेक्षा आहे. पण आत्तापर्यंत उपलब्ध झालेला तपशीलही हे गांभीर्य मनावर ठसवणारा आहे. 

उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहरजवळच्या स्याना पोलिस ठाण्याचे प्रमुख निरीक्षक सुबोधसिंग यांची हिंसक जमावाकडून हत्या झाल्याचे वृत्त सर्वांनीच वाचले व पाहिले असेल. त्यामागची ही कहाणी आहे! महाव नावाचे एक लहानसे गाव आहे. सोमवारी (3 डिसेंबर) सकाळी सात वाजता त्या गावात राहणाऱ्या राजकुमार चौधरीला एका अज्ञात नंबरवरून फोन येतो आणि सांगितले जाते, की त्याच्या शेतात पंचवीस गायींची कत्तल करण्यात आली आहे. त्याची पाचावर धारण बसते. अक्षरशः धावत तो घराशेजारच्याच त्याच्या जमिनीच्या तुकड्याकडे धाव घेतो. पाहतो तो काय, मेलेल्या गायींची एक- दोन मुंडकी झाडावर लटकलेली आहेत आणि हाडे, सापळेही पडलेले आहेत. भीतीने अर्धमेल्या अवस्थेतच तो पटापट ते सर्व जमिनीत पुरण्याची तयारी करू लागतो. तेवढ्यात एक जमाव तेथे येतो, तो जमाव त्याला या अवशेषांची विल्हेवाट लावण्यास मनाई करतो. उलट ते सर्व अवशेष एका ट्रॅक्‍टर ट्रॉलीत घालून हा जमाव त्याची मिरवणूक काढतो. राजकुमारला धोक्‍याची जाणीव होते. तो पत्नीला सांगतो, की हे सर्व पूर्वनियोजित असावे, कारण शेतात गाय मारल्याच्या काहीच खुणा नाहीत. ना मांस आहे ना रक्त ! त्याला भीती अशी घेरते, की तो पलायनाचा मार्ग स्वीकारतो. हा जमाव असतो बजरंग दल, विश्‍व हिंदू परिषद आणि हिंदू वाहिनीच्या कार्यकर्त्यांचा! बजरंग दल ही रा. स्व. संघ परिवारातीलच लढवय्यी संघटना आहे. हिंदू वाहिनीचे जनक सध्या उत्तर प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री आहेत. 

ही माहिती कळताच निरीक्षक सुबोधसिंग काही पोलिसांसह गावात गेले व त्यांनी गावकऱ्यांची समजूत घालून त्यांना शांत केले. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले व ते त्यांच्या पोलिसठाण्याकडे परतले. दहा वाजण्याच्या सुमारास काही मोटारींमधून सुमारे पन्नास- साठ जणांचा जमाव पुन्हा पोलिस ठाण्याकडे जाऊन कारवाईची मागणी करू लागला. या जमावाचे नेतृत्व सध्या फरारी असलेला योगेश राज नावाचा बजरंग दलाचा स्थानिक प्रमुख करीत होता. कारवाईची मागणी करता करता जमाव जवळपास पाचशेपर्यंत वाढत गेला आणि हिंसक होत गेला. त्याची परिणती ठाण्यावर हल्ला करण्यात झाली. या हिंसक जमावाला शांत करण्यासाठी धाडसाने पुढे गेलेल्या पोलिस निरीक्षक सुबोधसिंग यांना हिंसक जमावाच्या हल्ल्यात प्राण गमवावे लागले. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आलेली असली तरी सुबोधसिंग यांच्या मृत्यूची नसून गायींची कत्तल कशी झाली, त्यामागे कुणाचा हात आहे याला प्राधान्य दिले जात असल्याचे पोलिस अधिकारी सांगतात. हे तर्कशास्त्र सुबुद्ध, सुजाण, सुशिक्षित व सुसंस्कृत, सभ्य समाजाच्या डोक्‍यावरून जाणारे आहे. 

या प्रकाराचे "टायमिंग' फार सूचक व महत्त्वाचे आहे! 6 डिसेंबरला अयोध्येतील बाबरी मशीद उद्‌ध्वस्त करण्याच्या घटनेला 26 वर्षे पूर्ण होत होती. शनिवार ते सोमवार (1 ते 3 डिसेंबर) या काळात बुलंदशहरमध्ये मुस्लिम समाजाच्या वार्षिक "इज्तिमा'चे आयोजन होते. राज्यातून आणि देशभरातून काही लाख मुस्लिम येथे जमतात. या काळात येथील रस्तेदेखील बंद केले जातात. शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध असा हा कार्यक्रम असतो. सोमवारी या कार्यक्रमाचा शेवटचा दिवस होता आणि त्या वेळी कार्यक्रम आटोपून आपापल्या गावांकडे मुस्लिम भाविक परतणे सुरू झाले होते. हे निमित्त साधून त्यांच्याविरोधात हिंसा भडकावण्याच्या हेतूने हा प्रकार केला गेल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. हा हेतू तडीस न जाता उलट या प्रकारात एका पोलिस निरीक्षकाची हत्या झाली आणि प्रकरण दंगा माजवू पाहणाऱ्यांवरच उलटले. मोटारींमधून आलेली ही मंडळी गावाबाहेरची होती. ती लाठ्या-काठ्या व तलवारी अशी शस्त्रे घेऊन आलेली होती, असेही गावकरी सांगत आहेत. योगेश राज फरारी आहे. मखलाशी करून त्याने हा सगळा त्याला अडकविण्यासाठीचा कट असल्याची चित्रफीत जारी केली आहे. काही हिंदुत्ववादी संघटनांनी गावातील काही मुस्लिमांच्या विरोधात गायींच्या तथाकथित कत्तलीबाबत पोलिसात तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यातील एकजण अल्पवयीन म्हणजे दहा-अकरा वर्षांचा मुलगा आहे, तर उरलेल्यांपैकी पाचजण अज्ञात आहेत. गोहत्येच्या संदर्भात एकच नाव गावातल्या एका मुस्लिमाशी जुळणारे निघाले व त्याला अटक करण्यात आली आहे; परंतु तथाकथित गायींच्या कत्तलीच्या वेळी तो गावातच नसल्याचे निष्पन्न होत आहे. 

हे गाव आणि आसपासच्या परिसरात हिंदू- मुस्लिम मिश्र वस्ती आहे. काही कुरबुरी चालत असल्या तरी फार मोठे सांप्रदायिक दंगे या भागात गेल्या अनेक वर्षांत झालेले नाहीत. 1977 मध्ये गावातील एका मशिदीच्या जागेवरून दंगा झाला होता. तो वाद अद्याप कोर्टात आहे. परंतु त्यानंतर एकही दंगा येथे झाला नसल्याचे गावकरी सांगतात. हा प्रकार होण्याच्या आदल्याच दिवशी शेजारच्याच गावात घडलेला प्रसंग बोलका होता. "इज्तिमा'साठी जाणाऱ्या मुस्लिमांना प्रचंड गर्दीमुळे नमाज पढण्यासाठी मशिदीपर्यंत पोहोचणे अशक्‍य झाले. अखेर गावातल्या शिवमंदिराच्या पुजाऱ्यांनी मंदिराचे आवार त्यांना नमाजासाठी उपलब्ध करून दिले. महावपासून केवळ 35 किलोमीटरवरील जैनूर गावातली ही घटना! या गावातल्या ग्रामस्थ व पुजाऱ्यांनी बुलंदशहरातील हिंसाचाराचा कडक शब्दांत निषेध केला आहे. 

उत्तर प्रदेशात सांप्रदायिक हिंसा भडकविण्यासाठी संधी शोधली जात आहे, हा संशय या घटनाक्रमावरून बळावतो. अयोध्येत राममंदिर उभारणीच्या मागणीसाठी दोन लाखांचा जमाव जमविण्याची तयारी विश्‍व हिंदू परिषदेने केलेली होती. प्रत्यक्षात चाळीस ते पन्नास हजार लोक जमले होते व हा "फ्लॉप शो' ठरला होता. सांप्रदायिक मुद्द्यांवर सर्वसामान्यांचा पाठिंबा मिळेनासा झालेला आहे, त्यामुळेच मनातून अस्वस्थ झालेला हा परिवार आता इतर चलाख्या करू पहात आहे. सत्ताधारी राजवटीचे पाठबळ व आशीर्वाद याखेरीज हे धाडस केले जात नाही. चांगल्या अर्थकारणासाठी चांगले राजकारण व समाजकारण लागते ते करण्याची कुवत नसेल तर असे प्रकार घडतात. त्याचबरोबर सामाजिक स्थिरता व शांतता असेल तरच ती स्थिती गुंतवणुकीला पोषक असते. ताज्या आकडेवारीतही गुंतवणुकीची टक्केवारी खालावलेली आढळते. त्याची कारणमीमांसा करण्याऐवजी समाजात संघर्ष व अस्थिरता निर्माण केली जात आहे, त्यामुळे विकास व प्रगतीचे दावे वल्गना व बुडबुडे ठरत आहेत. 

Web Title: Pune Edition Article on Politics