आंबे, घड्याळ, बंगाली कुर्ते! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी 
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

अखिल भारतीय "खिलाडी' व सुप्रसिद्ध कुंग फू, तसेच जुजुत्सुतज्ज्ञ श्री अक्षयकुमार ह्यांनी आमचे लाडके दैवत श्रीश्री नमोजी ह्यांची "न भूतो न भविष्यति' छापाची मुलाखत पाहिल्यानंतर आमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

अखिल भारतीय "खिलाडी' व सुप्रसिद्ध कुंग फू, तसेच जुजुत्सुतज्ज्ञ श्री अक्षयकुमार ह्यांनी आमचे लाडके दैवत श्रीश्री नमोजी ह्यांची "न भूतो न भविष्यति' छापाची मुलाखत पाहिल्यानंतर आमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. थोर पुरुषाची बरीचशी लक्षणे आमच्याही ठायी असल्याचा साक्षात्कार होऊन आम्ही आधी लाजून चूर झालो, मग अभिमानाने छाती फुग फुग फुगली. (ती शेवटी 56 इंच भरली.) अशी मुलाखत गेल्या दहा हजार वर्षांत झाली नाही, आणि यापुढील दहा हजार वर्षांत होणार नाही, हे सत्य आहे. 

संन्यासी बनून हिमालयात निघालेला एक दिव्य पुरुष मधल्यामध्ये दिल्ली स्थानकात उतरून थेट प्रधानसेवक झाला, ही चित्तरकथा केवळ थक्‍क करणारी आहे. ती ऐकून कुंग फू व जुजुत्सुतज्ज्ञ अभिनेते अक्षयकुमार च्याटंच्याट पडले, तिथे आम्हासारख्या भक्‍तांचा काय पाड लागणार? सदर मुलाखतीतून आम्हाला श्रीश्री नमोजींबद्दल बहुमूल्य अशी माहिती मिळाली. जी आम्ही स्वत:शी ताडून पाहिली. बालपणी बाल-नमोजी तांब्यात कोळसे घालून सदऱ्याला इस्तरी करीत असत. (कोळसे पेटलेले असत.) पुढे कोळसा घोटाळ्यामुळे हे थांबले. इस्तरी करण्याची आमची पद्धत जास्त वजनदार आहे. कां की आम्ही गादी खाली सदऱ्याची घडी ठेवून त्यावर सलग आठ तास घोरत असू. जेणेकरून इस्तरी छान होई. असो. 

बाल-नमोजी क्‍यानव्हासच्या जोड्यांना खडूने पालिश करीत असत. हा शालेय स्टेशनरीचा दुरुपयोग आहे, असा युक्‍तिवाद काही नतद्रष्ट कांग्रेसवाले करतील; पण आपण त्याकडे दुर्लक्ष करू. आम्हीही मोरेमास्तरांच्या खुर्चीस खडू घासून ठेवीत असू. पुढे दिवसभर मोरेगुर्जी शुभ्र पार्श्‍वभूमीनिशी विद्यादानाचे पवित्र कार्य करीत असत. पुन्हा असो. 

बाल-नमोजी ह्यांस आंबे फार आवडत असत. तेदेखील पाडाचे आंबे! झाडावरच पिकलेले. तेव्हाच्या काळी आंबराईचे मालक फार्फार उदार मनोवृत्तीचे असत. आंबे खावयास आंबराईवर बाल-नमोजी सर्जिकल स्ट्राइक करीत असे. (घुसकर पाडेंगे!) परंतु, आंबराईमालक कवतिकाने चि. बाल-नमोजीस स्वत:हून चार आंबे खावयास देत असत. आम्हास विपरीत अनुभव आला! आंबराई सोडा, भय्याच्या गाडीवरील दोन आंबे लांबवण्याच्या मोहिमेत भय्याने आमचे मनगट घट्ट पकडून आम्हास यथेच्छ पिळले होते!! असो, असो. 

मनगटावरून आठवले! श्री नमोजी हे मनगटावरील घड्याळ कायम उलटे लावतात. कां? तर मीटिंगमध्ये बसले असता मनगट वर करून वेळ पाहिली की समोर बसलेल्याचा अपमान होतो. किती मोठे मन, किती हा विनम्रभाव! घड्याळ उलटे लावणे हे वाटते तितके सोपे नाही. उलटे घड्याळ हे मनगटाच्या आतील बाजूस असते. सहज हातवारे करताना नजर टाकून वेळ पाहिली की समोरील व्यक्‍ती किती वेळ पिडणार आहे, ह्याचा अचूक अंदाज येतो. फारच पिडू लागला तर एखादी अजस्त्र जांभई देऊन टाकावी!! समोरील मनुष्य गलितगात्र होतो, असा आमचा अनुभव आहे. तेही एक असो. 

प्रवासाच्या ब्यागेत मावावेत, म्हणून आपल्या कुडत्यांच्या बाह्या श्रीनमोजी ह्यांनी कापून टाकल्या व तीच पुढे फ्याशन झाली, हे ऐकून आम्ही काही काळ निपचित पडलो होतो. ब्यागेत बिनबाह्यांचे कपडे ज्यास्त मावतात, हे भौतिकशास्त्र आमच्या ध्यानी आधी का आले नाही बरे? 

श्रीनमोजी ह्यांचे विरोधकांमध्येही छुपे चाहते आहेत, हे आम्हाला आधीच माहीत होते. परंतु, बंगालच्या ममतादीदी स्वत: दुकानात जाऊन दोन बंगाली कुर्ते निवडून श्रीनमोजींना पाठवतात, ही मौलिक माहिती ऐकून आम्ही धन्य झालो. दोन मीडियम साइजचे कुर्ते हैदराबादेसही पाठवा, अशी विनंती गठबंधनवाल्या चंद्राबाबू नायडूंनी केली नाही, म्हंजे मिळवली! आता मात्र असोच!!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Editorial Article on Dhing Tang