साहेबांचा दौरा ! (ढिंग टांग!)

साहेबांचा दौरा ! (ढिंग टांग!)

साहेबांच्या विदर्भ दौऱ्याची गोष्ट. तांबडफुटी झाली. साहेब उठले. जाग आल्या आल्या साहेबांना चहा लागतो. पण चंद्रपुरातल्या त्या निबीड जंगलात चहा कुठला? इतक्‍या दुर्गम भागात चहा मिळत नाही, चहा एकवेळ मिळेल, पण दूध मिळणे अशक्‍य, असे त्यांना सांगण्यात आले. साहेबांना हे पटले नाही. दुधाचा चहा म्हंजे काय मोबाइलचे नेटवर्क आहे? काहीतरीच!.. चहा मिळालाच पाहिजे असे त्यांनी ठणकावून सांगितले.

आरामगृहाच्या खिडकीतून साहेबांनी पाहिले. दूरवर माळरानात रानम्हशींचा कळप चरताना दिसत होता. कोण म्हणतो, इथं दूध मिळत नाही म्हणून? त्यांनी तातडीने बाळाजीरावांना बोलावणे पाठवले. नवनिर्माणाचे दोन-चार सैनिक ताबडतोब त्या म्हशींच्या मागावर पाठवा, चरवीभर दूध आरामात मिळून जाईल, असा आदेश त्यांनी दिला. बाळाजीपंतांची बोबडी वळली. रानम्हशींचे दूध काढण्याची इथे कोणाची हिंमत आहे? अरे बापरे! 

जिथे कुठलाही नेता आजवर धडपणी पोचला नाही, पोचला तरी धडपणी परतला नाही, अशा दुर्गम भागात साहेबांनी दौरा काढला होता. नवनिर्माणाचे वारे इथे पोचले पाहिजे, ह्या विचाराने साहेबांच्या मनात घर केले होते. नवनिर्माणाचे वारे पोचवणे एवढाच उद्‌देश असेल तर आपण तूर्त पालघरपर्यंत जाऊन येऊ, असा नेमस्त सल्ला साहेबांना नवनिर्माणाच्या कारभारी मंडळाने दिला होता. पण साहेबांना ऐन ऑक्‍टोबरात विदर्भ बोलावतो आहे, हा नियतीचा संकेतच असावा!! 

रानात मोकळी जागा बघून एखादे झक्‍कपैकी व्यंगचित्र काढावे, असे साहेबांच्या मनात आले. पण... 
"आज कोरकूंच्या पाड्याला भेट द्यायची आहे साहेब..,'' बाळाजीपंतांनी दिवसभराचा कार्यक्रम सांगितला, आणि साहेबांचा हिरमोड झाला. 

"कायकू?,'' साहेबांनी विचारणा केली. कोरकू आदिवासींच्या पाड्यावर चहा मिळेल का? असे त्यांना विचारायचे होते. पण ते काहीच बोलले नाहीत. यथावकाश जीपमधून दौरा सुरू झाला. रस्त्याच्या दुतर्फा उंच उंच झाडे होती. ह्यातली काही तेंदूपत्त्याची झाडे असतील का? असणारच. तेंदूपत्त्याच्या विड्या वळायला चांगला उपयोग होतो, हे साहेबांनी ऐकले होते. पण आरोग्याला हानिकारक असा हा विचार त्यांनी मनाबाहेर केला. उन्हे मी म्हणत होती. 

"काय जंगल आहे नाही, साहेब?'' भोवतालच्या निबीड अरण्याकडे पाहात बाळाजीपंत हरखून म्हणाले. साहेबांनी किंचित नाक मुरडले. एवढी झाडी तर आमच्या शिवाजी पार्कातही असेल... पण ह्यांना सांगणार कोण? एवढ्या झाडीत साधा चहा... जाऊ दे. 

जीप भरधाव कोरकू पाड्याकडे निघाली होती. कोरकूंच्या मुखियाने पानांचा फ्रॉक करून घालायला दिला, आणि रिंगण धरून नाचावयास भाग पाडले तर आपण नेमके काय करायचे, ह्याचा विचार साहेब करत राहिले. पानांचा झगा वगैरे ठीक आहे, पण असा फोटो मुंबईच्या वर्तमानत्रात प्रसिद्ध झाला तर पंचाईत होईल... जीप परत फिरवता येते का, ह्या विचाराने साहेब बसल्याजागी चुळबुळत होते. 

साहेबांचा नूर बघून बाळाजीरावांना विषय काढावा की काढू नये असे झाले होते, परंतु अखेर त्यांनी मनाचा हिय्या केलाच... 
""एक प्रॉब्लेम झालाय साहेब!,'' बाळाजीराव म्हणाले. 
""क...क... काय झालं आता?'' जीपच्या धक्‍क्‍यामुळे साहेबांना बोलणे अशक्‍य झाले होते. 
""यवतमाळला पुन्हा जावं लागेल असं दिसतंय!,'' बाळाजीराव म्हणाले. 

"परवाच गेलो होतो ना! केवढं जोरात स्वागत झालं आमचं... परत काय जायचं तिथं?,'' साहेब वैतागले. 
""तोच घोटाळा झालाय... तिथं पांढरकवड्याच्या जंगलात नरभक्षक वाघीण मोकाट सुटली आहे ना...'' बाळाजीराव कसेबसे म्हणाले. 
""मग?'' 

""वाघीण मारायला नामचीन शिकारी येणार म्हणून तिथले गावकरी वाट बघत होते,'' आवंढा गिळत बाळाजीरावांनी खुलासा केला, ""वाघ मारायला परत कधी येणार, असा निरोप आलाय तिथून..!'' 

- ब्रिटिश नंदी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com