रडीचा डाव (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 नोव्हेंबर 2018

क्रिकेट हा खेळ कोणे एके काळी "सभ्य माणसांचा खेळ' म्हणून जगभरात नावाजला गेला होता. मात्र, काळ बदलला आणि या खेळाच्या मैदानावर सोन्या-चांदीची नाणी छमाछम वाजू लागली. त्यामुळेच मग या "सभ्य माणसांच्या खेळा'त कितीही कर्तबगारी बजावली, तरी खिलाडूवृत्ती अंगी बाणवता येतेच असे नाही, याची प्रचिती येऊ लागली. "कोणाला अन्य देशांचे खेळाडू आवडत असतील, तर त्यांनी भारत सोडून त्या देशात वास्तव्याला जावे,' हे भारतीय कर्णधार विराट कोहली याचे वक्‍तव्य म्हणजे अशाच प्रकारचा "रडीचा डाव'च आहे!

क्रिकेट हा खेळ कोणे एके काळी "सभ्य माणसांचा खेळ' म्हणून जगभरात नावाजला गेला होता. मात्र, काळ बदलला आणि या खेळाच्या मैदानावर सोन्या-चांदीची नाणी छमाछम वाजू लागली. त्यामुळेच मग या "सभ्य माणसांच्या खेळा'त कितीही कर्तबगारी बजावली, तरी खिलाडूवृत्ती अंगी बाणवता येतेच असे नाही, याची प्रचिती येऊ लागली. "कोणाला अन्य देशांचे खेळाडू आवडत असतील, तर त्यांनी भारत सोडून त्या देशात वास्तव्याला जावे,' हे भारतीय कर्णधार विराट कोहली याचे वक्‍तव्य म्हणजे अशाच प्रकारचा "रडीचा डाव'च आहे! कला असो की क्रीडा आणि संगीत असो की नाट्य अशा 64 कलांच्या क्षेत्रांतील आवडीनिवडी देशांच्या सीमा सहज ओलांडून जातात आणि म्हणूनच खुद्द विराट हाही जगभरातील असंख्य क्रिकेटरसिकांच्या गळ्यातील ताईत बनू शकला आहे.

विराटची फलंदाजी ही काही औरच आहे आणि सध्या तो झळकावत असलेली शतकांमागून शतके बघता, सचिन तेंडुलकरच्या शतकांच्या शतकमहोत्सवाचा विक्रम तो लीलया पार करेल, असे दिसत आहे. मात्र, "आपल्याला विराटपेक्षा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातील फलंदाज अधिक आवडतात!' हे कोण्या एका क्रिकेटप्रेमीचे वाक्‍य त्याला भलतेच झोंबले आणि मग त्याला देश सोडून जाण्याचा "आदेश' देतानाच, विराटने त्याला तथाकथित देशप्रेमाची झालरही लावली. त्यामुळे हे असले तथाकथित देशप्रेम आणि त्याचबरोबर सध्या देशात ऊतू चाललेल्या तथाकथित राष्ट्रवादाचा मुद्दा समोर आला आहे. 

विराट नावाचा हा "तारा' भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर उदयास आला, तो त्याने दहा वर्षांपूर्वी कर्णधार या नात्याने भारताला "अंडर-19' विश्‍वकरंडक जिंकून दिल्यानंतर. तेव्हा त्याने स्वत:च "आपल्याला दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज हर्षल गिब्ज सर्वांत आवडतो!' असे म्हटले होते. त्याच्या या विधानाचा आधार घेऊन, एका क्रिकेटरसिकाने विराटला दक्षिण आफ्रिकेत वास्तव्याला जाण्याचा निरोप "ट्‌विट' करून दिला आहे! एका क्रिकेटरसिकाला देश सोडून जाण्याचा त्याचा "फटका', त्याच्या बहुचर्चित "कव्हर ड्राइव्ह'प्रमाणे सीमापार तर गेला नाहीच; उलट या अशा भलत्या फटक्‍याच्या नादात तो स्वत:च "स्वयंचित' झाल्याचे, त्यानंतर सुरू झालेल्या टीकेच्या भडिमारामुळे दिसत आहे! अर्थात, विराट एवढ्यावरच थांबलेला नाही. इंग्लंडमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी आपले वेगवान गोलंदाज सज्ज असावेत, म्हणून त्यांना त्यापूर्वीच्या "आयपीएल'मध्ये खेळवू नये, अशी सूचना त्याने केली आहे.

कर्णधार म्हणून कोणीही त्याच्या या भूमिकेचे स्वागतच करेल. मात्र, ही सूचना म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर टाकलेला अस्सल "गुगली'च आहे. "आयपीएल' या सोन्याची खाण असलेल्या स्पर्धेत न खेळणाऱ्या वेगवान गोलंदाजांच्या आर्थिक नुकसानीची भरपाई मंडळाने करावी, अशी पुष्टी विराटने या वरवर रास्त वाटणाऱ्या मागणीला जोडली आहे. अर्थात, त्यामुळे या "सभ्य माणसांच्या खेळा'त मोठमोठे विक्रम करणाऱ्यांचे नेमके प्रेम कशावर आहे, तेच उघड झाले आहे. 

विराटच्या वादग्रस्त वक्‍तव्यामुळे खरे तर गेल्या काही वर्षांत आपल्या देशातील सहिष्णू वृत्ती कशी लयास जाऊ पाहत आहे, यावरच प्रकाश पडला आहे. "राममंदिर नको असेल, तर पाकिस्तानात निघून जा!' अशा थाटाचे, हे असले वक्‍तव्य विराटसारखा विक्रमवीर कधी करेल, हे कोणाच्या मनातही आले नसणार! मात्र, दुसऱ्या अर्थाने ही "रॉकस्टार मेंटॅलिटी'च आहे. कर्तबगारीच्या जोरावर मिळणारी वारेमाप प्रसिद्धी, त्यानंतर हातात येणारा, मोजायलाही कठीण जाईल इतका पैसा आणि आणि पुढे त्यातूनच उभे राहणारे "फॅन क्‍लब्स' या साऱ्यांची मस्ती यापूर्वीही माईक टायसनपासून जॉन मॅकेन्‍रोपर्यंत अनेकांनी प्रत्ययास आणून दिली आहे. मात्र, याच गुर्मीचे दर्शन घडवताना विराटने त्याला तथाकथित राष्ट्रवादाची झालर लावली आहे.

खरे तर काव्य, शास्त्र, विनोद आणि अर्थातच क्रीडा आदी क्षेत्रांतील बुद्धिवंतांना देशाच्या सीमारेषांचे साधे स्मरणही कधी होत नाही. विराटने मात्र या वक्‍तव्यामुळे मैदानावरील चतुरस्त्र रूपापेक्षा, मैदानाबाहेरील आपले "बाह्यरूप' वेगळे असल्याचे दाखवून दिले, हेच खरे !

Web Title: Pune Edition Editorial Article on Cricket