एक होती वाघिण (अग्रलेख)

एक होती वाघिण (अग्रलेख)

दोनशेच्या वर वन कर्मचारी, साठच्या वर कॅमेरे ट्रॅप्स, पाच शार्प शूटर्स, पाच हत्ती, दोन श्‍वान पथके, दोन ड्रोन कॅमेरे आणि एका पॅराग्लायडरसह सुरू झालेले "मिशन शूटआउट' पूर्ण झाले आणि त्यात "टी-1' असे सरकारी नाव असलेल्या नरभक्षक वाघिणीला ठार करण्यात आले. या विषयावरून देशभरात वन्यजीवप्रेमी आणि पर्यावरणवाद्यांनी आरोपाच्या फैरी झाडणे सुरू केले आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव वन परिक्षेत्रातील राळेगाव व कळंब तालुक्‍यातील तेरा जणांचा बळी घेणाऱ्या या वाघिणीला वन्यजीवप्रेमींनी "अवनी' असे नाव दिले होते.

तिला मारण्यासाठी अनेकांनी कोर्टाची पायरी चढली आणि तिला वाचवण्यासाठीही अनेकांनी कायद्याचा लढा दिला. तिने तेरा जणांचे बळी घेतले, हे खरे आहे. तिच्या वास्तव्यामुळे त्या परिसरातील लोकांना शेतात जाणे कठीण झाले होते, हेही खरे आहे. प्रयत्न केला असता तर तिला बेशुद्ध करून इतरत्र हलवता आले असते, असा वन्यजीवप्रेमींचा दावा आहे. न्यायालयानेही स्पष्टपणे अवनीला ठार करण्याचा आदेश दिला नव्हता. शक्‍यतो तिला बेशुद्ध करावे आणि परिस्थिती हाताबाहेर जात असल्यास ठार करावे, असे न्यायालयाने म्हटले होते. त्यातील दुसऱ्या भागाचीच अंमलबजावणी झाल्याचे वन्यजीवप्रेमी म्हणतात. याउलट आम्ही तिला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला; पण तिने जिप्सीवर धाव घेतल्यामुळे तिला ठार करणे भाग पडले, असे शार्प शूटर असगर अली खान म्हणतात. 2016 सालच्या जानेवारी महिन्यापासून अवनीने एकूण तेरा लोकांचा जीव घेतला. त्यामुळे तिला ठार करणे भाग होते, अशी भूमिका घेता येणे शक्‍य आहे.

नरभक्षक प्राण्यांबद्दल किती दया दाखवावी याला मर्यादा आहेत. एका माणसाने दुसऱ्या माणसाचा जीव घेतला तर त्याला मृत्युदंड देण्याची देशाच्या कायद्यात तरतूद आहे. हा मुद्दा ध्यानात घेतला तर अवनीला ठार करण्याची कारवाई समर्थनीय ठरते. मात्र, वाघ किंवा वाघिणी माणसांच्या क्षेत्रात आधी आले, की माणसांनी आधी जंगलांवर आक्रमण केले, याचा तारतम्याने विचार केला तर माणसंच अधिक दोषी ठरतात. 

वाघांच्या संरक्षणाच्या व संवर्धनाच्या संदर्भात गेली वीसेक वर्षे सरकार अत्यंत गंभीर आहे. वाघ हा वन पर्यावरणाच्या साखळीतील महत्त्वाचा घटक. वाघाचे अस्तित्व जंगलात असल्यामुळे माणसांचा जंगलातला वावर आतापर्यंत मर्यादित राहिलेला आहे. पण जंगले जसजशी आक्रसत गेली, तसतसे वाघ गावांत शिरू लागले. अनेक जंगलांमध्ये उन्हाळा तर सोडा, हिवाळ्यातही पाणी नसते. पाणी नसेल तिथे हिरवळ कमी आणि त्यामुळे हरितावर जगणाऱ्या प्राण्यांची संख्या मर्यादित असते. त्यामुळे वाघापुढे अस्तित्वाचे संकट उभे राहिले आहे. विदर्भाचाच विचार केला तर गावांच्या परिसरात किंवा माणसांच्या दुनियेत धुमाकूळ घालणारी अवनी ही काही एकमेव वाघीण नाही. दर दिवसाआड विदर्भाच्या कुठल्या ना कुठल्या भागातून वाघाने माणसावर हल्ला केल्याच्या किंवा जीव घेतल्याच्या घटनेची बातमी येत असते. त्यामुळे या विषयावर आमूलाग्र चिंतन करण्याची वेळ आलेली आहे. अवनीचे प्रकरण न्यायालयात गेले आणि न्यायालयाचा आदेश सोयीस्कर होता म्हणून तिला ठार करता आले.

इतर वाघांच्या धुमाकुळाचाही याच पद्धतीने विचार करायचा झाला तर अनेक वाघ ठार करावे लागतील. वाघांचे संवर्धन हा अपरिहार्यपणे जंगलांच्या संवर्धनाचा मार्ग आहे, हे आपले राष्ट्रीय धोरण असेल तर त्याच्याशी ही बाब विसंगत ठरते. एकीकडे "वाघ वाचवा' म्हणायचे आणि दुसरीकडे ते माणसांच्या जगात धुमाकूळ घालतात म्हणून त्यांना ठार करायचे, यात कुठलीही संगती नाही. जंगलांनी जसे सहअस्तित्वाचे सूत्र सांभाळले आहे, तसे ते जंगलाशेजारच्या गावांनाही सांभाळता आले तरच यातून मार्ग निघण्याची शक्‍यता आहे. जंगलांत अनेक गावे आहेत. माणसं तिथे राहतात. काही अपवाद वगळले तर जंगलात प्राणी विरुद्ध माणूस असा संघर्ष होत नाही.

वन्य प्राण्यांच्या हद्दीत माणसे जात नाहीत आणि प्राणीही त्यांना तसा प्रतिसाद देतात. गावशिवारांत वाघ शिरतो तेव्हा तो कुणाचा तरी जीव घेण्याची सुपारी घेऊन बाहेर पडत नसतो. नाईलाजाने त्याला जंगलाच्या बाहेर यावे लागते. त्याच्या येण्याने भयाचे वातावरण निर्माण होते हे खरे आहे; पण, त्याला जंगलातच राहता आले पाहिजे, अशी परिस्थिती निर्माण करणे ही माणसांची जबाबदारी आहे. जंगल आहे तर तिथे वाघ फिरणार. त्याचे जंगलात भागले तर तो बाहेर येण्याचा प्रश्‍न नाही.

जंगलांचे कॉरिडॉर्स आता तुटक झाले आहेत. त्यामुळे वाघांच्या विहारासाठी सलग मोठी जंगले आता कमी शिल्लक राहिलेली आहेत. एकीकडे वाघ वाढवायचे आणि जंगले कमी करायची हा राष्ट्रीय विरोधाभास आता तरी थांबला पाहिजे. विकासाला विनाशाच्या व संघर्षाच्या दिशेने न्यायचे, की त्या प्रक्रियेत सहअस्तित्वाच्या तत्त्वाचा विचार करून पावले उचलायची हे ठरवण्याचा हा प्रसंग आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com