अचूक वेळेची वाट पाहा (दिल्ली वार्तापत्र)

अचूक वेळेची वाट पाहा (दिल्ली वार्तापत्र)

पुलवामाजवळ केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे अनेक तपशील हळूहळू प्रकाशात येत आहेत. हे तपशील अनेक प्रश्‍न उपस्थित करणारे आहेत. जम्मू-काश्‍मीरच्या राज्यपालांनी स्वतःच "इंटेलिजन्स फेल्युअर' म्हणजेच हल्ल्याची पूर्वकल्पना येऊ शकेल, अशी गोपनीय माहिती मिळविण्यात यंत्रणांचे अपयश जाहीरपणे मान्य करून या विषयाला तोंड फोडले.

जम्मू-काश्‍मीर पोलिसांच्या गुप्तचर विभागाने तीन ते चार दिवस आधी सुरक्षा दलांवर हल्ला अपेक्षित असल्याचे सूचित केले होते आणि ती माहिती प्रसिद्धही झाली होती. अशी माहिती मिळाल्यानंतर त्याची काटेकोर खातरजमा अत्यावश्‍यक ठरते. हे यातून प्रकर्षाने समोर आले आहे. 

आणखीही काही माहिती बाहेर येऊ लागली आहे. या घटनेशी थेट संबंधित असलेल्यांकडून मिळत असलेल्या माहितीचीही पडताळणी आवश्‍यक आहे. या हल्ल्याबाबतच्या प्राथमिक माहितीच्या आधारे काही निष्कर्ष काढण्यात आले आहेत. जम्मूहून बनिहाल मार्गे काझींगुंडहून पुढे गेल्यानंतर काकपुरा, लठपुरा अशी गावे आहेत. अवंतीपूर हे अगदी श्रीनगरपासून वीस-पंचवीस किलोमीटर अंतरावरचे ठिकाण आहे. या परिसरात हा हल्ला झाला. हल्ल्याच्या स्थळापाशी एका बाजूला डोंगरी भाग आहे व त्या परिसरातच सुमारे दहा-बारा लहान खेडी वसलेली आहेत. तेथून मुख्य मार्गावर येण्यासाठी लहानलहान रस्ते आहेत. या भागात दगडांच्या खाणी आहेत आणि तेथून दगड काढणे, त्याची खडी तयार करण्याचा व्यवसायही आहे. यासाठी सुरुंगांचा वापर केला जातो. याच नावाखाली दहशतवाद्यांनी स्फोटके जमा केली असा सकृतदर्शनी संशय आहे. ही सामग्री मागील काही काळापासून जमा केली जात होती.

हल्ल्याची संहारकता वाढण्यासाठी आरडीएक्‍स या स्फोटकाचाही त्यात समावेश होता, असे सांगितले जाते. आरडीएक्‍सचे सांगितले जाणारे प्रमाण काहीसे अतिशयोक्त आहे परंतु, विध्वंसाची व्याप्ती लक्षात घेता काही प्रमाणात त्याचा समावेश असल्याचे सिद्ध होते. आरडीएक्‍स, खाणींमध्ये वापरले जाणारे स्फोटक या मिश्रणातून दहशतवाद्यांनी ही संहारक क्षमता निर्माण केली. 

या घटनेत सापडलेल्या जवानांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीआरपीएफचा ताफा मुख्य मार्गावरून जात असताना वर उल्लेखित गावांकडून येणाऱ्या रस्त्यावरून दहशतवाद्याची गाडी पुढे आली. हल्ला करण्याच्या घाईत त्याने समोर आलेल्या बसला धडक मारली. या बसच्या मागे काही अंतरांवर तीन बसमध्ये जवान बसलेले होते. त्यामुळे हल्लेखोराने मागे काही अंतरावर असलेल्या तीनपैकी एखाद्या बसला धडक मारली असती तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती. या हल्ल्यानंतर सीआरपीएफच्या जवानांमध्ये संताप व उद्विग्नता निर्माण होणे स्वाभाविक होते. हे जवान आपापल्या तळावर पोचूनही बोलण्याच्याच नव्हे, तर काही खाण्याच्यादेखील मनःस्थितीत नव्हते. 

पूर्वी निमलष्करी दले किंवा सेनादलांचे ताफे जात असताना सर्वसाधारण वाहनांची वाहतूक बंद केली जात असे. अजूनही काही दुर्गम भागात हा प्रकार केला जातो. गेल्या दोन-तीन वर्षांपासून हा प्रकार बंद करण्यात आला. त्यामुळे हा ताफा जात असताना सर्वसाधारण वाहतूकही सुरूच होती. या परिसरातील गावांमधील काही लोकांच्या टपऱ्यादेखील आहेत. हल्ल्याच्या दिवशी या सर्व गावांमधील व्यवहार व जनजीवन बंद होते. टपऱ्यादेखील बंद होत्या. हा प्रकार गुप्तचर किंवा टेहळणी पथकांच्या लक्षात का आला नाही, असा प्रश्‍न उपस्थित आहे. ताफा जाण्यापूर्वी संबंधित रस्त्याची छाननी केली जाते आणि तशी ती चिलखती किंवा बंकर सारख्या वाहनातून केली गेली, परंतु ही अनपेक्षित बाब त्यांच्याही लक्षात आली नाही. 

हल्ला जैश ए महंम्मदच्या प्रभावाखालील स्थानिक तरुणाकडून झाला, असे सरकार सांगत आहे. साहजिकच सुरक्षा दलांचा राग आता स्थानिक लोकांवर निघणे अपेक्षित आहे. त्यातून काश्‍मीरमधील वातावरण आणखी बिघडेल. जैश आणि त्याचा म्होरक्‍या अजहर मसूद (याची वाजपेयी सरकारने काबूलला नेऊन मुक्तता केली होती) पाकिस्तानात आहे. ही सर्व माहिती असूनही आता कारवाई काय करणार याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. "सर्जिकल स्ट्राईक' करणार की अचूक हवाई हल्ले की मर्यादित युद्ध वगैरे पर्यायांबाबत नेहमीप्रमाणे माध्यमातून चर्चा सुरू आहे. यानिमित्ताने विविध सेनाधिकारी किंवा निमलष्करी दलांच्या अधिकाऱ्यांशी बोलताना स्पष्ट झालेली बाब म्हणजे, आता या घटनेनंतर तत्काळ कारवाईबाबत प्रश्‍नचिन्ह आहे. याचे स्पष्ट कारण उरीच्या "सर्जिकल स्ट्राईक'बाबत वर्तमान राजवटीने एवढा गाजावाजा केला की अशा मोहिमांमधील धक्कातंत्राचा घटक राज्यकर्त्यांनी अतिप्रसिद्धीमुळे नष्ट करून टाकला. या हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्य अतिदक्ष झाले आहे.

"प्रिसिजन एअर स्ट्राईक' म्हणजे "अचूक लक्ष्यवेधी हवाई हल्ले' या पर्यायाचीही चर्चा होत आहे. अचूक हवाई हल्ल्यांच्या माध्यमातून पाकव्याप्त काश्‍मीरमधील दहशतवाद्यांचे तळ नष्ट करण्याबाबतही सुरक्षा यंत्रणांमध्ये विचारविनिमय सुरू असल्याचे सांगण्यात येते. परंतु, केवळ लोकांचा अनुनय करण्यासाठी व प्रत्युत्तर द्यायचे म्हणून आततायी हालचाली करणे सरकारला परवडण्यासारखे नसते. अचूक वेळेची संयमाने वाट पहात राहणे हे शहाणपणाचे तत्त्व पाळावे लागते. आता प्रतिस्पर्धी पूर्णपणे सावध व सुसज्ज अवस्थेत असताना हल्ला करण्याचे पाऊल उचलणे आत्मघातकी ठरू शकते. शत्रुला गाफील ठेवूनच हल्ले करणे पथ्याचे असते. 

नेहमीप्रमाणे युद्धशास्त्राबाबत कवडीचेही ज्ञान नसलेली मंडळी "मर्यादित युद्ध' संकल्पनेवर चर्चा करीत आहेत. मुळात अशी संकल्पना अस्तित्वात नाही. युद्ध हे पूर्ण स्वरुपाचे असते आणि एकदा ते सुरू झाल्यानंतर त्याची व्याप्ती ठरविणे कुणाच्याही हाती नसते. इतिहास हेच सांगतो. पाकिस्तानला धडा शिकवा आणि संपवा, नेस्तनाबूत करा अशा संतप्त भावना आणि चर्चा सुरू असल्या तरी ही वेळ संयमाची आहे.

वर्तमान राजवटीला कदाचित "सर्जिकल स्ट्राईक'च्या अवाजवी गाजावाज्याचे तोटे लक्षात आले असावेत. तूर्तास सरकारने पाकिस्तानच्या विरोधात राजनैतिक व व्यापारी आघाडीवर मोहीम सुरू केली आहे. त्यातून होणाऱ्या वातावरणनिर्मितीचा फायदा घेऊन काही काळाने प्रत्युत्तराची कारवाई केली जाऊ शकते. या घडीला संयमच गरजेचा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com