ढिंग टांग! : आभार भोज : एक वृत्तांत!

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 23 मे 2019

"निवडणुकीतील दिग्विजयात ज्यांनी ज्यांनी म्हणोन साह्य केले, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आले असून, त्यास आवर्जून उपस्थित राहाणेचे करावे ही प्रार्थना', असे निमंत्रण आम्हाला (ही) कमळ पार्टीच्या वतीने पाठवण्यात आले.

"निवडणुकीतील दिग्विजयात ज्यांनी ज्यांनी म्हणोन साह्य केले, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आले असून, त्यास आवर्जून उपस्थित राहाणेचे करावे ही प्रार्थना', असे निमंत्रण आम्हाला (ही) कमळ पार्टीच्या वतीने पाठवण्यात आले. परंतु आम्ही नम्र टंगळमंगळ केली. "आमच्याऐवजी आमचे प्रतिनिधी श्रीमान सुभाषाजी देसाई येतील, त्यांस पथ्यकर, परंतु रुचकर भोजन उपलब्ध करोन देणे' असा उलटा निरोप आम्ही कमळाध्यक्ष श्रीमान मोटाभाई ह्यांना पाठवला.

नुकताच परदेश दौरा करून परतलो होतो. श्रमपरिहाराची म्हणूनही येक दगदग असत्येच. ती यथेच्छ झाली होती. शिवाय, जेट लॅग नावाची काही गोष्ट असते की नाही? साधासा वरणभात (लिंबू पिळून) ओरपावा आणि कडक झोप काढोन जेट लॅग घालवावा, ऐसा बेत करोन आम्ही बिछान्यावर लवंडणार, इतक्‍यात पुनश्‍च निरोप आला. ""नाही, सरकार, नाही!! आपणांविना हा स्नेहभोज पार पडणे नाही! आपणच यजमान आहा, ऐसे समजोन खुद्दांनी यावे. सहकुटुंब सहपरिवारे, इष्टमित्रांसमवेत यावे!! वाट पाहतो आहो...'' येवढ्यावर संपले नाही... कमळाध्यक्ष श्रीमान मोटाभाई हे गृहस्थ मोठ्या चिकाटीचे आहेत. त्यांनी लागोपाठ मोजून आठ फोन केले.

आमच्या चिरंजीवांना सोळा फोन केले आणि एकूण बत्तीस मेसेज पाठविले. अवघड जागचे दुखणे! कुणास सांगावयाचे? 
अखेर आभार भोज मोहिमेवर जाण्यासाठी आम्ही दोन सरदारे सोबत घेवोन प्रस्थान ठेवले. "मी यायलाच पाहिजे का? नाही, बुधवारी संकष्टी आहे म्हणून विचारतो आहे...'' असे सुभाषाजींनी चाचरत सांगून पाहिले. पण आम्ही त्यांस स्पष्ट नकार दिला व सोबत घेतलेच. 

"आहो, तेथ आमरस पुरीचा बेत आहे...चला, चला!'' आम्ही त्यांस आमिष दाखवले. आमरस पुरीचे नाव काढल्यावर कोण नाही म्हणेल? असो. 

...राजधानी दिल्लीतील अशोका हाटेलातील प्रवेशद्वार फुलांनी सजविलेले होते. आमच्या स्वागतासाठी सारीजणे रांगेने उभी होती. एक-दोघांनी आम्हाला आवर्जून मुजरा वगैरे केला. तेवढ्यात आमचे नागपुरी मित्र नितीनभाऊ गडकरीसाहेब भेटले. 

"कधी आले बावा?'' तोंडावर रुमालाने पुसत त्यांनी विचारले. गृहस्थ जेवणाच्या कक्षात ऑलरेडी राऊण्ड मारून आला आहे, हे कळत होते. 
""आभार भोजनाची ही आयडिया चांगली आहे. त्यानिमित्ताने आपल्या घटक पक्षांशी बोलणे होते...'' आम्ही उगीचच काही तरी बोलायचे म्हणून म्हणालो. 

"घटक पक्ष कुठले? चटक पक्ष म्हणा...हॉहॉहॉहॉ!!'' गडकरीसाहेबांनी विनोद केला. ह्यांच्या विनोदाला हसले नाही तर हा मनुष्य आपल्याला सडकेवर आणील, असे अनेकांना का वाटते कुणास ठाऊक! आमच्या मते गृहस्थ दिलखुलास आहे... 
""आमचे आभार मानल्याबद्दल तुमचे आभार!'' आम्हीही अधूनमधून विनोद करतो, तसा करून पाहिला. कुणीही हसले नाही!! 

"आपले कोण आभार मानून ऱ्हायलंय इथं? आपण मानून ऱ्हायलोय आभार!'' ते म्हणाले. 
""कुणाचे?'' आम्ही. 
""अर्थात नमोजीसाहेबांचे! ते नस्ते तं एवढा विजय मिळाला अस्ता का बावा?'' गडकरीसाहेबांनी वास्तवाची जाणीव करोन दिली. 

"तरी बरं, हा तं नुस्ता एक्‍झिट पोलचा विजय आहे...,'' त्यांनी पुस्ती जोडली. 
म्हणजे हे आभार भोजन एक्‍झिट पोलमधील दिग्विजयासाठी होते तर! आम्ही गोंधळात पडलो. तेवढ्यात सुभाषाजी, मिलिंदोजी, आणि राजपुत्र चि. विक्रमादित्य ह्यांनी आम्ही आता भोजन कक्षाकडे कूच करत असल्याची वर्दी दिली. 

...भोजनाच्या रांगेत उभे होतो, तेव्हा गडकरीसाहेबांनी आम्हाला पुन्हा एकवार गाठले. 
""जेऊन घ्या भरपेट! उद्या ऍक्‍चुअल निकाल लागले, तं सगळाच झांगडगुत्ता होणाराय बरं!'' ते सहज म्हणाले. आमच्या घशात घास अडकला.

 - ब्रिटिश नंदी                                                        


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Dhing Tang Article