अँग्री यंग मॅन! (अग्रलेख)

अँग्री यंग मॅन! (अग्रलेख)

जगभरात 1970चे दशक हे अस्वस्थ दशक म्हणून ओळखले जाते आणि त्याच दशकात अमिताभ बच्चन याने उभ्या केलेल्या "ऍन्ग्री यंग मॅन'च्या प्रतिमेच्या प्रेमात देशभरातील तरुणाई पडली होती. मात्र ते दशक उजाडण्याआधीच "साथी' जॉर्ज फर्नांडिस एक जिता-जागता "ऍन्ग्री यंग मॅन' म्हणून देशभरात ख्यातकीर्त झाले होते. याचे कारण प्रस्थापित व्यवस्थेविरोधात बंड करणे, हे त्यांच्या रक्‍तातच होते. फर्नांडिस यांनी आपल्या आयुष्यातील पहिले-वहिले बंड हे वडिलांच्या विरोधातच केले होते. त्यांच्या वडिलांना त्यांना वकील करावयाचे होते. मात्र तरुणाईच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या जॉर्जने त्यास नकार दिला आणि मॅट्रिकनंतर शिक्षण घेण्यासच नकार दिला.

पुढे काही वर्षांतच ते "प्रिस्ट' बनण्यासाठी सेमिनरीमध्ये दाखल झाले आणि अल्पावधीतच तेथेही त्यांनी बंडाचा झेंडा खांद्यावर घेतला, तो तेथील फादर आणि प्रशिक्षणार्थी यांना मिळणाऱ्या जेवणव्यवस्थेत असलेल्या फरकामुळे. त्यानंतर कोणताही जिद्दीचा युवक आपल्या आयुष्यात काही तरी करून दाखवण्यासाठी येतो त्याप्रमाणे ते थेट मुंबईत येऊन धडकले! तेथे त्यांना पी. डीमेलो नावाचा "फरिश्‍ता' भेटला आणि फर्नांडिस यांचे अवघे आयुष्यच त्यामुळे आरपार बदलून गेले. डीमेलो हे बंदर आणि गोदी कामगारांचे नेते होते. त्यांनी फर्नांडिस यांना समाजवादी चळवळीत ओढले आणि "साथी' ही उपाधी त्यांच्या मागे लागली, ती कायमचीच. मात्र त्यांच्या वैचारिक प्रवासात त्यांना आणखी एक गुरू भेटले. त्यांचे नाव होते डॉ. राममनोहर लोहिया. त्यांनी फर्नांडिस यांच्या रक्‍तात कॉंग्रेसविरोध भिनवला आणि पुढच्या चार दशकांनंतर याच कॉंग्रेसविरोधाने त्यांच्या जीवनाला लागलेले आणखी एक वेगळे वळणच त्यांच्या तेज-तजेलदार आणि बंडखोर आयुष्याचे महानाट्य शोकांतिकेत रूपांतर करून गेले.

अस्सल समाजवाद आणि डाव्या विचारांशी असलेली बांधिलकी हे खरे तर फर्नांडिस यांचे मूळ. तरीही कॉंग्रेस, तसेच विशेषत: नेहरू-गांधी कुटुंबाला असलेला विरोध पुढे त्यांना भारतीय जनता पक्षाच्या छावणीत घेऊन गेला! कोणत्याच चौकटीत न मावणारे हे व्यक्तिमत्त्व होते, हेच खरे. 

मुंबईकरच नव्हे, तर सारा देश त्यांच्या कायम ऋणातच राहील आणि त्याला त्यांनी स्वातंत्र्यानंतर चार-साडेचार दशके रखडलेल्या कोकण रेल्वे प्रकल्पाला दिलेली गती हे मुख्य कारण आहे. विश्‍वनाथप्रताप सिंह यांच्या मंत्रिमंडळात ते रेल्वेमंत्री होते आणि मधू दंडवते अर्थमंत्री. दंडवते यांची नाळच कोकणाशी जोडलेली होती आणि याच रेल्वेने फर्नांडिस यांचाही मंगळूर या आपल्या गावाकडे जाणारा प्रवास सुखकर झाला. त्यांच्या या कामगिरीबद्दल मराठी माणूस आजही त्यांना दुवाच देत आहे. फर्नांडिस यांचे नाव मुंबापुरीत महापालिका कामगार संघटना, टॅक्‍सी युनियन आदी क्षेत्रांत अल्पावधीतच दिगंत कीर्ती मिळवून गेले. त्याला अर्थातच त्यांचा लढाऊ बाणा आणि झुंजार प्रकृती कायम होती. पुढे बघता बघता त्यांनी रेल्वे कामगार युनियनवरही वर्चस्व मिळवले. मात्र देशाच्या नकाशावर त्यांचे नाव सर्वप्रथम झळकले, त्याला अर्थातच 1967 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मुंबईत कॉंग्रेसचे बडे नेते स. का. पाटील यांचा पराभव केल्यामुळे! खरे तर ही अगदीच अनपेक्षित बाब होती, पण ते घडले खरे. तोपावतो "बंदसम्राट' अशी उपाधी अभिमानाने मिरवणारे आणि त्यांच्या एका इशाऱ्यानिशी हे 24 तास जागे राहणारे महानगर "बंद' होण्याचा रिवाज पडून गेला होता.

समाजवादी, तसेच डाव्या चळवळीतील धडाडीचा कार्यकर्ता म्हणून त्यांचे नाव देशभरात दुमदुमू लागले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचा दोस्तानाही याच काळात जुळून आला. फर्नांडिस 1967 मध्ये संसदेत गेले आणि मुंबईशी त्यांची नाळ तुटली. हे त्यांच्या जीवनातील आणखी एक वळण होते. फर्नांडिस दिल्लीकर झाले आणि 1970च्या त्याच अस्वस्थ दशकात त्यांनी अभूतपूर्व असा रेल्वे संप घडवून आणला आणि सारा देश जागच्या जागी ठप्प होऊन गेला.

आणीबाणीच्या पार्श्‍वभूमीवर झालेला हा संप जगभरात गाजला आणि स. का. पाटील यांच्या पराभवानंतर फर्नांडिस यांच्या मुगुटात आणखी एक मानाचे पीस खोवले गेले. मात्र हा संप इंदिरा गांधी सरकारच्या विरोधात होता आणि रेल्वे कामगारांचे प्रश्‍न पूर्णपणे सुटले, असे झाले नाही. तरीही या रेल्वे संपानंतर आलेल्या आणीबाणीच्या विरोधात त्यांनी भूमिगत राहून पुकारलेले सशस्त्र आंदोलन त्यांच्या बंडखोर स्वभावाचीच साक्ष देते. "बडोदा डायनामाइट' या नावाने प्रसिद्ध असलेल्या या कटानंतर ते पकडले गेले खरे; पण तोपावेतो तमाम देशाचे "हीरो' बनले होते! त्यामुळेच आणीबाणीनंतर 1977 मध्ये झालेली ऐतिहासिक निवडणूक त्यांनी तुरुंगातूनच लढवली आणि ते प्रचंड बहुमताने विजयी झाले. 

पुढे मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार आले आणि त्यात ते मंत्रीही झाले; पण मंत्री झाल्यावरही त्यांचा बंडखोर स्वभाव काही कमी झाला नाही. संघपरिवाराशी असलेल्या जनता पक्षातील पूर्वाश्रमीच्या जनसंघवासीयांच्या बांधिलकीच्या प्रश्‍नावरून देसाई सरकार अडचणीत आले. तेव्हा त्यांनी मोरारजी देसाई यांच्या समर्थनाचे घणाघाती भाषण संसदेत केले आणि अवघ्या 24 तासांतच वैचारिक कोलांटउडी घेत ते सरकारच्या विरोधात उभे राहिले. फर्नांडिस यांच्या विश्‍वासार्हतेला गेलेला हा फार मोठा तडा होता आणि गमावलेला हा विश्‍वास त्यांना परत मिळवता आलाच नाही. तरीही राजीव गांधी यांच्या विरोधात उठलेल्या "बोफोर्स' वादळानंतर त्यांनी विश्‍वनाथ प्रताप सिंह यांना सोबत घेऊन जनता दलाची स्थापना करण्यात मोठा वाटा उचलला.

विश्‍वनाथ प्रताप पंतप्रधानही झाले. त्याच मंत्रिमंडळात रेल्वे खाते सांभाळताना, त्यांनी कोकण रेल्वेची मुहूर्तमेढ रोवली. मात्र लालकृष्ण अडवानी यांच्या रथयात्रेनंतर ते सरकार कोसळल्यावर हा एकेकाळचा झुंजार साथी थेट संघपरिवाराशीच साटेलोटे करू लागला. या वेळी त्यांनी दुसऱ्यादा जनतेचा विश्‍वास गमावला. पुढे अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते संरक्षणमंत्रीही झाले. सरहद्दीवरील परिस्थिती प्रत्यक्ष पाहून जवानांच्या गरज जाणून घेणारा आणि प्रसंगी नोकरशाहीला फैलावर घेणारा संरक्षणमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द संस्मरणीय ठरली. मात्र हेच खाते त्यांच्याभोवती शवपेटी गैरव्यवहारासारखे किटाळही घेऊन आले. पुढे त्यांना प्रदीर्घ काळ दीर्घ आजाराचा सामना करावा लागला. तेव्हा मात्र ते कोणतेही बंड करण्याच्या स्थितीत नव्हते.

एकेकाळच्या झुंजार, लढवय्या आणि बंडखोर नेत्याची आयुष्याच्या उत्तरार्धात झालेली शोकांतिका चटका लावणारीच होती. त्यांच्या निधनाने जवळपास पाच दशके राजकारणावर, समाजकारणावर आणि कामगार जगतात अमीट ठसा उमटवणारा नेता आपल्यातून निघून गेला आहे. कामगार चळवळीत सध्या जाणवणारी मरगळ झटकण्यासाठी नवा विचार घेऊन पुढे येऊ पाहणाऱ्यांनाही जॉर्ज फर्नांडिस यांचे वादळी जीवन स्फूर्ती देईल, यात शंका नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com