वादळ माणसाळतंय..! 

वादळ माणसाळतंय..! 

नुकत्याच येऊन गेलेल्या "फणी' चक्रवाताच्या तडाख्याच्या जखमांनी ओडिशा राज्य घायाळ झाले असले; तरी ते ताठ मानेने उभे आहे, याचे श्रेय नि:संशय तेथील प्रशासनाला द्यायला हवे. भारतातले एक आर्थिकदृष्ट्या यथातथा परिस्थिती असलेले छोटेसे राज्य निसर्गाच्या प्रकोपाला एकजुटीने तोंड देत नामोहरम करते, हे उदाहरण उमेद वाढविणारे आहे. आपत्कालीन व्यवस्थापनाच्या क्षेत्रात भारत प्रौढत्वाकडे जात असल्याची सुचिन्हे या घटनेत दिसली.

जगभरच्या समाज माध्यमांमध्ये ओडिशा प्रशासनाच्या तत्परतेचे, समन्वयाचे मुक्‍तकंठाने कौतुक होत असून, संयुक्‍त राष्ट्रांच्या अनेक संस्थांसाठी ओडिशा सरकार व तेथील प्रशासनाने चक्रीवादळाला नमविण्यासाठी आखलेली व्यूहरचना कुतूहलाचा विषय ठरली आहे. जगभरात कुठे ना कुठे प्रचंड वादळे होत असतात आणि त्यात भरपूर जीवित आणि मालमत्तेची हानी होत असते. ही आपदा कधी हिमवादळाच्या रूपाने येते, तर कधी ज्वालामुखीच्या प्रस्फोटाच्या रूपाने. हाच राक्षस कधी त्सुनामीच्या रूपाने वाहने, घरे, कारखाने, वस्त्या, माणसे, जनावरे यांचा घास घेत सुटतो, तर कधी घोंघावणारे चक्रीवादळ मन:पूत थैमान घालून सारा मुलुख तसनस करून जाते. अशी चक्रीवादळे तर आंध्र आणि ओडिशाच्या किनाऱ्याच्या पाचवीला पुजलेली. गेल्या तीसेक वर्षांत ओडिशाने तर सात मोठमोठाली वादळे अनुभवली आहेत.

1971 साली आलेल्या अशाच भयंकर वादळाने ओडिशाला उद्‌ध्वस्त केले होते. हजारो माणसे मृत्युमुखी पडली होती, तर लाखो लोक बेघर झाले होते. 1999 सालीही तस्सेच घडले. तेव्हाच्या वादळात तब्बल दहा हजारांहून अधिक ओडिशावासी प्राणास मुकले होते. त्या वादळाच्या तडाख्यातून उभे राहून जगायला प्रारंभ करतानाच 1913 साली आलेल्या "फायलिन' चक्रीवादळाने तडाखा देऊन ओडिशा पुन्हा एकवार जमीनदोस्त केला होता. अशी विपत्ती आली, की मदतीच्या घोषणा होतात. भरपाईचे आकडे फुटतात. वरवरची दुरुस्ती होते आणि वादळाचे बळी ठरलेली कुटुंबे आपापल्या परीने जगणे कंठू लागतात, हा आजवरचा अनुभव. परंतु, ओडिशाच्या प्रशासनाने आपल्या मागील अनुभवातून शहाणपण शिकून वादळाला तोंड देण्याची धडाडीने तयारी केली. म्हणूनच, "न भूतो न भविष्यति' असे "फणी' वादळ येऊनही बळींची संख्या सीमित राहिली. 

ताशी 175 किमी वेगाने अंगावर धावून आलेल्या "फणी'ने एरवी अतोनात नुकसान केले असते. लाखो लोक बेघर झाले असते आणि जीवितहानीचा आकडा हृदय पिळवटून टाकणारा झाला असता. पण, चोख पूर्वतयारीनिशी उभ्या ठाकलेल्या ओडिशाच्या प्रशासनाने हे दिव्य पार पाडले. ओडिशात थैमान घालून हे चक्रीवादळ शेजारच्या पश्‍चिम बंगालकडे सरकले. तेथील प्रशासनही पुरेसे सावध होते. त्यानेही योग्य ती खबरदारी घेतली आणि त्यानंतर "फणी'ने आपला मोहरा बांगलादेशकडे वळविला. तोवर त्याचा उन्माद ओसरला होता. 

भारतानेच सोडलेल्या इनसॅट उपग्रहाकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे हवामान विभागाने "चक्रीवादळ येते आहे' असा अचूक इशारा दिला. इतकेच नव्हे, तर त्या चक्रवाताचा प्रवास आणि वेग कसा असेल, याचीही वेळोवेळी माहिती पुरविली. त्याचा पुरेपूर उपयोग करीत प्रशासनाने बचावाची तयारी जय्यत केली. अवघ्या चोवीस तासांत तब्बल बारा लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. "मानवी इतिहासातील हे सर्वांत कमी वेळात केलेले सर्वांत मोठे स्थलांतर ठरावे,' अशी टिप्पणी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी केली, ती पुरेशी बोलकी आहे. वास्तविक, सध्या हंगाम होता निवडणुकीचा.

मतदानासाठी सारी यंत्रणा राबत होती. पण, वादळाचा इशारा येताच आचारसंहिता बाजूला ठेवत प्रशासनाने सर्वप्रथम खलाटीच्या भागात राहणाऱ्या अनेक गोरगरिबांना हलविले. त्यांच्या खाण्यापिण्याची सोय केली. शाळा-कॉलेज बंद ठेवली. एरवी पुढाऱ्यांच्या प्रचार सभांचा बंदोबस्त पाहणारे पोलिस रयतेच्या रक्षणार्थ धावले. समाज माध्यमांवर या परिश्रमी पोलिसांची छायाचित्रे बघून कोणाचाही ऊर अभिमानाने भरून यावा. "जान बची लाखो पाये' या उक्‍तीनुसार पावले उचलत चक्रीवादळाचा प्रकोप लीलया परतविला गेला. या वादळाने स्थावर मालमत्तेचे नुकसान व्हायचे ते झालेच.

जगन्नाथपुरीलगतच्या काही भागांत विजेचे खांब कोसळले. दूरध्वनी संपर्काचे टॉवर्स जमीनदोस्त झाले. काही इमारती खचल्या. हजारो झाडे उखडली गेली. आंध्रातही दहा हजार नारळाची झाडे कोसळली. पण, जीवितहानी मर्यादित ठेवण्यात यश आले. एकंदरीत, एका पिसाळलेल्या चक्रीवादळाला खंबीरपणे माणसाळवण्यात तत्परता, परस्परसमन्वय, विज्ञान-तंत्रज्ञानाचे योग्य उपयोजन, या बळावर यश आले. विशाल किनारपट्टी लाभलेल्या भारताला चक्रीवादळे नवीन नाहीत. पण, त्याला तोंड देण्यासाठी उभ्या करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या बाबतीत आपण बराच काळ चाचपडत होतो.

आता ती परिस्थिती बदलते आहे. अलीकडेच आंध्रातही हे दिसून आले होते. त्यामुळेच सक्षमतेच्या दिशेने ही वाटचाल सातत्याने चालू राहिली पाहिजे. त्यासाठीचे प्रशिक्षण, पायाभूत सुविधा यांच्याबाबतीत दक्षता आणि विविध यंत्रणांमधील आणि सरकारांमधील समन्वय हा व्यवस्थेच्या अंगवळणीच पडावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com