लयलूट आणि चुटपुट

Pune Edition Article on Sport
Pune Edition Article on Sport

जाकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने पदकाच्या शर्यतीत एक पाऊल पुढे टाकलं. 15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 30 ब्रॉंझ अशी 69 पदके मिळवून त्यांनी 2010 मध्ये ग्वांगझू येथे केलेल्या आपल्या आधीच्या (67 पदके) कामगिरीला मागे टाकले. त्याचबरोबर 1951 मध्ये भारतातच नवी दिल्ली येथे झालेल्या 15 सुवर्णपदकांच्या कामगिरीची बरोबरी साधली. पदक जिंकणारा प्रत्येक खेळाडू हा मैदानात घाम गाळून आपल्या स्वप्नपूर्तीपर्यंत पोचला होता. कुणी खेळाडू बेरोजगार होता, कुणी हलाखीच्या परिस्थितीतून पुढे आला होता. त्यामुळेच त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच.

खेळातील कामगिरीचा तपशील लक्षात घेतला तर या आधीच्या तुलनेत भारतीय खेळाडूंची कामगिरी चांगलीच उंचावलेली दिसते. ऍथलेटिक्‍स, नेमबाजी, कुस्ती, टेबल टेनिस, बॅडमिंटन या खेळांत आपले खेळाडू चमकले. भारताच्या एकूण यशातील त्यांचा वाटा महत्त्वाचा होता. त्यांचे हे श्रेय दुसरे कुणी हडपणार असतील, तर त्याला मात्र स्पष्ट विरोधच केला पाहिजे. जाकार्तातील 69 पदकांचे श्रेय हे फक्त आणि फक्त खेळाडूंना आहे. या खेळाडूंनी आपल्या कामगिरीने काही क्रीडा प्रकारात चीन, जपान या आशियातील दिग्गजांना मागे टाकले. टेबल टेनिससारख्या खेळांत मिळविलेले यश राष्ट्रकुल स्पर्धेप्रमाणेच कौतुकास्पद आहे. बॅडमिंटनमधील कामगिरीदेखील ऐतिहासिक ठरली; पण पी. व्ही. सिंधूचे विजेतेपदाच्या लढतीतील आणखी एक अपयश चटका लावून गेले.

सुशील कुमार, साक्षी मलिक कुस्तीत अपयशी ठरत असताना बजरंग पुनिया, विनेश फोगट यांनी कुस्तीचे भविष्य सुरक्षित हाती असल्याची खात्री दिली. अपेक्षा उंचावून गेलेली मनू भाकर अपयशी ठरली; पण राही सरनोबतने दोन वर्षांनंतर मिळविलेले यश नोंद घेण्याजोगे. त्याचबरोबर शार्दुल विहान, सौरभ चौधरी, लक्ष्य शेरॉन असे नवे नेमबाजही दिले. द्युती चंद, स्वप्ना बर्मन, जिन्सन जिन्सॉन, हिमा दास, नीरज चोप्रा या ऍथलिट्‌सनी ट्रॅकवर भारतही मागे नाही, हे दाखवून दिले. या कौतुक सोहळ्यातही वास्तवाचे भानही ठेवले पाहिजे. 

570 खेळाडू सर्वच्या सर्व 36 क्रीडा प्रकारांत सहभागी झाले आणि हाती 69 पदके आली. ही कामगिरी आतापर्यंतची सर्वोत्तम असली तरी, हे प्रमाण व्यस्त आहे. यातील काही पदके ही अनपेक्षित होती, काही पदके हमखास होती, ती मिळाली नाहीत. त्यामुळेच आजपर्यंतचे सर्वोत्तम यश यावर संतुष्ट न राहता एक पाऊल पुढे कसे पडेल, याचा विचार होण्याची गरज आहे. कबड्डीची हमखास म्हणून अपेक्षित धरलेली दोन सुवर्णपदके हुकली. फाजील आत्मविश्‍वास आपल्याला महागात पडला. आपल्याच देशातील एका प्रशिक्षिकेने बाहेर जाऊन इराणला विजेते बनवले. हॉकीमध्ये साखळी सामन्यातील गोल धडाका बाद फेरीत राखता आला नाही. पुरुष संघ उपांत्य फेरीतच गडबडला. त्यांना समाधान पाकिस्तानला हरवून ब्रॉंझपदक मिळविल्याचे. यात पाकिस्तान पदकाशिवाय राहिले यातच समाधान मानण्याची वेळ आली. महिला संघ अंतिम फेरीपर्यंत पोचून सुवर्णपदकापासून दूर राहिला. आता दोन्ही संघांना ऑलिंपिक प्रवेश कठीण झाला आहे. कॅनॉइंग, रोइंग, हॅंडबॉल, व्हॉलिबॉल, सायकलिंग, जिम्नॅस्टिक, जलतरण या खेळात आपण अनेक वर्षे दूर आहोत, हे पुन्हा समोर आले.

बॉक्‍सिंगमध्ये अमित पंघलने ऑलिंपिक विजेत्यास हरवून आशा पल्लवित केल्या. अनेक खेळ न्यायालयाच्या पायऱ्या चढून एशियाडच्या वारीला पोचले. यात सेलिंगमधील श्‍वेता आणि वर्षा यांचे यश वगळता सर्व खेळात आपण पहिल्या फेरीचा अडथळा दूर करू शकलो नाही. भविष्यात संघ पाठविताना याचा विचार होणे आवश्‍यक आहे. 
या स्पर्धेतून विहान, हिमा, लक्ष्य, सौरभ, अमित असे अनेक खेळाडू गवसले आहेत. या खेळाडूंवर आता पारितोषिकांची खैरात होईल, नोकरीची आश्‍वासने दिली जातील; पण या सगळ्यातून नेमके काय साधले जाते? त्यांना परावलंबी करण्याचा हा प्रकार आहे, हे कधीतरी लक्षात घेतले पाहिजे.

त्यांच्यावर पारितोषिकांची खैरात करण्यापेक्षा त्यांच्यातील गुणवत्ता कशी जपता येईल, याचा विचार प्रामुख्याने व्हायला हवा. त्यांना जरूर मदत करा; पण ती त्यांच्या खेळाच्या प्रगतीसाठी. मग ते प्रशिक्षण असेल वा उत्तम पायाभूत सुविधा. त्यातून कामगिरीत सातत्य राखण्याकडे खेळाडू लक्ष देतील. ऑलिंपिक दोन वर्षांनी होणार आहे, तिथेही उत्तम कामगिरी व्हावी, यासाठी आत्तापासून जोरदार प्रयत्न करायला हवेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com