विश्‍वात्मकतेच्या मूल्याचा जागर व्हावा

विश्‍वात्मकतेच्या मूल्याचा जागर व्हावा

हे शतक विसंगतींनी भरलेलं शतक म्हणता येईल. एका बाजूने यंत्रांच्या मदतीने माणूस अखंड कृत्रिम जग उभारण्यात गुंतला आहे; पण दुसऱ्या बाजूने त्याला जिवंत, अकृत्रिम, अनावृत्त अशा जीवनाची आस आहे. एकीकडे तो नैसर्गिक जगण्यापासून दूर गेला आहे; निसर्गापासून तुटून निघाला आहे. कृत्रिम, आभासी जगातल्या जादुई नगरीत शिरला आहे आणि दुसरीकडे आंतरिक ओसाडीत ओलावा निर्माण करणारे खरेखुरे मानवी संबंध त्याला हवे आहेत. 

खरं म्हणजे द्वंद्वांच्या अतीत जाणाऱ्या अनेक वाटा मोकळ्या करणाऱ्या तत्त्वप्रणाली आपल्याकडे निर्माण झाल्या; पण आधुनिक जगाने जन्माला घातलेली जी द्वंद्वं आहेत - उदाहरणार्थ, विज्ञान आणि अध्यात्म, राष्ट्र, धर्म आणि मानवी मूल्यं, जातीयता आणि सर्वसमानता - यांच्या पलीकडे 
जाण्याचे सर्वमान्य आणि सर्वजण सुलभ असे रस्ते माणसाला अजून सापडलेले नाहीत. अशा वेळी आत्यंतिक स्वार्थपरायण आणि स्पर्धात्म झालेला व्यक्तिवाद हे साहित्याचा परीघ आक्रसत जाण्याचं एक मुख्य कारण दिसतं. 19 व्या शतकात जन्माला आलेल्या व्यक्तिवादाने अनेक कल्याणकारी गोष्टी जगभर घडवल्या; पण आज व्यक्तिवादाचा अतिरेक माणसाचं मानसिक-वैचारिक जग स्वार्थकेंद्रित आणि आत्मकेंद्रित - पर्यायानं लहान करण्यात परिणत झाला आहे.

मराठीत साठोत्तरी साहित्यानं केलेल्या विद्रोहात इतर अनेक गोष्टींबरोबरच या आक्रसणाऱ्या परिघाला पहिला जबरदस्त नकार दिला आणि नव्वदोत्तर साहित्यिकांच्या तरुण पिढीने तर व्यक्तिवादाने आखलेल्या जवळजवळ सगळ्या मर्यादा पार करण्याची धडपड केली. साहित्य व्यवहारात मात्र अजूनही या स्पर्धात्मक आणि स्वार्थकेंद्री व्यक्तिवादाचा प्रभाव टिकून आहे. 
शिक्षणक्षेत्राचा विचारही या संदर्भापासून अलग राहू शकत नाही. ज्ञानाच्या उपासनापरंपरांची शुद्धता नि त्यांचं वैविध्य टिकवणं 
हे पर्यावरणातलं जैववैविध्य टिकवण्याइतकंच महत्त्वाचं आहे, याची जाणीव शिक्षणक्षेत्रातून हद्दपार झाली आहे.

जागतिकीकरणाच्या नव्या लाटेत व्यासंग व संशोधन हे शब्दही निरुपयोगी वाटू लागले आहेत. संशोधनासाठी व्यावहारिक सोईसुविधा आणि अनेक पातळ्यांवरचा अवकाश निर्माण झाला; पण विद्यापीठीय संशोधनाचा दर्जा असमाधानकारकच राहिला आहे. मराठी भाषेची, तिच्या प्रतिष्ठेची, तिच्यावरच्या इंग्रजीच्या आक्रमणाची चिंता आपण सगळे वारंवार व्यक्त करतो आहोत. मातृभाषेविषयीची आस्था प्रत्येक माणसाला वाटली 
पाहिजे आणि तो केवळ मराठी शाळांमधल्या शिक्षणापुरता चिंतेचा विषय न राहता प्रत्येक माणसाचा स्वत:च्या प्रेमाचा विषय झाला पाहिजे.

रोजच्या व्यवहारात शक्‍य तितका आपल्या भाषेतून संवाद-संपर्क करणं आणि ज्ञानभाषा म्हणूनही मराठीचा वापर प्रयत्नपूर्वक करणं ही आपली गरज बनली पाहिजे. गेलं अर्धशतक हे दुसरं प्रबोधनपर्व आहे. हे जागतिक पातळीवरचं आहे. त्याची सुरवात विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात झाली. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर 19व्या शतकात जे प्रबोधन झालं, त्या वेळी इंग्रजी भाषा-विद्या-कला-संस्कृतीच्या परिचयातून झालं. तेव्हा सत्ताधारी इंग्रज होते आणि ते जसे प्रबोधनाला कारण झाले होते, तसे प्रबोधनाच्या एतद्देशीय स्वरूपाचेही कारण झाले होते.

प्रबोधनाच्या अनेक माध्यमांवर त्यांची पकड होती आणि त्या माध्यमांच्या वापरामागे असलेला दृष्टिकोनही त्यांनी प्रभावित केलेला होता. त्यामुळे शिक्षणासकट इथल्या बहुतेक सामाजिक संस्था आणि प्रबोधनाच्या चळवळी एतद्देशीय पद्धतीने विकसित झाल्या नाहीत. फलदायाही ठरल्या नाहीत. ते प्रबोधन मुख्यतः सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रातलं प्रबोधन होतं. विसाव्या शतकाच्या अखेरपासून विज्ञान-तंत्रज्ञानाच्या विलक्षण वेगवान प्रगतीनं जे जागतिकीकरणाचं वादळ आणलं आहे, ते मात्र सर्व जीवनक्षेत्रांची उलथापालथ करणारं आहे. प्रत्येक क्षेत्रातल्या त्यांच्या सुट्या सुट्या परिणामांविषयी आपण बोलत आहोत; पण या परिवर्तनाचं समग्र चित्र डोळ्यांसमोर ठेवण्ण्याची आवश्‍यकता आहे. 

गतिशीलता, परिवर्तन हा जीवनाचा स्थायीभावच आहे. जीवन अविरत बदलत राहतं. मात्र आज जे बदल होत आहेत ते विराट आहेत, अनाकलनीय आहेत आणि अकल्पनीयही आहेत. मूलगामी स्वरूपाच्या या बदलांमध्ये जीवनाचा पाया उखडण्याची शक्ती आहे. सर्व जुन्या व्यवस्था कोलमडून पडताहेत. अर्थव्यवस्था कोसळत आहेत, समाजव्यवस्था आणि कुटुंबव्यवस्था कोलमडत आहेत. लहानमोठ्या भाषा आणि प्रादेशिक संस्कृती हेलपाटून चुरमडत चालल्या आहेत. सरकार आणि समाजाचे संबंध बदलत आहेत आणि सत्तेचं स्वरूपही बदलतं आहे. 

साहित्यातही हे अनेक अर्थांनी कोसळण्याचं पर्व आहे. जुने रचनाबंध कोसळताहेत. अभिव्यक्तीचे जुने घाट मोडून पडताहेत. भाषिक अभिव्यक्ती कमालीची परिवर्तनशील झालेली आहे. मुख्यत: लेखक-वाचकांची वाड्‌मयाकडे पाहण्याची दृष्टीच बदललेली आहे. हे वाङमयातलं प्रतिमाभंगाचं युग आहे, असं म्हटलं तरी चालेल. साहित्यातले नायक अथवा नायिका एके काळी समाजाने जीवनादर्श म्हणून स्वीकारले होते. आता त्या आदर्श प्रतिमा तर भंगल्या आहेतच; पण साहित्य व साहित्यकार या दोन्हींच्या समाजमनातल्या प्रतिष्ठित प्रतिमाही या युगाने मोडल्या आहेत.

तंत्रज्ञानामुळे अपरिहार्य ठरलेल्या जागतिकीकरणाला जोवर सांस्कृतिक अभिसरणाची जोड मिळत नाही, तोवर जग जवळ आल्याच्या पृष्ठस्पर्शी कल्पनेला दूर सारून, समाजविभाजनाची प्रक्रिया आपल्याला खऱ्या अर्थाने थांबवता येणार नाही. मनोव्यापाराचं महत्त्व असलेल्या कित्येक सामाजिक, सांस्कृतिक व्यवस्था नव्या वादळात कोसळल्या आहेत. अशा वेळी विश्‍वात्मकता हेच एक सर्वसमावेशक सत्य मूल्यभावाने स्वीकारणं आणि विश्‍वात्मकतेचा प्रत्यय देणाऱ्या सर्व मानुष व्यवहार-व्यापारांना अग्रभागी आणणं हाच आज विवेकी विचारवंतांचा कृतिकार्यक्रम असू शकतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com