गोंधळात गोंधळ! (अग्रलेख)

गोंधळात गोंधळ! (अग्रलेख)

महाराष्ट्र कॉंग्रेसमधील अस्वस्थ वर्तमान राज्यातील पहिल्या फेरीच्या मतदानाला जेमतेम आठवडा उरलेला असतानाही, संपुष्टात न येणे ही त्या पक्षातील सुंदोपसुंदी आणि कुरघोडीचे राजकारण यावर झगझगीत प्रकाश टाकणारीच बाब आहे. त्यामुळेच अखेर पक्षश्रेष्ठींना या गोंधळाची गंभीर दखल घेणे भाग पडले आणि शनिवारी मुंबईतील पक्षकार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांना थेट तंबी देण्यावाचून "हायकमांड'पुढे दुसरा पर्यायही उरला नाही. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसची काय अवस्था होऊ शकेल, हे या गोंधळामुळे स्पष्टच दिसत आहे. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या चार महिन्यांत विधानसभेची निवडणूक होणार आहे, याचेही भान ना कॉंग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांना आहे, ना कार्यकर्त्यांना. त्यामुळेच "आपापले मतदारसंघ शाबूत ठेवायचे असतील, तर एकदिलाने काम करा!' असा सज्जड दम या नेत्यांबरोबरच कार्यकर्त्यांनाही दिला गेला. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक असलेले वेणुगोपाल यांनी या बैठकीच्या निमित्ताने व्यक्‍तिश: राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या नेत्याशी संवाद साधला, तरी हा "गोंधळातील गोंधळ' संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत नाहीत.

अर्थात, या गोंधळाची नांदी थेट प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीच लोकसभेच्या मैदानात न उतरण्याचे सूतोवाच करून म्हटली होती. तरीही त्यांनाच नांदेडमधून उभे राहण्यास भाग पाडले गेले. त्यापाठोपाठ निवडणुका ऐन तोंडावर आल्यावर मुंबई विभागीय कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांची उचलबांगडी करून "हायकमांड'ने या गोंधळाचा आपणही एक भाग असल्याचे दाखवून दिले! अर्थात, निरूपम यांना त्याबदल्यात मुंबईतून उमेदवारी जरूर मिळाली; पण त्यांची जागा घेणारे मिलिंद देवरा हेही लोकसभेचे उमेदवार आहेतच. त्यामुळे निरूपम यांच्या हकालपट्टीने काय साधले, हे एक पक्षश्रेष्ठीच जाणो! मात्र महाराष्ट्रातील गोंधळ हा त्यापलीकडला आहे. पुण्यासारख्या एकेकाळच्या कॉंग्रेसच्या मतदारसंघात उमेदवार निवडीबाबत कॉंग्रेसने घातलेला घोळ हा केवळ अक्षम्यच नव्हे, तर लांच्छनास्पदही आहे. कॉंग्रेसला या गोंधळाचा सर्वांत मोठा फटका एकेकाळी पक्षाचा अभेद्य गड असलेल्या पश्‍चिम महाराष्ट्रात बसेल, अशी चिन्हे आहेत; कारण तेथील एक-दोन कळीच्या मतदारसंघांत निम्म्याहून अधिक कार्यकर्ते हे थेट शिवसेनेचे काम करीत असल्याचे सांगण्यात येते.

सांगली हा एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला; पण हा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडल्याने तेथे पक्षाचा उमेदवारच रिंगणात नाही, अशी नामुष्की कॉंग्रेसवर आली. दुसरीकडे बाळासाहेब विखे-पाटील, शंकरराव मोहिते-पाटील यांच्या नातवांनी भाजपचा ध्वज खांद्यावर घेतला. हे सारे घराणेशाहीची सत्ता टिकवणे आणि निवडून येण्यासाठी ध्येय-धोरणांना तिलांजली देणे, यापलीकडे दुसरे काहीच नव्हते. मात्र अशा प्रकारांना आळा घालता न येणे, या बाबी राज्यातील पक्षनेतृत्वाचे अपयशच अधोरेखित करीत आहेत. त्यामुळेच पक्षाचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खर्गे हे महाराष्ट्राचे निरीक्षक म्हणून काम करत असतानाच स्वत:ही निवडणूक लढवत असल्यामुळे दिल्लीकरांनी मधुसूदन मिस्त्री यांना महाराष्ट्रातील गोंधळ आवरण्यासाठी मुंबईत ठाण मांडून बसण्यास सांगितले आहे. हा एका अर्थाने खर्गे यांच्याही अकार्यक्षमतेचाच पुरावा म्हणावा लागेल. 

मात्र पुण्याबाबत कॉंग्रेसने घातलेल्या घोळाचे वर्णन ते काय करावे? तेथे भाजपने गिरीश बापट यांची उमेदवारी जाहीर करून आठवडा लोटला, त्यांनी प्रचाराला जोमाने सुरवातही केली, तरी कॉंग्रेसने उमेदवारनिवडीचा घोळ सुरूच ठेवला. त्यातच मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना कॉंग्रेसने पक्षात प्रवेश दिला ! त्यामुळे आता तेच पक्षाचे उमेदवार होतील, या भीतीपोटी गायकवाड यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी पुण्यातील बहुतांश कॉंग्रेस नेत्यांनी उपस्थित न राहून, आपल्या नाराजीचा "मेसेज' थेट नेतृत्वापर्यंत पोचवलाही. मात्र त्यामुळे हा "गोंधळातील गोंधळ' नावाचा चित्रपट आणखी किती रिळे नेतृत्व खेचू पाहत आहे, असाच प्रश्‍न कॉंग्रेसजनांना पडला आहे. खरे तर महाराष्ट्रात मोठ्या प्रयासाने झालेल्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या युतीशी खंबीरपणे लढत देण्यासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी समविचारी अशा 56 पक्ष-संघटनांना एकत्र आणून आता आठवडा उलटला आहे.

मात्र त्यानंतरही कॉंग्रेसमध्ये उमेदवार निवडीवरून सुरू असलेला घोळ, शह-काटशहचे राजकारण, मित्रपक्षांचे दबावतंत्र आणि भाजपच्या दिशेने सुरू असलेले "आउटगोइर्टंग' यामुळे हा "गोंधळात गोंधळ' कॉंग्रेसच्या कार्यपद्धतीचे विदारक दर्शन घडवीत आहे यात शंका नाही. त्यातच थेट राहुल गांधी यांनी अमेठीबरोबरच केरळमधील वायनाड मतदारसंघातून उभे राहण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा विपरित अर्थ लावून, भाजप त्याचे भांडवल करू पाहत असल्याने मग पक्षकार्यकर्त्यांच्या मनातील गोंधळ अधिकच वाढला, तर त्यात नवल ते काय? 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com