न्योता ! (ढिंग टांग !)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

"वझीरे आजम-ए-हिंदोस्तां को हरवतन हरघडी गले लगने की बुरी आदत है...'' असा मशवरा आईएसआईने मला दिला. लगता है पडोसी होकर भी गले लगना हमारी किस्मत में नहीं है. काश्‍मीरचा मसला सुटला, तर आपण गले मिलना मुमकिन हो सकता है... 

वझीर-ए-आजम-ए-हिंदोस्तॉं, मसीहा-ए-आम जनाब नमोजी, तहेदिलसे (याने की : हृदयतळापासून) आपल्याला शुक्रिया (धन्यवाद) अदा करण्यासाठी हे खत लिखत (लिहीत) आहे. मेहेरबानी असावी. "एक ना एक दिन पाकिस्तानचा वझीरे-आजम बनेन' असे ख्वाब (स्वप्न) मी बचपनसे (बालपणापासून) पाहत होतो. ते आता साकार झाले आहे, ही उपरवाल्याची व आपली मेहेरबानी आहे. चुनाव जिंकलो तर पडोसवाल्या नमोजींसारखा कारभार करीन, अशी जुबान मी माझ्या पाकिस्तानच्या अवामला (जनतेला) दिली होती. अवाम ने आता मला चुनून (निवडून) दिले आहे!! बहरहाल मी चुनाव जिंकल्यामुळे पाकिस्तानातच अच्छे दिन आल्याची लहर पसरली आहे. 

"हम इम्रानजी को लानेवाले है, अब अच्छे दिन आनेवाले है...' हे कव्वालीच्या अंगाने जाणारे आमच्या पार्टीचे चुनावगीत खूप गाजले. "मला वझीरे आजम (पंतप्रधान) म्हणून नका, मी सीधासाधासा गुलामे-आजम (प्रधानसेवक) आहे,' असे मी साफसाफ लफ्जों में (स्वच्छ शब्दांत) सांगून टाकले आहे. काय सांगू जनाब? मला चाय बनवता येत नाही, यह बडे अफसोस की बात है!! लेकिन आता मी भांडे-इ-चाय चूल्हा-इ-गॅसवर कसे ठेवावे? त्यात शक्‍कर-फक्‍की (साखर प्लस चहा पावडर) किती घालावी? अदरक किसून घालावे की ठेचून? हे सारे शिकून घेत आहे. आपण आमच्या लाहौरला याल, तेव्हा मी माझ्या पाक हातांनी केलेल्या चायची प्याली आपल्याला नजर करीन!! 

आपल्याप्रमाणेच मीसुद्धा पाकिस्तानी रेडिओवर "दिल की बात' हा टॉक शो करण्याचे ठरवले आहे. हर महिने की पेहली तारीख को हा कार्यक्रम होईल. "क्रिकेट की दो बातें,' "यॉर्कर या न्यूयॉर्कर?', "दुखरी नस कश्‍मीर', "दास्तां-ए-सरहद' अशी काही भाषणे मी रेकॉर्ड करून ठेवली आहेत. चुनाव जिंकल्यानंतर लगे हाथ मी माझ्या पंजाबी कुर्त्याच्या बाह्या छाटून टाकल्या असून नवी बारा जाकिटे शिवायला टाकली आहेत. वतन-ए-पाकिस्तानच्या आधीच्या सरकारांनी खूप घपले (घोटाळे) करून ठेवले आहेत. ते निस्तरण्यासाठी काही महिन्यांनी अचानक किसी सही शब-ए-बहार को मैं रद्‌द-ए-चलन का ऐलान करुंगा! "आज की रातढले पाकिस्तान की नोट महज एक कागज का टुकडा रह जायेगा' हे ऐलान मी केले की किती धमाका होईल, जरा सोचो! 

थोडक्‍यात, मी आपल्याच नक्‍श-ए-कदमवर चालत असून लौकरच वझीरे आजम पदाची कसम खाणार आहे. कसम खाण्याच्या समारंभासाठी (शपथविधी) आपल्यालाही न्योता भेजावा, असे मी सुचवले होते. पण असे मी सुचवताच हवा-ए-पाक एकदम तंग झाली. 

"वझीरे आजम-ए-हिंदोस्तां को हरवतन हरघडी गले लगने की बुरी आदत है...'' असा मशवरा आईएसआईने मला दिला. लगता है पडोसी होकर भी गले लगना हमारी किस्मत में नहीं है. काश्‍मीरचा मसला सुटला, तर आपण गले मिलना मुमकिन हो सकता है... 

खैर...आपल्याला न्योता नसला तरी माझे जुने यारदोस्त कपिल, सुनील, सिध्दूपाजी ह्यांना मी बुलावा धाडला आहे. "लेकिन मॅच खेलोगे, तो आएंगे' असे ते म्हणतात. ऑगस्ट की ग्याराह तारीख के पाक मुहूरत पर वझीरे आजमपदाची कसम खाणे ठीक राहील, असे मला सांगण्यात आले. 11 ऑगस्ट क्‍यूं? मी चौकशी केली. 11 ऑगस्टला हिंदोस्तांच्या दख्खनी भागात गटारी अमावास्या सेलेब्रेट करतात ना? तो बस...वही मुहूरत मुझे मंजूर है!! फिर एक बार शुक्रिया, मेहेरबानी. आप का अपना इम्रान. 
ता. क. : बाय द वे, आप के मिठी-दोस्त शरीफसाहेब सध्या लाहोरच्या जेलखान्यात बंद असून त्यांचा वेळ चांगला जात आहे. 

-ब्रिटिश नंदी 
 

Web Title: Pune Edition Editorial Article on Dhing Tang Nyota